या आधीचे भाग
2)केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस पहिला
3)केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस दुसरा
4)केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस तीसरा
5)केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस चौथा
6)केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस पाचवा
आम्ही जेथे उतरलो ते हॉटेल ‘जास’ अतिशय मध्यवर्ती व छान होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खूप ऐसपैस होती. इथली रूम सर्विसही उत्तम होती. आमच्या रूम्स या तिसऱ्या मजल्यावर होत्या. तथापि हॉटेलमध्ये लिफ्ट होती त्यामुळे सामान वरती उचलणे व खाली आणणे सोपे गेले. अर्थात सामान उचलायला त्यांच्या हॉटेलमधला स्टाफ तत्परतेने आला. आम्हाला त्यांना रिक्वेस्ट देखील करावी लागली नाही. बोट जेट्टी पासून हे हॉटेल चालत पाच मिनिटांच्या अंतरावर आहे.
सकाळी उठून आम्ही तेथीलच जवळ असलेल्या प्रसिद्ध मारुती रेस्टॉरंट मध्ये मेदू वडा, इडली, पुरी भाजी इ. नाष्टा केला.
हॉटेल लहान आहे पण पदार्थ चविष्ट होते.
आम्ही विवेकानंद स्मारक साठी जेट्टी पॉईंटला उभे राहिलो. खूप सारी गर्दी होती. तथापि रांग पुढे पुढे सरकत होती. साधारणतः पंधरा-वीस मिनिटात आम्हाला तिकीट मिळाले. तिकीट दर अत्यंत कमी आहे. साधारण 70 रुपये. हेच जर एक्सप्रेस टिकीट काढायचे ठरवले तर आताशी नक्की आठवत नाही पण काही तीनशे रुपयांच्या आसपास दर आहे.
आम्ही नावेत चढलो आणि मोक्याच्या जागा पकडल्या. साधारण दहा ते पंधरा मिनिटात विवेकानंद स्मारकापाशी आलो. तथापि या प्रवासात समुद्राचे जे दर्शन होते ते अत्यंत प्रेक्षणीय आहे.
कारण येथील समुद्राच्या पाण्यात वेगवेगळ्या रंगाच्या छटा उठून दिसतात. उदाहरणार्थ बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि अरबी समुद्र हे तीनही कन्याकुमारी येथे एकत्र येतात आणि या पाण्याचा रंग काही ठिकाणी हिरवा, काही ठिकाणी निळा, असा दिसतो. पण पाणी अत्यंत देखणे आहे.
समुद्र नितळ आहे. हा समुद्र पाहणे हाच एक घेण्यासारखा अनुभव आहे!! मला जे काही म्हणायचे आहे ते कदाचित मी शब्दात मांडू शकणार नाही. परंतु हे दृश्य असे होते की तो समुद्र केवळ पहात राहण्यासाठी अर्धा दिवस किंवा पूर्ण अख्खा दिवस मी काढू शकले असते, इतका तो मला आवडला होता.
समुद्रातून दिसणारे स्मारक
विवेकानंद स्मारकाच्या इथे गेल्यानंतर त्यांनी तेथे ऑफिसमध्ये आम्हाला सगळ्यांना बसवले आणि विवेकानंदांचे जीवन चरित्र आम्हाला सांगितले. त्याचबरोबर कन्याकुमारी या स्थानाचे महात्म्य सांगितले. फार पूर्वीच्या काळामध्ये तिथे देवी कन्याकुमारी राहत होती. जी माता पार्वतीचा अवतार होती. तिथे बाणासुर नावाचा दैत्य फार माजला होता. त्याला असे वरदान होते की केवळ कुमारी स्त्रीच्या हातूनच त्याचा वध होईल. इकडे देवी कन्याकुमारीने मात्र तपश्चर्या करून भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले आणि त्याच्याशी विवाह करण्यासाठी त्याला कन्याकुमारी येथे येण्यासाठी सांगितले. ठरल्याप्रमाणे हिमालयातून भगवान शंकर माता कन्याकुमारीशी विवाह करण्यासाठी निघाले. येथे देव लोकात मात्र चिंता होऊ लागली की जर भगवान शंकर आणि माता कन्याकुमारीचा विवाह झाला तर काय होईल? कारण माता कन्याकुमारीच्या हातूनच बाणासुराचा वध होणार होता. त्यामुळे हा विवाह रोखण्यासाठी नारद मुनींना पाठवण्यात आले. नारद मुनींना भगवान शंकराला सांगितले की देवींनी विवाहाचा वर मागितला आणि तुम्ही निघालात? हा तर तुमच्या भोळेपणाचा हा फायदा घेण्यासारखे आहे. त्यामुळे तुम्ही तिला असे सांगा की सूर्यास्तापर्यंत कन्याकुमारीला पोचलो तरच हे लग्न होईल अन्यथा नाही. इकडे भगवान शंकर साधारण काही किलोमीटर अलीकडे आले तेव्हा सूर्यास्त झाला आणि भगवान शंकरांना असे वाटले की आता सूर्यास्त झाला त्यामुळे तिथेच राहिले आणि त्यामुळे त्यांचा विवाह होऊ शकला नाही. कालांतराने देवी कन्याकुमारीने बाणासुराचा वध केला. अशी ही काहीशी कथा आहे.
