श्रीगणेश लेखमाला २०२४ - चारोळ्या - रंग मनाचे.. काही गडद, काही फिक्के

चारोळ्या - रंग मनाचे.. काही गडद, काही फिक्के

गणपती बाप्पा मोरया.

मिपाकरांना मिपा वर्धापन दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. संस्थापकांना नम्र अभिवादन.

1

डिस्क्लेमर - हे मुक्तक आहे. वडाची साल पिंपळाला लावू नये. निरीक्षण, अनुभूती यातून सुचलेले लिखाण आहे. संदर्भ, चूक-बरोबर शोधू नये. जाणकारांकडून आणखी माहिती जाणून घेणे हा उद्देश आहे.

चारोळ्या हे स्फुट लेखन, चार ओळींच्या कवितेला चारोळी म्हणून संबोधले जाते. या काव्यप्रकारात दुसऱ्या व चौथ्या ओळीत अंत्ययमक जुळावे लागते. चारोळीचे कायदे फार सोप्पे. मुक्तछंदी, यमक, लय, नाद, साधे सोपे नेहमीच्या वापरातले अर्थवाही शब्द. मनाला गुदगुल्या तर कधी डोळ्यात अंजन, क्षणात हृदयाला भिडणारा काव्यप्रकार. उगाचच लांबण नाही, जडव्यागळ शब्द नाहीत, वृत्त, छंद, अलंकारिक भाषा इत्यादीचा लोचा नाही. प्रत्येक चारोळी स्वयंपूर्ण, क्षणभरात आपली छाप सोडून जाते.. आर.के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रासारखी.

कमीत कमी शब्द, गंमतीशीर यमके, विडंबन, अतिशयोक्ती, मिस्कीलपणा, थट्टेखोरपणा, मर्मावर बोट ठेवण्याची वृत्ती, दांभिकतेवर प्रहार, द्व्यर्थी शब्दपेरणी हा चारोळ्यांचा आत्मा / लक्षणीय वैशिष्ट्ये होत. केवळ विनोदनिर्मिती हा चारोळ्यांचा उद्देश नसून एक अर्थवाही संदेश देण्याचा प्रयत्न असतो. कदाचित आपण त्याला कोपरखळी म्हणू शकतो.

वात्रटिका, इरोटिका या चारोळीच्या बहिणी म्हणायला हरकत नाही. विषयवस्तूवरून यांचे वर्गीकरण करणे सोप्पे असते. जास्त अभ्यास नाही. (आमची गाडी उतारावर असल्याने वेळ मिळाल्यास अभ्यासेन म्हणतो.) श्री. सदानंद रेगे यांनी हा काव्यप्रकार मराठीत आणला. सर्वश्री पाडगावकर, रामदास फुटाणे, वि.आ. बुवा, फ.मुं. शिंदे, सूर्यकांत डोळस इत्यादींनी जोपासला. वानगीदाखल मंगेश पाडगावकर याची एक रचना -

निराशेच्या पोकळीमध्ये
काहीसुद्धा घडत नाही
आपलं दार बंद म्हणून
कुणाचंच अडत नाही

माझी चारोळ्यांशी ओळख उत्तर हिंदुस्थानातील होळीच्या सणाला झाली. होळीमध्ये 'हंसीमजाक व ठिठोरी' हा भाव प्रकर्षाने जाणवतो. होळीच्या पूर्वसंध्येला हास्य कविसंमेलनाचे आयोजन सणाचे अभिन्न अंग, जरूर बघायला मिळायचे. दूरदर्शनवर हमखास प्रदर्शित व्हायचे. इथेच काका हाथरसी, शैल चतुर्वेदी, हुल्लड मुरादाबादी, सुरेंद्र शर्मा आणि अनेक हिंदी हास्यकवी ऐकायला मिळाले. सुरेंद्र शर्मा यांच्या चारोळ्यांच्या कॅसेटसुद्धा बाजारात उपलब्ध होत्या. हरियाणवी भाषेत, "चार लाईना सुणा रया हूं.. " सुरुवात करायचे. मग पुढे हास्याचा गडगडाट. वानगीदाखल,

पत्नी जी!
मैं छोरा नैं राम बनने की प्रेरणा दे रियो ऊँ
कैसा अच्छो काम कर रियो ऊँ!’
वा बोली — ‘मैं जाणूँ हूँ थैं छोरा नैं
राम क्यूँ बणाणा चाहो हो
अइयां दसरथ बणकै तीन घराळी लाणा चाहो हो!’

चारोळी, मला तुंबलेल्या प्रतिभेचा परिणाम वाटतो. कवीला अचानक एखाद्या विषयावर काहीतरी भयंकर मोठे सुचते. सुचलेला विचार कागदावर खरडताना पहिल्या काही - विशेषत: चार ओळी लयबद्ध, नादबद्ध जुळतात आणि मस्त यमकही जुळते. त्यानंतर पुढे लिहिण्याचा प्रयत्न करत असताना कित्येक 'दिन, महिने, साल गुजरते जायेगें' या अवस्थेत त्या चारोळी सुप्त अवस्थेत पडून राहतात. काही दिवसांनी गुप्त, लुप्त होण्याची संभावना नाकारता येत नाही. दुसरे दुसरेच विचार, विषय डोक्यात आल्याने चारोळीचे भविष्य अंधकारात बुडून जाते. (अर्थातच स्वानुभव). तसे चारोळ्या स्वतंत्रपणेसुद्धा लिहिता येतात.

