अविस्मरणीय लिंगाणा...

दुर्गराज श्रीमान रायगडावरून, राजवाडा, राजसदर वा जगदीश्वर मंदीर असो की भवानी टोक, तिथून साधारण पुर्वेला पाहिलं की एक सुळका त्याच्या वैशिष्ट्यपुर्ण आकाराने लगेचंच लक्ष वेधून घेतो. तिथून, उंचीला तो श्रीमान रायगडाच्याही वरचढ भासतो. वातावरण स्वच्छ असेल तर त्या सुळक्यामागे एक विस्तीर्ण पठार ही नजरेस पडते, श्रीमान रायगडावरून जेव्हा-जेव्हा हा सुळका नजरेस पडायचा तेव्हा-तेव्हा तो मनात एक आव्हान पेरायचा, जणु काही "आहे का हिंमत माझ्या वाटेला यायची ? " असंच विचारतोय असं वाटायचं.

1

पण असं कितीही वाटलं तरी हा सुळका चढून जाणे हे काही येरागबळ्याचे काम नाही, तिथे अस्सल डोंगरभटक्या जातीचे महानुभाव ते ही प्रस्तरारोहण आणि रॅपलिंग या दोन्ही आव्हानांसाठी अगदी पुर्ण तयारीने व जीव तळहातावर घेऊन जरी इथं आले तरी ही यशासाठी व पुन्हा सुखरूप परतण्यासाठी त्यांना या सुळक्याच्या दयेवरचं अवलंबून राहावं लागतं. असा हा बेलाग सुळका म्हणजेच पोटात स्वराज्याचे कारागृह घेऊन वर शिवलिंगासमान आकार धारण करणारा सुप्रसिद्ध लिंगाणा किल्ल्याचा सुळका... आणि त्यामागील वैशिष्टयपुर्ण व विस्तीर्ण असं पठार म्हणजे रायलिंग पठार.

2

२०२३ या वर्षातील भटकंतीचा शेवट हा सह्याद्रीच्या कुशीतच करावा असा संकल्प होता व तो निःसंशय अविस्मरणीय तथा शारीरिक-मानसिक कणखरतेची कसोटी पाहणारा असायला हवा म्हणून निवड केली होती ती डोंगर भटक्यांना आव्हान देणाऱ्या अतिदुर्गम अशा लिंगाणा सुळक्याची आणि दिवस निवडला तो २०२३ या वर्षाचा शेवटचा दिवस.

लिंगाणा आरोहन खचितच सोपं नाही पण लिंगाण्यापर्यंत नुसतं पोहोचणंही कसोटी पाहणारं आहे. ३० डिसेंबरला दुपारच्या सुमारास लिंगाणा मोहिमेच बिगुल वाजलं. त्याच दिवशी लिंगाणा ट्रेक जिथून सुरू करायचा त्या मोहरी गावात मुक्कामाला पोहोचायचं होतं. तिथे पोहोचल्यावर सर्व ट्रेकिंग गियर्स ताब्यात घेऊन दुसऱ्या दिवशी ३१ तारखेला भल्या पहाटे २ वाजता उठून साधारण तीन-साडेतीन दरम्यान लिंगाणा चढाई मोहीमेला सुरवात होणार होती.

3

लिंगाण्याला पुण्यावरून जाण्यासाठी सध्या प्रचलित असलेला मार्ग म्हणजे पुण्यावरून चेलाडी(नसरापूर) फाट्यावरून आत वळून वेल्हा गाठायचं, वेल्ह्यावरून भट्टी-वाघदरामार्गे केळद खिंडीतून उजव्या हाताला वळून सिंगापूर-मोहरी गाव रस्ता पकडायचा, या रस्त्याने साधारण आठ-दहा किलोमीटर अंतराची ऑफ रोडींगसदृश्य ड्राईव्ह तुम्हाला मोहरी गावात पोहोचवते. केळद खिंडीपर्यंत आरामात पोचता येत, तिथून पुढे साधारण एकदीड किलोमीटर सिंगापूर रस्त्याने पुढे आलो की माती-फुफाटा आणि त्यात मध्येच मोठमोठे दगड गोटे आणि वर परत खड्डे यांनी बनलेला एक अस्सल मोटोक्रॉस टाईप रस्ता समोर येतो. या रस्त्याने आपल्या वाहनाची जमेल तितकी काळजी घेत अगदी हळू-हळू पुढे सरकावे लागते.

