अभिजात मराठी

सालंकृत नटली मराठी,
झाली अभिजात मराठी ।।

कोल्हापूर,जळगाव गोवा कोकण
नागपूर सातारा सांगली मराठी,
अनेक स्वादांची, सर्वच चांगली मराठी ।।

आंग्लमिश्रीत भ्रष्टतोमय मराठी,
सावरकरांची शुद्ध तेजोमय मराठी ।।

शासकीयपत्रातील दूर्बोध गूढ मराठी,
ओव्या अभंगातील गोड मराठी,

संगणक प्रोग्रामींग शिकवणारी
अर्वाचीन मराठी,
शिलालेखांवर सापडणारी
प्राचीन मराठी ।।

फार्सीमिश्रीत बखरींतील मराठी,
दलीत साहीत्य तसेच नारायण सूर्वेंची
जळजळीत कष्टकरींतील मराठी ।।

खांडेकर, कुसुमाग्रज, ग दि माडगूळकर,रणजित देसाई,अच्यूत गोडबोले यांची मराठी,
शिवाजी सावंत, मृत्यूंजय मराठी,
विश्वास पाटील, पानीपत मराठी ।।

बा भ बोरकर, मंगेश पाडगावकर, इंदिरा संत,गुरु ठाकूर, संदीप खरे ची कविता मराठी ।।
जाणता राजा, तो मी नव्हेच,कट्यार काळजात घुसली ,चारचौघी नाटकाची गर्विता मराठी ।।

श्यामची आई, श्वास, वाळवी चित्रपटाची मराठी ।।
केसरी,पुढारी, मटा, लोकसत्ता,लोकमत,नवाकाळ,सकाळ,सामना वृत्तपत्राची मराठी ।।

नामदेव, तुकाराम, एकनाथांची
भारुड अभंग मराठी.
अमृताशी पैजा जिंकणारी,
ज्ञानेश्वरी अक्षय मराठी ।।

नवरात्रातील नवदूर्गेच्या
नवरुपांपरी, नवसहस्त्र
शारदीयरुपे मराठी ।।

नवकोटी मराठींची बोलीभाषा मराठी
त्रिवार अभिनंदन अमर अभिजात मराठी ।।