भाग १ - कलकाता, भाग २ - ताम्रलिप्ती व ग्रामीण बंगाल , भाग ४ - बरीषाल बांगलादेश, भाग ५ –चितगांव बांगलादेश, भाग ६ – सिल्हेट बांगलादेश, भाग ७ – राजशाही बांगलादेश, समाप्ती – ढाका बांगलादेश
पूर्वी त्रिपुरा मधून वेगवेगळ्या भागातून बांगलादेश चे अवलोकन केले होते. सीमेवर एखाद दोन वैध-अवैध भेटीही झाल्या परंतु अनेक वर्षांनी ती सीमा आता अधिकृतरीत्या ओलांडली. बांगलादेश चा व्हिसा अनिवार्य असला तरी विनामूल्य असतो. 'प्रोसेसिंग फी' च्या नावाखाली थोडेफार पैसे घेतातच तरी. पण असो, प्राथमिक सोपस्कार पार पाडले आणि व्हिसा तयार ठेवला. सहा महिन्याचाच मिळाला पण पुरेसा होता. अफगाणिस्तान प्रमाणेच पायी प्रवेशाचा संकल्प, तो घोजाडाङा-भोमरा सीमेवर पासपोर्ट वर ठप्पा मारत साधला. दोन्ही बाजूचे कस्टम अधिकारी निर्लज्ज पणे पैसे मागत होते, परंतु फार त्रास देण्यासारखे काही नव्हतेच माझ्याकडे. बेनापोल ची सीमा सामान व रेल्वे इत्यादी वाहतुकीसाठी सर्वात महत्वाची आहे व इथून फार लांब नाही, त्यामुळे इथे या सीमेवर फार सेवा सुविधा विकसित झालेल्या नाहीत. सीमेपलीकडे काही चलन बदली करून अजिबात वेळ न दवडता जणू काही आधीच ठरलेले असल्याप्रमाणे बाईक वर डबल सीट लिफ्ट, तीही दीड तास प्रवासासाठी, थेट पहिला थांबा जिथे होता त्या ईश्वरीपूर या गावात.
बांगलादेशचे एकूण आठ विभाग, आपल्याकडील राज्यांप्रमाणे. त्यातील खुलना विभागामध्ये मी प्रवेश केला. आजचा खुलना विभाग प्राचीन वंग/बंग जनपदाचा मध्यवर्ती भाग तसेच मध्ययुगीन यशोहर/यशोर किंवा जशोर राज्याचा भाग. येथील अधिष्ठात्री देवता, यशोहरेश्वरी, बंगालीमध्ये जशोरेश्वरी काली. १२०४ मध्ये येथे इस्लामी परचक्र येऊन थडकले त्यानंतर काही अपवाद वगळता येथे इस्लामची सत्ता राहिली. त्यात एक गौरवपूर्ण पर्वाचा अपवाद म्हणजे यशोहर राज्य. शहाजी राजांच्या समकाळात, तेथे प्रतापादित्य राजाचे राज्य होते. त्याच्या वडिलांनी स्थानिक सुल्तानाविरुद्ध बंड करून राज्य स्थापिले. ईश्वरीपूर हि त्याची राजधानी आधी यशोर नावानेच ओळखली जात असे. परंतु नंतर कसबा येथे राजधानी हलविण्यात आली व त्याचे नाव बदलून यशोहर/जेसोर करण्यात आले व जुने राजधानीचे ठिकाण कालांतराने खेडेगाव म्हणूनच शिल्लक राहिले. पुढे मुघलांनी हिंदू मिर्झा राजा मानसिंगाकरवी (मराठ्यांविरुद्ध पाठविलेल्या जयसिंगाचा पूर्वज) हिंदू यशोहर राज्य बुडविले व वंग जनपद पुन्हा अंधकारात बुडाले. याच दरम्यानची एक दंतकथा आहे कि येथील देवीने एका दिवशी पश्चिमेकडे आपले तोंड फिरविले व तेव्हा प्रतापादित्यचा पाडाव तर झालाच पण शतकांनंतर भारताची फाळणी झाल्यावरही हिंदू बहुल असून देखील खुलना पूर्व पाकिस्तानात गेले व भारताची सीमा मंदिराच्या पश्चिमेसच राहिली. १९४७ मध्ये खुलना शहरात देखील तिरंगा फडकवण्यात आलेला होता परंतु पुढील तीन दिवसात फासे पलटले. मुस्लिमबहुल मुर्शिदाबाद पाकिस्तानात गेल्याचा आनंद साजरे करत असताना गंगेचे (हुगळीचे) विभाजन टाळण्यासाठी ते रॅडक्लीफ करेक्शन नुसार भारतास हस्तांतरित करण्यात आले व बदल्यात खुलना, अर्ध्याहून अधिक हिंदू जनतेसहित व सुंदरबनासहित पाकिस्तानात समाविष्ट झाले.