8

एकलगाव फाट्याच्या दोन-तीन किलोमीटर अलीकडे धारेवरून जाणारा तीव्र चढाचा रस्ता आहे. रस्ता म्हणजे फूटभर खोलीचा मातीचा ढिगारा आणि मध्येच मोठमोठे गोटे आणि या सगळ्याला तीव्र चढाचा सत्तर ऐंशी मीटरचा बिनशर्त पाठिंबा अशी त्याची अवस्था, या तीव्र चढावरून वाहनं वर चढवणं प्रचंड डोकेदुखीचं काम आहे. इथुन गाडी सुरक्षित वर नेण्यासाठी आम्हाला तासभर त्या माती-फुफाट्यात झटावे लागले. त्यापुढचा रस्ता ही थोड्याफार फरकाने तसाच आहे. त्यामुळे अनपेक्षित असा उशीर होऊन मोहरीत पोहोचायला अंधार पडला. मोहरी गावातही रस्त्याचे काम सुरु असल्याने गाडी पार्क केलेल्या जागेपासून अंधारात माती-फुफाट्याच्या रस्त्याने साधारण अर्धा किलोमीटर चालत मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो.

मोहरी या अवघ्या दहा-बारा उंबऱ्यांच्या गावातील मुक्कामाचं ठिकाण म्हणजे दगडी बांधकामातील एक भक्कम घर व त्यासमोर प्रशस्त अशी पडवी, या पडवीतच ट्रेकर्सचा राबता असतो. पडवीतल्या एका कोपऱ्यात चुलीवर जेवण बनवले जाते व पडवीतच पंगती बसतात. झोपण्यासाठी, काही ट्रेकर्स जशी जागा मिळेल तशी काही आतील खोल्यात तर काही बाहेर पडवीतचं पथारी पसरतात. मोहरीचे सरपंच यांच्या मालकीचे हे घर, ते व त्यांचे इतर काही नातेवाईक मंडळी मिळून ट्रेकर्ससाठी ही सेवा देतात. गावातील इतर काही घरांमध्येही विनंतीवरून जेवण व मुक्कामाची सोय होऊ शकते.

5

गावात पोहोचल्यावर, चहाची वेळ टळून गेल्याने व लवकर झोपणे गरजेचे असल्याने हातपाय धुवून लगेच जेवणाला बसलो व जेवल्यावर घरात पथारी पसरून झोपायचा प्रयत्न केला, तिथे आधीपासून उद्याच्या आमच्या प्रवासातील काही अनोळखी साथीदार मोठ्या आणि चित्रविचित्र आवाजात घोरत होते. आम्ही उशिरा पोहोचल्याने तोंडओळख झाली नव्हती. पुढच्या तासाभरातचं या घोरण्याच्या आवाजांना शरण जात आम्ही आमची पथारी पडवीत हलवली. बाहेर जोरदार वारा वाहत होता पण आतील तुलनेत शांतता होती त्यामुळे तास-दीड तास झोप झाली.

पहाटे अडीच वाजता उठून आन्हिके उरकली व लगोलग सेल्फ अँकरसाठी गरजेचा टेप स्लिंग अंगावर चढवला आणि चढाई व रॅपलिंगसाठीची हारनेस + कॅरॅबिनर, डिसेंडर, ग्लोव्हज ही इक्विपमेंट बॅगेत ठेवली. हेल्मेट चढवून सर्व १४ ट्रेकर्स साडेतीनच्या सुमारास तयार झाले व सुरक्षेच्या सर्व सुचनांची उजळणी करून ट्रेकला सुरुवात झाली.

4

मोहरी गावातून रायलिंग पठाराकडे जाणाऱ्या वाटेला रायलिंग पठार जवळ येता-येता एक फाटा फुटतो जो आपल्याला बोराट्याच्या नाळेकडे घेऊन जातो. या नाळेत जिथून उजव्या हाताला लिंगाण्याचा शिवलिंगासारखा उंच आकाशात गेलेला सुळका जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत खाली उतरून सुळका पुर्णपणे दिसू लागतात रायलिंग पठाराच्या डोंगराला चिकटून असणारा ट्रॅव्हर्स रूट घेऊन, लिंगाणा व रायलिंग पठाराला जोडणाऱ्या खिंडीत पोचता येतं. हाच आहे लिंगाणा क्लाईम्बचा बेस पॉईंट. इथून वर लिंगाणा चढाई तर खाली उतरणारी वाट लिंगणमाची व पुढे पाने गावाकडे जाते. राजगड ते श्रीमान रायगड रेंज ट्रेक करणारे बहुतेक सर्व ट्रेकर्स हीच वाट वापरून श्रीमान रायगडाकडे मार्गस्थ होत असतात.

श्रीमान रायगडच्या बाजूने येणाऱ्या लोकांना अगोदर पाने गावात यावं लागतं. तिथून लिंगण माचीकडून लिंगाणा व रायलिंग पठार जोडणाऱ्या खिंडीपर्यंत चढाई करून लिंगाणा क्लाइम्बच्या बेस पॉईंटला पोहोचता येतं. महाड भागातून ही इथं पोहोचता येतं.