ज्यावेळी विवेकानंद यांना ज्ञान प्राप्ती करायची होती त्यावेळी त्यांनी असा विचार केला की, हिमालयातला योग्यांचा योगी असलेला शंकर जर या स्थानामध्ये आला असेल, तर भारताच्या सर्वात दक्षिणेकडे असलेल्या या ठिकाणी मी आलो तर मला ज्ञानप्राप्ती निश्चितच होईल. म्हणून ते येथे आले व या खडकावरती त्यांनी समाधी लावली आणि त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. त्यानंतर ते पुढील शिकागो मध्ये गेले आणि त्यांनी प्रवचन दिले हा सर्व इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे.
त्यानंतर आम्ही माता पार्वतीचे पदचिन्ह असलेल्या दगडाचे तिथे मंदिर आहे त्याचे दर्शन घेतले. मंदिराचे बाहेरून घेतलेले काही फोटो
तिथे फोटो काढण्याची परवानगी नाही. त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांचे पुतळा असलेले जे मुख्य स्मारक आहे तिथे दर्शन घेतले. आत मध्ये ध्यानमंडप आहे तिथे तुम्ही ध्यान देखील करू शकता. इथे देखील आत मध्ये फोटो काढण्यास परवानगी नाही त्यामुळे बाहेरूनच फोटो काढलेले आहेत
आम्ही सर्वांनी ध्यानाचा अनुभव घेतला.
तिथे दुरूनच थिरुवल्लूवर नावाचे तमिळ कवी आहेत, त्यांचे मोठे दगडी मूर्ती असलेले स्मारक दिसते.
सध्या त्याचे बांधकाम चालू आहे. पुतळा जरी उभा असला तरी बाजूचे बांधकाम अजून तयार झाले नाही. त्यामुळे सध्या स्थितीत ते लांबूनच पहावे लागते . काही वर्षानंतर बोटीने तेथेही जाता येईल. आम्ही या सर्व ठिकाणी बरीच फोटोग्राफी केली.
या स्मारकावरून समुद्राचे अप्रतिम दर्शन होते.
आम्ही येथे खूप फोटोग्राफी करून परत आलो त्यावेळी साधारण साडेबारा वाजले होते.
मग तेथीलच एका हॉटेलमध्ये आम्ही जेवलो. माझी पारंपारीक थाळी, मुलाचा चॉकलेट शेक, पनीर व मलाबार पराठा व पनीर चिल्ली असे फ्युजन जेवण झाले.
आता आम्हाला येथून जवळच असलेल्या वट्टकुट्टई या 18 व्या शतकात त्रावणकोरच्या राजाने टेहळणी करता बांधलेल्या किल्ल्याला भेट द्यायचे होते.
जर तुम्ही कन्याकुमारीला जाणार असाल तर या किल्ल्याला जरूर भेट द्या. हा किल्ला सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत उघडा असतो. गाडीने जायला साधारण वीस ते पंचवीस मिनिटे लागतात. येथून समोर समुद्र 180° दिसतो.
पूर्वीच्या काळी येथून टेहळणी करणे सोपे होते म्हणून हा किल्ला त्यांनी बांधला आहे.
नंतर डचांनी येथे वसाहत स्थापन केली तेव्हा हा किल्ला त्यांच्या अधिपत्याखाली आला व त्यांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. आतमधे सुंदर हिरवळ आहे.
किल्ल्याच्या बुरुजाला आणि कमानी वरती दगडामध्ये जो चौकोन दिसत आहे ठिकठिकाणी तोफा ठेवण्यासाठी जागा आहे.
आणि किल्ल्यावरून दिसणारे दृश्य तर केवळ अप्रतिम आहे. एका बाजूला समुद्र तर एका बाजूला तटबंदी वरून अशा प्रकारे डोंगरांचे दर्शन होते
येथे आम्ही जवळपास तासभर थांबलो होतो.एक छान अनुभव घेऊन आम्ही इथून बाहेर पडलो.
आता आम्हाला जवळच असलेले सुचिंद्रम मंदिर येथे जायचे होते. वट्टकुट्टई किल्ल्यापासून साधारण अर्धा तासात आम्ही देवळाजवळ पोहोचलो. वाटेत निसर्ग अतिशय सुंदर दिसत होता. खूप नारळाची झाडे, त्याच्यामध्ये डोंगर आणि आकाश यांचे सुंदर दृश्य दिसत होते.
मंदिरापाशी आम्ही साधारण साडेतीन वाजता पोहोचलो. त्यामुळे अर्धा तास आम्हाला वाट पाहायला लागली. (या स्थळांबद्दल मला माहित नव्हते .परंतु कंजूस जी यांनी मला सुचिंद्रम मंदिर तसेच पद्मनाभपुरम पॅलेस या स्थळांबद्दल माहिती दिली. त्यामुळे ही दोन्हीही स्थळे मी माझ्या सहल नियोजनात समाविष्ट केली. ही दोन्ही स्थळे आपण कन्याकुमारीच्या आजूबाजूला असेल तर अजिबात चुकवू नये अशीच आहेत.) हे मंदिर दुपारी बारा वाजता बंद होऊन चार वाजता उघडते हे ध्यानात घेऊन नियोजन करावे. प्रवेशदाराच्या कमानीवर असेलेली ब्रम्हा, विष्णू व महेशाची प्रतिमा
आत मध्ये अनेक निरनिराळी मंदिरे आहेत. नेमके काय बघायचे आणि कुठे पहायचे तेच काही कळेना. आम्ही एका पुजाऱ्याला विचारले तेव्हा त्याने मोडक्या तोडक्यात हिंदी मध्ये हे एक पुजारी तुम्हाला शंभर रुपये दिल्यानंतर सर्व मंदिर फिरवून आणतील असे सांगीतले आणि त्या गुरुजींना विचारले त्यावर त्यांनी येथील एका दुसऱ्या गुरुजींना जोडून दिले. हे गुरुजी अतिशय उत्साही होते. त्यांनी आम्हाला सर्व मंदिराची माहिती सांगायला सुरुवात केली. हे मंदिर मूळतः नवव्या शतकामध्ये चोळराजांनी बांधले आणि त्यानंतर आलेल्या वेगवेगळ्या राजवटींनी त्याचे पुनरुज्जीवन केले. मंदिरात मुख्यतः देवता ही त्रिमूर्तीची आहे. म्हणजेच ब्रम्हा, विष्णू व महेश या तिघांचे हे स्थान आहे. या मंदिरामध्ये हनुमानाचा सर्वात मोठा उभा पुतळा आहे असे म्हणतात. तेथे दत्तात्रेयांचे मंदिर होते . उत्तरेकडच्या व दक्षिणेकडच्या देवी देवतांमध्ये काही फरक आहे असे वाटले. अनेक असे देव त्यानी सांगितले जे मी कधी ऐकले नव्हते. उदाहरणार्थ गणपतीची अशी मूर्ती त्यांनी मला दाखवली ज्यामध्ये अर्धे शरीर गणपतीचे व अर्धे शरीर स्त्रीचे होते याला ते विघ्नेश्वरी असे म्हणतात. मंदिराच्या आत मध्ये असलेले स्तंभामधून संगीत निर्माण होते . गुरुजींनी तसे आम्हाला वाजवून दाखवले. तिथे फोटो काढण्यास परवानगी नव्हती. तरीही त्यांच्या परवानगीने आम्ही काही ठिकाणी फोटो काढले.
अहिल्येला फसवल्यामुळे इंद्राला जो शाप मिळाला त्यातून मुक्त होण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश यांनी याच ठिकाणी त्याला दर्शन देऊन शुद्ध केले म्हणूनही शुची इंद्र (इंद्राची शुद्धी)म्हणून असे नाव पडले. या मोठ्या स्तंभ मंडपा मध्ये पूर्वी जेवणावळी बसत असत असे गुरुजींनी आम्हाला सांगितले. तसेच खांबांच्या खाली ज्या मूर्तींचे हात आहेत, त्या हातांमध्ये तेल घालून वात लावून प्रकाशयोजना केली जात असे.
मंदिरामध्ये ठिकठिकाणी ‘ येळू ‘ या आठ प्राण्यांचे अवयव असलेल्या काल्पनिक प्राण्याची मूर्ती जागोजागी दिसते.
इथे जवळपास दोन-अडीच तास आम्ही होतो. त्या गुरुजींनी आम्हाला एवढी माहिती सांगितली, आपला वेळ आम्हाला दिला, त्यामुळे आम्ही ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त दक्षिणा स्वतःहूनच त्यांना दिली . बाहेर पुष्करणी होती. अत्यंत सुंदर दिसत होती .
