सह्याद्रीच्या बाजूबाजूने एक रोडट्रिप

बर्‍याच महिन्यात आम्हा तिघा मित्रांची निखळ अशी रोडट्रिप केली नव्हती, तो योग अचानक आला. मित्राने नवी कोरी इनोव्हा हायक्रॉस हायब्रीड घेतली होती, पण त्यातून आमचं फिरणं झालं नव्हतं. सरता पावसाळा होता. १६ सप्टेंबरची रात्र. मित्राचा रात्री साडेअकराला फोन आला. मी नेहमीप्रमाणेच लवकर झोपत असल्याने झोपेतच फोन घेतला. "अरे आपल्याला उद्या पहाटे पाच साडेपाचला माळशेजला जाण्यासाठी निघायचंय, तेव्हा तयार राहा, 'दुसराही येतोय" बरं म्हणालो. मी रोजच तसाही पहाटे पाचलाच उठत असल्याने गजर लावायची गरज नव्हती. साडेचार पावणेपाचला उठलो, आवरत होतोच तितक्यात पहिल्याचा फोन आला. "अरे आपल्याला मुक्काम करायचाय आणि उद्या संध्याकाळी परत येऊ", मी म्हणालो, अरे त्या दुसर्‍याला रविवारी एका दहाव्याला जायचंय तेव्हा तो मुक्काम करायचा नाही", पहिला बघू म्हणाला. नेमके माझ्याकडे त्या पहाटे कधी नव्हे ती वीज गेलेली. अंधारात कपडे शोधणे महमुश्किल काम असतं, तसंच आवरलं आणि मुक्कामाच्या कपड्यांचा सेट सॅकमध्ये टाकला, तेव्हढ्यात पहिला पोहोचलाच. वाटेत त्याने दुसर्‍याला फोन करुन कपड्यांचा एक्स्ट्रा सेट घेऊन ठेव असे सांगितलेच होते. पावणेसहापर्यंत दुसर्‍याच्या घरापर्यंत पोहोचलो. तो मुक्कामाला यायला तयार नव्हता पण त्याला आम्ही बोललो, " तू इतरांच्या दहाव्याला जातोस पण तुझ्या दहाव्याला आम्हीच येणार आहोत तेव्हा गुपचूप चल" असे बोलून त्याला सेंटी केला आणि आम्ही निघालो.

आठ वाजेपर्यंत आकाशला पोहोचलो. मस्तपैकी नाष्टा केला आणि आळेफाट्यावरुन माळशेज घाटाच्या दिशेने निघालो. पाऊस अजिबात नव्हता मात्र वातावरण एकदम ढगाळ, मस्त होते. ओतूर गेल्यावर सह्याद्रीची सुरेख रांग दिसू लागते. उजवीकडे हटकेश्वर तर डावीकडे पिंपळगाव जोगा धरणाचा जलाशय. हटकेश्वराच्या माथ्याभोवती ढगांवर फेर धरला होता. करंजाळे, जिथून शिंदोळा दिसतो, तिथपर्यंत रस्ता अगदी मख्खन होता. मात्र वेळ खिंडीपासून पुढचा रस्ता प्रचंड खराब, खड्डेयुक्त. खिंड पार करुन अगदी हळूहळू पुढे सरकत होतो. आता उजवीकडे मात्र ढग मात्र धरणावर उतरले होते, पावसाला सुरुवात झाली होती. माळशेजला जाण्याआधी खुबीच्या अलीकडे खिरेश्वरला वळून नागेश्वर मंदिर आणि तिथले लेणे आम्हाला बघायचे होते. मात्र धुक्याचा लपेटा इतका वाढला होता की खिरेश्वर फाटा अजिबातच दिसला नाही. तसेही एव्हढ्या गडद धुक्यात तिथे जाण्यातही काही पॉईंट नव्हता. आता धरणाचा फुगवटा तर धुक्यात पूर्णपणे दिसेनासा झाला होता. बाजूलाच मस्त गवताळ खडकाळ मैदान दिसत होते. साईडला गाडी थांबवली आणि निसर्गाचे विभ्रम बघत बसलो.