बांगलादेशात राज्य म्हणजे विभाग, प्रत्येक विभागात जिल्हे व त्यात उपजिल्हे अशी रचना. भारताच्या सीमेलगत सातखिरा हा जिल्हा, त्यात सर्वात दक्षिणेकडे श्यामनगर उपजिल्ह्यात ईश्वरीपूर हे लहानसे खेडे. सुंदरबनचे हे प्रवेशद्वार. अतिशय दुर्लक्षित व मागास असा प्रदेश.
गावात गोवऱ्यांऐवजी शेणाचे इंधन करण्याची वेगळी पद्धत दिसली
अशा प्रकारची शेवाळलेली तळी बंगालमध्ये प्रत्येक घराबाहेर पाहायला मिळतात. त्यातच अंघोळ-धुणी-भांडी-मासे सगळंच...
जशोरेश्वरी काली - ५० शक्तिपीठांमधील हस्तकमल पीठ (हाताचे तळवे). मंदिर अलीकडेच नव्याने उजळले आहे, कारण ठरले ते मोदींच्या भेटीचे. मागील बांगलादेश भेटीत त्यांनी या जागेला भेट देण्याचे जाहीर करताच रातोरात मंदिराची डागडुजी करून रंगरंगोटी करून उत्तम करण्यात आले. गावात साडी-ओटीचे सामान घेताना गावकऱ्यांनीही मोदींच्या प्रवासाच्या हकीकती सांगितल्या. हिंदू धार्जिणा नेता म्हणून त्यांचा तिरस्कार असला तरी भक्कम नेतृत्वाचा त्यांना हेवा वाटतो हे एका शेंदरी दाढीवाल्याने आवर्जून सांगितले.
ईश्वरी काली मंदिर - पंचरत्न प्रकारातले. पत्र्याचा मंडप अलीकडचा, मोदी भेटीनंतर आलेला.
मंदिराचा आवार स्वच्छ व मोठमोठ्या वृक्षांनी सुशोभित आहे. जुन्या ऐतिहासिक मंदिराच्या बांधकामाचे अवशेष एका बाजूला अजूनही तशाच जीर्ण अवस्थेत दुःखद कथा सांगायला उभे आहेत. पत्र्याचा मंडप आता नव्याने परिसराच्या नशिबी आला आहे. देवी घोररुपा आहे. मंदिर अगदी सुंदरबनाच्या काठीच असल्याने प्राचीन काळी दाट जंगलातच असले पाहिजे. अगदी अलीकडेपर्यंत मंदिरात भगवतीच्या सान्निध्याला वाघ येत असत असे ऐकले. मंदिरात शांत एकांत जो इथे मिळाला तो पश्चिम बंगाल मध्ये अगदीच दुर्मिळ होता. पठण-ध्यान-उपचारादि आनंद करत उत्तम समय व्यतीत केला.
ईश्वरी काली विकराल विग्रह.
इथे व्हिडीओ डकवता येत नसल्याने या लिंक वर पहा: https://youtube.com/shorts/ioqZPN4zMIk?feature=shared
बाकी गावात काही सुविधा नाही. पुढे बस वा मिळेल त्या साधनाने उपजिल्ह्याचे ठिकाण श्यामनगर, तेथून सातखिरा व मग खुलना. प्रत्येक ठिकाणी काही काळ व्यतीत करत, स्थानिकांना भेटत खुलना मुक्कामी, परंतु अन्य भारतीय शहरासारखेच शहर ते. परंतु या लेखासाठी उल्लेखनीय असे तेथे फार काही नाही. तिथून पुढे शेजारील राज्य बरीषाल विभागाकडे पुढील भागात.
संदर्भ नकाशा
सुंदरबन खारफुटी
भाग १ - कलकाता भाग २ - ताम्रलिप्ती व ग्रामीण बंगाल , भाग ४ - बरीषाल बांगलादेश, भाग ५ –चितगांव बांगलादेश, भाग ६ – सिल्हेट बांगलादेश, भाग ७ – राजशाही बांगलादेश, समाप्ती – ढाका बांगलादेश
अन्य भटकंती : दक्षिण अमेरिका - पेरू, दक्षिण अमेरिका - अमेझॉन ब्राझील, मध्य अमेरिका - ग्वाटेमाला होंडुरास एल साल्वाडोर बेलीझ, ईशान्य भारत - मणिपूर, ईशान्य भारत -त्रिपुरा, ईशान्य भारत : आसाम, आग्नेय आशिया - ब्रह्मदेश थाईलँड लाओस कंबोडिया मध्य व पश्चिम आशिया - उझबेकिस्तान ताजिकिस्तान अफगाणिस्तान अझरबैजान तुर्कस्तान , पूर्व आफ्रिका - इथियोपिया , अखंड बंगाल