नमस्कार. खूप दिवसांनी मिसळ पाववरती येत आहे. निमित्त आहे आमच्या केरळ-कन्याकुमारी भटकंती लेखमालेचे....... खूप दिवसापासून केरळ माझ्या बकेट लिस्ट मध्ये होते. मिपावर केरळ वरती अनेक लेख आहेत. तसेच युट्युब वरती सुद्धा केरळ बद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे. माझ्या सासूबाई वर्षभरापूर्वी सेवानिवृत्त झाल्या. त्यांना कुठेतरी फिरायला जायचे होते. आपण सर्वजण कुठल्यातरी निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाऊयात याबाबतचे तू नियोजन कर असे सासूबाईंनी मला सप्टेंबर मध्ये सांगितल्यामुळे माझा आधीच तयार असलेला केरळ प्लान त्यांना सांगितला आणि आमचे दिवाळीनंतर केरळला जायचे निश्चित झाले. माझ्या हातात नियोजनासाठी जवळ जवळ तीन महिने होते. कुठेही गेलो तरी बजेट सहल करावी असा माझा आग्रह असतो. उगाच अवास्तव खर्च करणे टाळावे यावर माझा कटाक्ष असतो. तथापि सासुबाई म्हणाल्या की एक तरी प्रवास हा विमानाने करूयात. मग काय .... मी विमानाची तिकिटे मॉनिटर करायला सुरुवात केली. त्यावेळी विमानाचा दर साधारण साडेआठ हजार प्रतिमाणशी चालू होता. केरळमध्ये दोन विमानतळ आहेत. एक म्हणजे कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ. आम्ही साधारण पूर्ण केरळ फिरायचे ठरवले होते. आमच्या हातात आठ रात्री नऊ दिवस होते. त्यातले शेवटचा दिवस मला आराम करण्यासाठी ठेवायचा होता. जेणेकरून सोमवारपासून परत ऑफिस जॉईन करता येईल. आधी मी जाताना कोचीपर्यंत रेल्वेने व येताना त्रिवेंद्रम वरून विमानाने अशा पद्धतीने प्लॅन आखला होता. कोची व त्रिवेंद्रम या दोन्ही ठिकाणची जातानाची व परतीची अशी तिकिटे मी सतत मॉनिटर करत होते. बुकिंग करण्याची घाई केली नाही कारण कॅन्सलेशन चार्जेस भरपूर असतात हे मी पाहिले होते. आश्चर्यकारक रित्या सप्टेंबर नंतर कधीतरी तिकिटाचे दर अचानक खाली आले व साधारण चार-पाच हजाराच्या आसपास किंमत दिसू लागली. मुळात विमानासाठी आठ ते नऊ हजार रुपये एका वेळचे खर्च करण्याची तयारी ठेवली होती. आता दर निम्म्यावरती येत आहेत तर सरळ जाताना आणि येतानाही विमानाने जायचे असे ठरवून स्थलदर्शनामध्ये काही जागा अजून समाविष्ट केल्या.
केरळ मुळातच एका खेपेमध्ये पाहणे अन्यायकारक आहे असे माझे स्पष्ट मत आहे. केरळ पाहायचा झाला तर उत्तर केरळ, मध्य केरळ आणि दक्षिण केरळ असे केरळचे सरळ सरळ 3 भाग करता येतील. उत्तर केरळमध्ये बघण्यासारखी ठिकाणे म्हणजे कासारगोड, बेकल, कोझिकोडे व वायनाड. मध्य केरळमध्ये बघण्यासारखी ठिकाणे म्हणजे त्रिशूल, गुरुवायुर, अथीरपल्ली वॉटरफॉल, कोची, कलाडी, मुन्नार, टेकडी व आलेप्पी. दक्षिण केरळचा विचार केला तर मून्रो आयर्लंड, कोल्लम, जटायू अर्थ सेंटर, वर्कला, त्रिवेंद्रम, पूवर व कन्याकुमारी असा प्लॅन करता येईल. उत्तर केरळमध्ये रस्ते हे अतिशय निमुळते व घाटाचे वळणावळणाचे असल्यामुळे उत्तर केरळ पाहण्यासाठी जास्त दिवस लागतात त्यामुळे उत्तर केरळ व मध्य केरळ अशी ट्रिप शक्यतो क्लब करू नये. तथापि थोडे जास्त दिवस हाताशी असतील तर मध्य केरळ व दक्षिण केरळ ही सहल एकत्र करता येणे शक्य आहे. मी स्वतः राजस्थान जसे चार टप्प्यात करायचे ठरवले आहे तसेच केरळ सुद्धा तीन टप्प्यांमध्ये करायचा ठरवला होता. परंतु एवढा विमानाचा खर्च करतच आहोत व सासूबाईंना काही सारखे सारखे येणे जमणार नाही हा विचार करून मध्य केरळ व दक्षिण केरळ ही ट्रीप एकत्र करून टाकावी त्याचबरोबर कन्याकुमारी सुद्धा या सोबतच करावी असा विचार केला. आणि हा विचार अत्यंत योग्य ठरला. आमच्या आठ रात्री नऊ दिवस या प्लानमध्ये गुरुवायूर व अथीरपल्ली हे काही बसेना. शेवटी ही दोन ठिकाणे उत्तर केरळाच्या ट्रिपमध्ये समाविष्ट करायचे असे ठरवून कोची, a)कलाडी, b)मुन्नार, c)थेकडी, d)मूनरो आयलंड, वर्कला, e)जटायू अर्थ सेंटर, i)त्रिवेंद्रम, h)पूवर, f)पद्मनाभ पुरम पॅलेस, सुचिंद्रम टेम्पल(f व g च्या मधील गोल) व g)कन्याकुमारी ही ठिकाणे कव्हर करण्याचे निश्चित झाले. नकाशा खालीलप्रमाणे
