शैतान सिनेमा आणि १०८ कन्यादान

बरेच दिवस झाले थिएटरात गेलो नव्हतो, काल अजय देवगणचा शैतान पाहून आलो. कथा, सादरीकरण, चित्रीकरण वगैरे ठीकठाक आहे; पैसे खर्च करून मुद्दाम जाऊन बघण्यासारखा काही नाही. OTT वर पाहिला तर ठीक आहे.

हिंदी सिनेमांतून सातत्याने केली जाणारी हिंदू धर्म, श्रद्धा, परंपरा, उपासनापद्धती यांची हेटाळणी हिंदूंना इतकी अंगवळणी पडली आहे कि आजकाल त्यात फारसे कुणाला काही वावगे वाटत नाही. इतर असंख्य हिंदी सिनेमांप्रमाणे हा सिनेमा देखील हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अपमान करतो.

चित्रपटात वनराज नावाचा खलनायक आणि कबीर व त्याचे कुटुंब अशी पात्रे आहेत. कबीरच्या तरुण मुलीला वनराज वशीकरणाद्वारे कह्यात घेतो. अघोरी शक्ती प्राप्त करण्यासाठी त्याला तिच्यासहित एकूण १०८ मुलींचा बळी द्यायचा असतो. कबीरला "तुझ्या मुलीला माझ्यासोबत पाठव" असे सांगताना तो "कन्यादान" असा शब्दप्रयोग अनेक वेळा करतो.

सन्मार्गाने केली जाणारी सात्विक ईश्वरोपासना, दुराचाराने केली जाणारी दुष्ट अघोरी शक्तींची उपासना आणि इतरही अनेक प्रकार हे विशाल हिंदू धर्म परंपरेचा भाग आहेत. त्यांतील अयोग्य भागाबद्धल चर्चा होऊ शकेल. तथापि प्रत्येकाची स्वतःची अशी एक चौकट आहे. ती morpf करून वेगळ्याच स्वरूपात दाखवण्याचा प्रयत्न करणे हे अयोग्य आहे.

१. १०८ हा अंक हिंदूंच्या सात्विक उपासना पद्धतीतील एक पवित्र अंक आहे. अघोरी उपासनेतही हा अंक वापरला जात नाही. "अघोरी शक्ती प्राप्त करण्यासाठी १०८ मुलींचा बळी" अशी मांडणी अगदीच अस्वीकारार्ह आहे.

२. कन्यादान हा हिंदू सामाजिक परंपरेतील एक महत्वपूर्ण, पवित्र आणि गंभीर भाग आहे. कन्याबळीशी त्याची तुलना करणे हे अगदीच अस्वीकारार्ह आहे.