22

रायलिंगच्या वाटेवर अंधारात टॉर्च आणि चांदण्यांच्या उजेडात साधारण तासाभरात आम्ही बोराट्याच्या नाळेजवळ पोहोचलो. इथून सुरू होते ती बोराट्याच्या नाळेची अवघड अशी उतरण. टॉर्चच्या प्रकाशात मोठमोठ्या शिलाखंडांना कधी झटत तर कधी वळसा घालीत अगदी हळूहळू एकेक जण ही नाळ काळजीपुर्वक उतरत जातो. संपुर्ण नाळ ही लूज रॉक्सने भरलेली आहे. छोटे-मोठे दगड कधीही सरकून घरंगळू शकतात म्हणून हेल्मेटशिवाय नाळेत उतरण्याच साहस करू नये हेच उत्तम. पाऊण तास नाळेतून उतरल्यावर आम्ही साखळीच्या पॉइंटला पोहोचलो, हा अवघड टप्पा उतरून आल्यावर उजव्या बाजूला गडद अंधारात हजारभर फूट उंचीच्या काळ्याकभिन्न सुळक्याचं पहिल्यांदाचं इतक्या जवळून दर्शन झालं. याचं जागेवरून ट्रॅव्हर्सला सुरुवात होते. रायलिंग पठाराचा डोंगर एका बाजूला व दुसऱ्या बाजूला तीव्र उताराची घसरडी दरी व मध्ये फूट-दोन फुटांची चिंचोळी वाट... अवघड ठिकाणी जिथे वाटच नाही तिथे लावलेल्या रोपला सेल्फ अँकर टाकीत रोपवर लोड न देता पुढे सरकावे लागते. हे सर्व रात्रीच्या अंधारात होते व खालची दरी अंधारात बुडालेली असल्याने तिचं रौद्ररूप समोर दिसत नसल्याने हा टास्क सोपा होतो असंचं म्हणावं लागेल कारण दिवसाउजेडी दरी दिसत असताना ट्रॅव्हर्स मारायला काळीज मजबुतचं असायला हवं हे परतीच्या वेळी समजतं.

7

साधारण वीस मिनिटात ट्रॅव्हर्स रूट पुर्ण करून आम्ही बेस पॉइंटला पोहोचलो. इथे पोहोचून हारनेस चढवलं, इतर सर्व इक्विपमेंट, हेल्मेट तपासून व्यवस्थित चेक करून घेतली. या बेसपॉईंट पासून ते समिट पॉईंटपर्यंत रोप फिट करण्यात येतो, पुर्ण क्लाइम्ब दरम्यान सेल्फ अँकर या रोपमध्ये कनेक्ट असणार होता, स्टेशन आणि बोल्टस दरम्यान सेल्फ अँकर काळजीपूर्वक शिफ्ट करण्याच्या सक्त सुचना सर्वांना देण्यात आल्या होत्या. धोकादायक क्लाइम्बिंग लोकेशन्सना बिले देण्यात येणार होता. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व गोष्टी परफेक्ट होत्या. आता बाकी खेळ हा ट्रेकर्सच्या शारीरिक आणि त्याहीपेक्षा मानसिक कणखरतेचा होता.

9

सकाळी सहा-सव्वा सहाच्या आसपास बेस पॉईंटपासुन क्लाइम्बला सुरुवात झाली.

१००० फूट लिंगाणा क्लाइम्बचे सहा ते सात स्टेशन्स केलेले असतात. शिवाय मध्ये बोल्ट पॉईंट्स ही असतात, दोन बोल्ट पॉइंट्सच्या दरम्यान एका वेळी एक क्लाइम्बर या पद्धतीने चढाई सुरू झाली. सेल्फ अँकर केलेल्या मुख्य रोपवर अजिबात भार न टाकता, खडकातील खाचा, उंचवटे जिथे हातपाय मजबुतीने रोवता येतील अशा जागा शोधत, हात आणि पाय यांच्या स्नायूंचा योग्य ताळमेळ राखण्याचा प्रयत्न करीत एकेक टप्पा चढून जायचा होता. एखादा सटकलाच तर सेल्फ अँकर शिवाय बिलेही मदतीला होता. गुहेपर्यंतच्या काही मोठ्या टप्प्यांमध्ये आणि काही ठिकाणी तर अगदी नव्वद अंशाच्या कोनातील सरळसोट चढाई करीत आम्ही साधारण साडेसात वाजण्याच्या सुमारास गुहेच्या स्टेशनवर पोहोचलो.
10

पुर्वेला, शुक्राची चांदणी अगदी ट्रॅव्हर्स सुरू झाल्यापासून ते सुर्योदयापर्यंत सोबतीला होती, क्षितिजावर लाली पसरू लागल्यावर तिने निरोप घेतला व त्यानंतर काही मिनिटात सुर्यनारायण अवतीर्ण झाले. संपुर्ण लाल-पिवळ्या रंगात न्हालेलं पुर्वेकडील क्षितिज, हळूहळू उजाडात जाणारा परिसर, दूरवर दिसणारी शांतपणे पहुडलेली गावे अशी सर्व अनुपम दृश्ये गुहेपर्यंत पोहोचण्याच्या दरम्यानच्या काळात मन:पटलावर कोरली जात होती.