तथापि आता अंधार पडत आलेला होता त्यामुळे आम्हाला निघणे भाग होते.
इथून आम्हाला कन्याकुमारीच्या जवळच असलेल्या वॅक्स म्युझियम आणि थ्रीडी आर्ट गॅलरी ला भेट द्यायची होती.
याठिकाणी देखील बच्चे कंपनी वगैरे सोबत असतील तर आणि अतिरिक्त वेळ असेल तर जायला काही हरकत नाही.
जवळपास तास दीड तास घालवल्यानंतर आम्ही साधारण आठ वाजता कन्याकुमारी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात पोहोचलो. त्यावेळी मंदिरात अजिबात गर्दी नव्हती. आम्ही पंधरा मिनिटात थेट देवीच्या समोर जाऊन उभे राहिलो . मी अजिबात अतिशयोक्ती करत नाही. मी आजवर जेवढ्या देवींचे दर्शन घेतले आहे त्यामध्ये कन्याकुमारी देवीचे दर्शन हे अत्यंत मनोहरी होते. देवीकडे कितीही पाहिले तरी मन भरत नव्हते. देवीची मूर्ती कमालीची देखणी आहे. इतका सुंदर मुखवटा आजतागायत कोणत्याही देवीचा पाहिला नाही. आपण निव्वळ निःशब्द होतो. उजळलेल्या दिव्यांच्या नैसर्गिक प्रकाशामध्ये देवीच्या नाकात हिऱ्यांची लखलखत असलेली नथ आणि तिचा अत्यंत देखणा असा मुखवटा, त्यावरती फुलांची केलेली कलाकुसर आणि दिव्यांची आरास , इतकी कमालीची सुंदर दिसत होती की काय वर्णन करू!!!! कमीत कमी पाच ते सात मिनिटे निवांत आम्हाला देवीचे दर्शन घेता आले. भविष्यात कधीतरी मी नक्की देवीला परत भेटायला जाणार आहे हे ठरवूनच तिथून बाहेर पडले.
इथून जवळच मत्स्यालय आहे तिथेही आम्ही थोडा वेळ घालवला. येथील काही फोटो-
आम्ही मंदिरातून बाहेर पडलो तेव्हा तिथे खूप सारी दुकाने होती. कपड्यांची, इलेक्ट्रिक वस्तूंची, शोभेच्या वस्तूंची तसेच अनेक प्रकारची दुकाने तिथे होती.. चौकशी केली असता आम्हाला लक्षात आले की या वस्तू अत्यंत स्वस्त दरात मिळत आहेत. त्यामुळे आम्ही साड्यांच्या दुकानात शिरलो आणि केरळी साड्या ज्या केरळमध्ये आम्हाला दोन अडीच हजाराच्या आत मिळत नव्हत्या, त्या केवळ 700 रुपयात मिळाल्या . अशा आम्ही सात आठ साड्या घेतल्या. मिस्टरांनी पेन ड्राईव्ह, सेल्फी स्टिक, इअर काॅड इ. वस्तूंची खरेदी केली.
आता साडेआठ वाजून गेले होते. आम्ही तिथूनच जवळ असलेल्या फूड कोर्ट वरती गेलो . खूप दिवसापासून दक्षिणात्य भोजनावरती ताव मारला होता. त्यामुळे आता काहीतरी वेगळे खाण्याची इच्छा होती. तेथे पावभाजी आणि फालुदा असे वेगळे जेवण मागवले.
तेथे आजूबाजूला रस्त्यावरचे विक्रेते बरेच होते . उद्या आम्ही येथे शिंपल्यांच्या वस्तू घ्यायला यायचे असे ठरवले. उद्या सकाळी येथून आम्ही निघणार होतो. कन्याकुमारीच्या स्थलादर्शनासाठी मी दोन दिवस ठेवले हा माझ्या सहलीच्या नियोजनातील अत्यंत योग्य निर्णय होता. खरंतर अजून एक दिवस देखील ठेवला असता तरी चालले असते. जेणेकरून सकाळी सूर्योदय, संध्याकाळचा सूर्यास्त व समुद्र एन्जॉय करणे झाले असते. पण असो . आजचा दिवस खूपच एन्जॉय केला . आता उर्वरित पद्मनाभपुरम पॅलेस, अझिमला शिवा टेम्पल व त्रिवेंद्रम येथील प्रसिद्ध पद्मनाभस्वामी मंदिर यांचे वर्णन पुढील शेवटच्या भागामध्ये……..