a

मध्येच एक चिखलभरली वाट अज्ञाताकडे जात होती

a

सगळीकडं हिरवंगार झालं होतं.

a

इथून माळशेज घाट अगदी जवळ. मुक्कामासाठी माळशेज एमटीडीसीसारखी उत्तम जागा इतरत्र नाही. वाटलं होतं, आज आख्ख्या पर्यटक निवासात आम्हीच असू, अगदी आतमध्ये शिरल्यावर देखील कोणीच दिसत नाही. बुकिंग काऊंटरवर खोलीची चौकशी केली तर सगळं फुल. म्हटलं ठिके, हरकत नाही, इथं नाही तर दुसरीकडे बघू. एमटीडीसी मात्र सह्याद्रीच्या मुख्य धारेला लागूनच असल्याने दरी बघण्यासाठी येथेच पाठच्या बाजूला आलो. आलो तर काय सगळंच धुकटात बुडून गेलेलं. धुकटंही वर वर चढू लागलेलं, इतकं की परतीची वाट हरवून जावी.

a

a

सप्टेंबरचे दिवस असल्याने पाऊस उणावला होता, सोनकी फुलायला लागली होती.

a

गाडी काढून घाट रस्त्याला लागलो. वाटेत मुक्कामाची शोधली, त्यात कशेळेनजीकचं एक फार्म हाऊस उपलब्ध दिसलं ते बुक करुन टाकलं. घाटात अजिबात पाऊस नव्हता, धबधब्यांना अगदी बारीक पाणी होतं, गर्दीही नव्हती. ढग मात्र अगदी ओथंबून आले होते.

a

घाट पूर्ण उतरल्यावर काही विशिष्ट ठिकाणांवरुन सह्याद्रीची अप्रतिम धार दिसते. मात्र ढगांमुळे ती आज लुप्त झाली होती. एका हॉटेलवर चहा घेण्यासाठी थांबलो. तिथून सह्याद्री अतिशय सुंदर दिसत होता.

a

इथले खरे आकर्षण म्हणजे भैरवगडाच्या सुळक्याचे जो येथून अप्रतिम दिसतो पण तो ढगांच्या बुरख्याआड पूर्णपणे झाकला गेला होता. ढगांची चादर हटावी म्हणून थोडी प्रतिक्षा केली आणि त्याने हलकेच दर्शन दिले.

ढगांआड झाकलेला भैरवगड

a

ढगांचा पडदा हटल्यावर त्याचे झालेले रौद्र दर्शन

a

काय ती देखणी कातळभिंत

a

भैरवगड पाहून पुढे निघालो, नानाचा अंगठा मात्र झाकलेलाच राहिला, तिकडच्या ढगांनी त्याला काही डोके वर काढू दिले नाही. रस्त्याच्या आजूबाजूला हिरवे हिरवे गार गालिचे सर्वत्र पसरलेले दिसत होते.

a

a

येथून जाताना सह्याद्रीची आहुपे घाटाकडील बाजू दिसते, आहुपे घाट, सिद्धगड अगदीच जवळ दिसतो. सह्याद्रीची आडवी पसरलेली कातळभिंत सतत आपल्या डावीकडे दिसत असते.

a

आहुपे घाट, सिद्धगड, गोरखगड

a

गोरखगड आणि मच्छिंद्र सुळक्याचे अगदी जवळून वेधक दर्शन होते.

a

बेलाग सह्याद्री

a

वाटेत निसर्गाने परत सामावून घेतलेले एक टुमदार पण पडिक घर दिसले.

a

कशेळे गावातून फार्महाऊसला आलो, दुपारचे जेवण केले आणि गप्पा मारत बसलो. अधून मधून जोरदार सरी बरसत होत्याच. येथून कोथळीगडाच्या पायथ्याची आंबिवली सताठ किमीवर, रात्री अंधारात थेथे जाऊन फेरफटका मारुन आलो. . दुसर्‍या दिवशी येथे उजेडात यायचेच होते. रात्री निवांत गप्पा मारून सकाळी परत भटकायला निघालो.