तुलनात्मकदृष्ट्या चारोळ्या हे 'रखडलेले बांधकाम' असेही म्हणता येईल. चारोळ्या म्हणजे शब्दविटांचे बांधकामच. लिहिणे सोपे आणि अवघडही. उदाहरणार्थ,

'ऊन, पाऊस, छत्री, ती, मी' या शब्दविटा जोडून एक चारोळी पाडायचा प्रयत्न करा बरे.. मी पाडलेली एक चारोळी -

ऊन असो वा पाऊस..
मी छत्री नेहमीच नेतो
ओलेत्या 'ती'ला बघून
बहाण्याने, जवळीक साधतो

एक वय असते, त्या वयात प्रत्येक जण कवी व्हायचा प्रयत्न करत असतो. 'उम्र का तकाजा' बोलो, पण 'आटे दाल का भाव' कळल्याने हवेत उडणारा पतंग लवकरच जमिनीवर येतो. असो. झटपट कवी बनण्यासाठी या काही टिप्स उपयोगी पडतील, आशी आशा करतो. नाही पटल्या, तर द्या खिडकीच्या बाहेर फेकून.

काही चारोळ्या, मी पाडलेल्या....

ओंजळ

जन्मलो जरी इथे वाढलो कुठे कुठे
मन वेडे गुंतले उगा, राहिलो मी जिथे
धाव धाव धावलो न कळे पावलो कुठे
वेचले किती! ओंजळ माझी रिती दिसे

चिनार!

प्रेम आंधळं नसतं,
का बघू चिंचेत चिनार?
खरंच नेशील काश्मीरला,
तरच मी तुझी होणार.....

व्रत

ती आसते उंबरठा, तर तो घराचं छत
ऊन-पाऊस पाठीवर घेत तो राखतो पत
घर बांधून ठेवायचं असावं एकमत
एकमेकांना सांभाळायचं हेच खरं व्रत

काळाची अपूर्वाई

आता होती बाळ, किती गेला काळ,
बाप्पा, काय सांगू काळाची नवलाई
आईची मुलगी आता होणार आई
बघा कशी काळाची ही अपूर्वाई

लहानपण देगा देवा

दुपट्याच्या झाल्या चिंध्या
बाटलीची लागली वाट
इमारत मोठी झाली
म्हणून कपाशी पडली गाठ....

जळवा

सुकले रक्त सारे, धमन्या रिक्त झाल्या
झुंडी मत्कुणांच्या सोडुनी पसार झाल्या
जगणे सुसह्य झाले, जखमा सुकून गेल्या
रक्तपिपासू जळवा जेव्हा गळून गेल्या....

विक्रम-वेताळ

बालपणाचे प्रेत घेऊन
म्हातारपण चालत आहे
इवल्याश्या झुळकेने
पिवळे पान हलत आहे.....

वार्धक्य

वाटलं नव्हतं, वार्धक्य एवढं मस्त असतं
इथं दु:ख महाग आणि सुख स्वस्त असतं
आठवणींच गाठोडं, सोयरसुतक कुणाला
क्षणोक्षणी मात्र ते माझ्याच उरावर बसतं

फाकडा

म्हातारा, म्हातारा म्हणू नये साठीला
कितीतरी अनुभव त्याच्या गाठीला
कणा त्याचा ताठ, वर मिशीचा आकडा
झाला रुपेरी, तरी रुबाब मात्र फाकडा

ववाळणी

धाडली राखीची ववाळणी,
म्हणे, लाडका भाऊ भोळा
नको दावू पासबुक त्याला,
त्याच्यावर दाजींचा ग डोळा

कशासाठी

इन द हार्ट ऑफ द सिटी, सायरन किंचाळत होता
लढत होतं एक हार्ट, एका एका श्वासासाठी
ट्रॅफिकच्या कोलेस्ट्रॉलनं रस्ता ब्लाॅक होता
जीव खाऊन पळत होती पोटं, एका घासासाठी..

होरी

मोहरला अंबा, मोहरला निंब
कोकीळकूजने मने झाली धुंद
कुणा वाट अंब्याची, कुणा ओढ खंब्याची
वसंताळले मन, वाट होळीच्या सणाची....

मान्सून

पाऊलवाट, पावसाची भुरभुर
डोंगरमाथा, गुडघ्यांची कुरकुर
मेघदूत दाटले, हिरवेगार रान
पक्ष्यांची कवने, तृप्त झाले कान.....

लोचा

गंध मछलीचा गेला नसता
कृष्णद्वैपायन जन्मला नसता
विचित्रवीर्य अकाली मेला नसता
अंबिकेला अंधपुत्र झाला नसता,

तर
महाभारताचा लोचा झालाच नसता....

सैनिक

हातात बंदूक, पाठीवर संदूक
पायात जोडा, घरचा ओढा
कोमल तळवे, मनाने हळवे
सीमेवर लक्ष, शैतान भक्ष..

वाचकांचे आगाऊ आभार मानत आवाहन करतो की त्यांना आवडलेल्या, सुचलेल्या चारोळ्या, वात्रटिका प्रतिसाद म्हणून डकवाव्या.