निवडणूक जाहीराती, समाज माध्यमांवरील तुम्हाला आवडलेल्या, न आवडलेल्या?

मतदानपुर्व कल बघण्यासाठी मी सर्वसाधारणपणे ओपीनीयन पोल्स आणि सोबतीला गूगल ट्रेण्ड्स्वर लक्ष ठेऊन असतो (पहा गूगल ट्रेन्ड्स २०२४ ). या दोन्हीतही मोदींचे अद्यापतरी एकंदर वर्चस्व दिसते. सोबत युट्यूब चाळत असल्याने आपसूक त्यावर येणार्‍या जाहीरातींकडे लक्ष जाते या जाहीरातींच्या प्रभावाला क्वांटीफाय करणे तसे अवघडच पण व्ह्यूज, त्यावर आलेले प्रतिसाद आणि प्रत्येकाला स्वतःला जाणवलेल्या प्रभावाबद्दल सामुहीक चर्चेतून जरासा अंदाज येऊ शकेल आणि काही प्रमाणात रोचक चर्चा होऊ शकेल.

माझे यापुर्वी सोशल मिडीयावरील राजकीय जाहीरातींकडे फारसे लक्ष गेले नव्हते. या आठवड्यात प्रथमच लक्ष गेले. व्यक्तीशः भाजपाच्या जाहीरातीत नकारात्मकतेवर अधिक भर, काँग्रेसच्या जाहीरातीच्या तुलनेत कमी प्रभाव क्षमता आणि कमी व्ह्यूज आहेत का अशी शंका आली किंवा काही चांगल्या प्रभावी जाहीराती माझ्या नजरेतून सुटल्या असेही असू शकेल, नाही असे नाही.

* तुम्हाला आवडणार्‍या पक्षाच्या आवडत्या जाहीरातीसोबतच, आवडणार्‍या पक्षाच्या न आवडणार्‍या जाहीराती आणि न आवडणार्‍या राजकीय पक्षाच्या आवडलेल्या जाहीरातीही मनमोकळेपणाने नोंदवाव्या. किंवा मतमोजणीच्या आधी कबुल करावेसे वाटले नाही तरी मत मोजणी झाल्या नंतर का असेना मनमोकळे पणाने सांगितल्यास संबंधीत पक्षांना झाला तर फायदाच होईल.
* मी स्वतः युट्यूब किंवा समाज माध्यम दुवे दिलेले नाहीत पण त्यांचा आंतर्भाव केल्यास बरे पडेल.
* प्रश्न मुख्यत्वाने २०२४ लोक्सभा निवणूकातील समाज माध्यमांवरील तुम्हाला आवडलेल्या न आवडलेल्या निवडणूक जाहीराती कोणत्या? असा आहे अनुषंगिक जुन्या निवडणूक जाहीरातींचे स्मरण करून देण्यास हरकत नसावी.

* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतर, धागाचर्चा हॅक करणे आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार.