मुंबईच्या मध्यवर्ती भागात असूनही थोड्याश्या अपरिचित असलेल्या दोन लेण्यांना गेल्या वर्षी भेट दिली होती.
आंबोली लेणी आणि कोंडिविते लेणी (जोगेश्वरी लेणी आणि महाकाली लेणी)
अशाच एका तिसऱ्या लेणीला गेल्या आठवड्यात भेट दिली ती म्हणजे दहिसर (प) येथे असलेली मंडपेश्वर लेणी. सहाव्या शतकात निर्माण झालेले हे एक बौद्ध लेणे. इतर लेण्यांप्रमाणेच या लेण्यांचा वापर देखील धर्मप्रसार आणि भिक्खुंच्या राहण्यासाठी त्याचबरोबर सागरी मार्गाने येऊन घाटवाटांनी प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांची राहण्याची व्यवस्था, भिक्खुंमार्फत त्यांचे संदेश वहन असाही होत असणार.
लेणी दहिसरला असली तरी बोरिवली स्टेशनपासून अवघ्या दोन किमी अंतरावर. शिवाय बोरिवली येथे जाणासाठी मुंबई लोकलच्या फेऱ्या व पर्यायही जास्त असल्याने सोईस्कर.नव्या मुंबईतून जाण्यासाठी थेट गोरेगाव जाणारी लोकल पकडली. तेथून लोकल बदलून दहा मिनिटात बोरीवलीला पोहचलो.रेल्वे स्टेशनच्या बाहेरच रिक्षा उभ्या असतात. तीनचार रिक्षावाल्यांना विचारले. कोणालाही लेणी माहीत नव्हती. एक रिक्षावाला यायला तयार झाला. परत कधी आलात तर शिवाजी नगर विचारा असे म्हटला. दहा मिनिटात स्टॉपला पोहचलो.
बुद्ध विहार असलेल्या या लेण्या नंतरच्या काळात जोगेश्वरी व घारापुरी लेणीप्रमाणे शैव/हिंदू/ब्राह्मण लेण्या म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. जोगेश्वरी लेणीच्या काळातच येथील शिल्पकाम करण्यात आले असावे.लेणीच्या आवारात प्रवेश करताच एक दगडी फरशी बसवलेली वाट लेणीकडे जाते.
दोन्ही बाजूला बाग विकसित करण्याचे काम सुरु आहे
थोडेसे पुढे जाताच लेणी नजरेस पडते.
चार खांब असलेला एक भव्य मंडप आहे. या मंडपावरूनच लेणीचे नाव 'मंडपेश्वर' पडले असावे. मंडपातून गर्भगृहात प्रवेश करण्याच्या आधी एक भग्न नंदी व अलीकडच्या काळातील अजून एक नंदी आहे.
गर्भगृहात शिवलिंग आहे. हा लेणीचा पूर्वीचा सर्वात मोठा विहार. याच्या दोन्ही बाजूला विहार आहेत.
लेणीच्या 'L" आकाराच्या बाजूला एक विहार असून त्यात मात्र एक मोठा शिल्पपट दिसतो तो थोडयाफार बऱ्या स्थितीत आहे.
या शिल्पपटात नटराज दिसत आहे.
वरील उजव्या कोपऱ्यात यक्ष/गंधर्व आहेत.
डावीकडील वरच्या भागात ब्रह्मदेव आहे.
त्या खाली डाव्या बाजूस बहुतेक लकुलीश व शिष्य असावेत, (जोगेश्वरीच्या लेणीतही लकुलिशाचे शिल्प होते. लकुलीशाबद्दल माहिती जोगेश्वरीच्या लेखातील लिंक मध्ये दिलेली आहे).
डाव्या बाजूस खाली वाद्य वाजवणाऱ्या दोन व्यक्ती दिसत आहे.
खाली उजव्या बाजूस तीन स्त्री प्रतिमा आहेत. त्यातील मधली पार्वती असून हा शिव पार्वती लग्नाचा पट आहे असे सांगतात पण मधली स्त्री पार्वती असावी असे वाटत नाही.
(या सर्व शिल्पांबद्दल जाणकारांनी भर घालावी. विषेशतः प्रचेतस यांनी)
अजून काही अवशेष व कोरीव काम व पाण्याचे टाके
सोळाव्या शतकात हा भाग पोर्तुगीजांकडे आला. त्यांनी लेण्याचे रूपांतर चर्च मध्ये केले. एक शिल्प तोडून त्याजागी कोरलेला क्रूस याची साक्ष देतो.
ही लेणी असलेल्या टेकडीला पोर्तुगीज 'माउंट पोईनसर' म्हणत. याचाच अपभ्रंश होऊन लेणीला मंडपेश्वर नाव पडले असेही सांगितले जाते.
टेकडीवर जाण्याची वाट
टेकडीच्या वर दगडी चर्चच्या बांधकामाचे अवशेष आहेत. मधे एक पॅसेज व त्याच्या दोन्ही बाजूला अनेक खोल्या आहेत. कदाचित येथील खोल्यांचा वापर पोर्तुगीज सैनिकांनी राहण्यासाठीही केला जात असेल.
टेकडीवर लेणीच्या आवाराबाहेर चर्च आहे व ख्रिश्चन लोकांची एक स्मशानभूमीही दिसते.
इ.स.१७३९ मध्ये मराठ्यांनी स्वारी करून हा प्रदेश काबीज केला. त्यानंतर कित्येक वर्ष हा भाग ओसाड पडला. विसाव्या शतकात या स्थळाचा परत शोध लागून त्याला पुरातत्व वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले.
टेकडीहून उतरून परत एकदा बाहेरूनच लेणीचे दर्शन घेतले.
बोरिवली स्टेशनला परत आलो. भूक लागली होती. स्टेशनबाहेरच एक सुरभी नावाचे हॉटेल दिसले त्यात शिरलो. 'तट्टे इडलीची' ऑर्डर दिली. मस्तपैकी वर तूप घातलेली आणि गन पावडर (पोडी चटणी) भुरभुरलेली इडली समोर आली. छान चव होती.
इडली खाता खाता भक्तीताईचा लेख तट्टे इडली पोडी आठवला हे वेगळे सांगायला नकोच
थोडे अवांतर: लेणी बघायला जास्त वेळ लागला नाही. आमच्याजवळ भरपूर वेळ होता. 'क्वीन्स नेकलेस' पाहायचे ठरले. बोरिवली-चर्चगेट लोकल पकडली आणि चर्नी रोडला उतरलो आणि बाजूलाच असलेल्या मारिन ड्राइव्हला पोहचलो. अजूनही समोर कोस्टल रोडचे काम सुरु आहे. चर्नी रोडहून मारिन लाइन्सकडे येताना मात्र काम पूर्ण होऊन पदपथ वापरासाठी खुला झाला आहे. समुद्राला भरती असल्याने लाटा किनाऱ्यावर आपटून उंचच्या उंच उसळत होत्या. अधून मधून पावसाचा शिडकावा होत होता.
मस्त वातावरण होते, एक-दिड किलोमीटर पदपथावर चालत फेरफटका मारला आणि शिवाजी महाराज टर्मिनसला येऊन परतीच्या प्रवासासाठी बेलापूर लोकल पकडली.