Go इबिबो व बुकिंग डॉट कॉम या वेबसाईटवरून मी कोची आंतरराष्ट्रीय विमानतळापाशी Base9Airport हे हॉटेल एका रात्री करिता, Durga Budget Stay हे हॉटेल मुन्नार येथे दोन दिवसांसाठी, Holiday Villa हे हॉटेल थेकडी येथे व वर्कला येथे एक दिवस व Hotel JAAS कन्याकुमारी येथे दोन दिवस असे हॉटेलचे बुकिंग करून टाकले. प्रत्येक ठिकाणी एक मोठी फॅमिली रूम व एक स्वतंत्र बेड आम्हाला उपलब्ध करून देणार होते. जेणेकरून आम्ही सर्वजण एकाच खोलीत राहू शकणार होतो. हे सर्व आम्हाला अत्यंत स्वस्त मिळाले व सर्वच ठिकाणी सोय अतिशय चांगले झाली. पेपर केरला या कंपनीच्या कारचे रिव्ह्यू अतिशय चांगले होते. पेपर केरला या कंपनीकडून मला सगळ्यात कमी रकमेचे कोटेशन मिळाले, त्यानुसार मी या कंपनीचे सुरुवातीचे काही पैसे भरून बुकिंग करून टाकले. हिंदी बोलणारा ड्रायव्हर द्यावा अशी आवर्जून सूचना केली होती. जवळपास तीन आठवडे आधी मी या सर्व गोष्टी पूर्ण केल्या आणि सहलीची आतुरतेने वाट पाहू लागले.
शेवटी जायचा दिवस उजाड उजाडला. आमचे विमान संध्याकाळी सात वाजता होते. त्यामुळे चार वाजताच घरी पोहोचायचे या हिशेबाने ऑफिस मधून लवकर निघायचे आधीच सांगितले होते.पण शेवटपर्यंत काही ना काही अर्जंट काम येत राहिले व शेवटी एकदाचे मी चार वाजता ऑफिस सोडले. धावत पळत चर्चगेटला लोकलमध्ये बसले तर स्पाइस जेट कडून मेसेज आला की आपले विमान दोन तास उशिरा येणार आहे. त्यामुळे विमान नऊ वाजता निघणार होते. मनातल्या मनात थोडे बरेच वाटले. घरी पोहोचून थोडे फ्रेश होऊन आम्ही साधारण साडेसहा वाजताच विमानतळावर पोहोचलो. सर्वांचाच हा पहिला विमान प्रवास असल्यामुळे चेक-इन प्रोसेस तसेच अन्य कोणत्याही औपचारिकतेबद्दल माहिती नव्हती. त्यामुळे लवकर जाऊन सर्व प्रोसेस करून तिथे निवांत थांबूयात हा विचार करून आम्ही लवकरच गेलो. सिक्युरिटी चेकिंग झाले. बॅगा केबिनमध्ये टाकण्यासाठी दिल्या आणि आम्ही मग तिकडे फिरत राहिलो. सात वाजता तिथेच असलेल्या एका साउथ इंडियन काउंटरवरून आम्ही रात्रीचे डिनर करून घेतले कारण रूमवर पोहोचायला उशीर होणार होता. तसे मी हॉटेल मालकाला फोन करून सांगितलेही होते. सर्व काही व्यवस्थित पार पडेल ना याचे मला जरा टेन्शन आले होते. शेवटी एकदाचे दहाच्या सुमारास आमच्या विमानाने उड्डाण केले. आम्ही साडेबारा वाजता कोची विमानतळावरती पोहोचलो. तिथे चक्क पाऊस पडत होता. हवेत गारवा होता. आम्ही प्रीपेड टॅक्सीने जवळच असलेल्या आमच्या हॉटेल वरती पोहोचलो. त्यावेळी रात्रीचा एक वाजला होता. विमानात मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी हॉटेल मालकाला उतरल्यानंतर फोन केला. त्याने तो उचलला आणि तुम्ही सावकाश या असे सांगितले. हॉटेलचे लोकेशन त्याने व्हाट्सअप वर आधीच पाठवून दिले होते. आम्ही तिथे पोहोचेपर्यंत तोही गाडीतून आला. त्याने आम्हाला रूम दाखवली. रूम प्रशस्त होती . साधारण दोन रूम होत्या. आतल्या रूम मध्ये डबल बेड व एक एक्स्ट्रा बेड व अटॅच बाथरूम होते तर बाहेरच्या रूममध्ये सोफा व डायनिंग टेबल होते. एकूणच आम्हाला रूम अतिशय आवडली. आम्ही त्यांना एक बेड बाहेर एक्स्ट्रा टाकायला सांगितला. त्यालाही त्याने कोणतीही खळखळ न करता पटकन व्यवस्था करून दिली. शेवटी एकदाचे केरळमध्ये पोहोचलो होतो. आता जरा मला सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्यासारखी वाटू लागली. मी निश्चिंत होऊन नेत्रादेवीच्या अधीन झाले. उद्या आम्हाला सर्वप्रथम शंकराचार्यांचे जन्मस्थान असलेल्या कलाडी येथे भेट द्यायची होती आणि वाटेत येणाऱ्या स्थळांना भेट देत मुन्नारला पोहोचायचे होते. हा सर्व वृत्तांत पुढील भागात........!