आंबिवलीच्या वाटेवरुन पदरगडाचे जबरदस्त दर्शन होते.

a

तर उजवीकडे कोथळीगड दिसत राहतो.

a

समोर तर आख्खी भीमाशंकराची रांग दिसत राहते. येथे सोलनपाडा नावाचे लहानसे धरण आहे. ऐन पावसाळ्यात येथे तुफ्फान गर्दी असते, पण आता सरत्या पावसाळ्यात येथे फक्त आम्हीच होतो. विलक्षण सुंदर असे ठिकाण. धरणाच्या मुख्य बांधाच्या खाली विविध पातळ्यांवर पायर्‍यांसारखे लहान लहान बांध आहेत, त्यावरुन पाणी फेसाळत वाहात असते. तर ह्याच्याच अगदी पुढ्यात भीमाशंकर डोंगररांगेची अजस्त्र भिंत

a

सोलनपाड्याच्या इथून दिसणारा पदरगड आणि भीमाशंकरची रांग

a

सोलनपाडा धरण

a

सोलनपाड्याच्या पाठीमागील भीमाशंकर रांगेत आहे खेतोबा आणि येथून जवळच वाजंत्री घाटाने भीमाशंकरास जाता येते.

भीमाशंकर रांग

a

भीमाशंकर रांग

a

तर उजव्या अंगाला कोथळीगडाचे दर्शन सतत होत राहते.

a

सोलनपाड्यावरुन परत माघारी फिरलो. येथे आंबिवली गावाच्या जवळच आहेत आंबिवली लेणी. मुख्य रस्त्यापासून थोड्या आतल्या बाजूला नदीच्या काठावरील डोंगरातील खडकात हे बौद्ध शैलगृह खोदले गेले आहे. येथे चैत्य नसून केवळ एक विहार आहे. व्हरांड्यात असलेले पर्सिपोलिटन धर्तीचे स्तंभ, आतमध्ये एक मोठा विहार आणि विहारात असलेले विश्रांतीकक्ष अशी याची रचना. ओसरीतील स्तंभांवर एक ब्राह्मी लिपीतला शिलालेख आहे, ज्याची अक्षरे पुसट झाल्याने ह्याचे वाचन नीट करता येत नाही. स्तंभांवर कसलेली कोरीव काम नाही. चौरसाकार तळखडा, त्यावर अष्टकोनी स्तंभ, त्यावर उपडा घट, त्याच्यावर आमलक आणि त्यावर हर्मिकेसारख्या उतरत्या पायर्‍यांची रचना. असे एकूण चार स्तंभ येथील छताला आधार देत आहेत.

आंबिवली लेणी

a

प्रवेशद्वाराच्या दोन्ही मुख्य स्तंभांच्या तळखड्याच्या चौकटीत दोन द्वारपाल कोरलेले आढळतात.

a

एका स्तंभावर एक शिलालेख कोरलेला आढळतो.

a

विहारांतील विश्रांतीकक्षात नंतरच्या काळात हिंदू देवतांच्या मूर्ती स्थापन केलेल्या आढळतात.

a

विहार

a

एकंदर स्थापत्यशैलीवरुन आंबिवलीचे हे बौद्धलेणे इसवी सनातल्या दुसर्‍या/ तिसर्‍या शतकातले असावे असे वाटते.

a

लेणीच्या पुढ्यातच वाहती नदी आहे. उन्हाळ्यात ही सुकून जात असणार.

a

a

आंबिवली लेणी पाहून आम्ही परतीचा प्रवास सुरु केला आणि कर्जत खोपोली मार्गाने जुन्या मुंबई पुणे महामार्गाने परत आलो. माळशेज घाटाने उतरुन बोरघाटाने वरती आल्यामुळे वाटेत सह्याद्रीच्या डोंगररांगा, कडे, सुळके, किल्ले, लेणी, नद्या, झाडी अशा विविधांगांचे सुरेख दर्शन झाले.