6

गुहेच्या स्टेशनवर, उजव्या हाताला छोट्याशा ट्रॅव्हर्सवर गुहा तर विरुद्ध दिशेला, डाव्या हाताला पुन्हा एका छोट्याशा ट्रॅव्हर्सवर पाण्याचं टाकं आहे. हे पाणी पिण्यायोग्य आहे. इथे बाटल्या पाण्याने पुन्हा भरून घ्यायला व लिड्सला पुढची तयारी करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून आम्हाला छोटासा ब्रेक मिळाला. या वेळात आम्ही टाके ते गुहा संपुर्ण परिसर नीट पाहून घेतला.

ह्या पॉइंटपासून समोर रायलिंग पठाराचा पुर्ण डोंगर दृष्टिपथात येतो. इतरही अनेक सुळके, नाळ-घळ वाटांच्या खुणा दिसतात, कोकणदिवा किल्ल्याची शिखरे दिसतात. पाने गाव, काळ नदीचे खोरे पाहता येते. विरुद्ध दिशेने, दापोली गाव, वाळणकुंड ही गावे दिसतात. दूरवर महाडची वसाहत ही पाहता येते.

13

या ब्रेकनंतर इथून पुढे गुहेच्या वरच्या भागात असलेल्या दोन अतिशय अवघड स्टेशनदरम्यानची चढाई सुरू झाली. हात व पाय मजबुतीने खडकात रुतवत, हळूहळू एकेक टप्पा पार करीत आम्ही पुढे जाऊ लागलो. इथे भणानणाऱ्या वाऱ्यांनी आमचं स्वागत केलं. रायलिंग आणि लिंगाणादरम्यानच्या चिंचोळ्या खिंडीतून पास होताना त्यांना भलताच जोर चढत होता. शिवाय या टप्प्यावर लिंगाणा निमुळता होत गेल्याने ट्रेकर्स अशा पॉईंटसवर असतात जिथे दोन्ही बाजूला दरी असते व मधल्या पट्टीत सेल्फ अँकरच्या भरवशावर तुम्हाला या भन्नाट वाऱ्यांशी सामना करीत पुढची चढाई करावी लागते. इथून दिसणाऱ्या धडकी भरवणाऱ्या पण तितक्याच सुंदर अशा रौद्रभीषण दृश्यांचा आनंद घेत काळजीपुर्वक चढाई सुरू राहते. मधल्या काही धोकादायक टप्प्यांवर संपुर्ण टप्प्यात एकावेळी एकचं क्लाइम्बर चढून जातो, लिड्सला ही पुढच्या तयारीला वेळ लागतो , चढाई सुरक्षितपणे हळूहळू सुरू राहते.

12

एव्हाना लिंगाणा समिट खुणावू लागलेला असतो, हाता-पायांचे स्नायु सततच्या ताणामुळे दुखू लागलेले असतात, थोडा वेळ बसल्यावर त्यांना पुन्हा कामाला लावणे जड जाऊ लागलेलं असतं. पण शेवटच्या दोन टप्प्यांना बिलेची गरज पडत नाही, निव्वळ सेल्फ अँकर वर ही चढाई पार पडते व ठीक दहा वाजुन सदतीस मिनिटांनी आम्ही समिटवर असतो व पुढ्यात डौलाने फडकणारा भगवा जरीपटका तर त्याच्या पार्श्वभुमीला अवघ्या मऱ्हाटजणांचा मानबिंदू, दुर्गराज श्रीमान रायगड भक्कमपणे उभा दिसत होता.

20

राजसदर व जगदीश्वर मंदीर व छत्रपती महाराजसाहेब समाधी परिसर तर अगदी सहज ओळखू येत होता. या अलौकिक दृश्यापुढे नतमस्तक होत महाराजसाहेबांना लिंगाण्यावरूनच मुजरा करीत जयघोष केला. नंतर, संपुर्ण परिसराचं अवलोकन करण्यात, श्रीमान रायगडाभोवतीचे इतर सहयोगी दुर्ग ओळखण्यात, पुरातन घाटवाटांच्या खुणा शोधण्यात, डोंगरांचे वैशिष्ट्यपुर्ण आकार न्याहाळण्यात काही वेळ गेला.

11

पहाटे साडेतीनला सुरू झालेला ट्रेक अकरा- पावणे अकराच्या सुमारास समिटवर आता निम्म्या टप्प्यावर पोहोचला होता. लिंगाणा समिटवर साधारण अर्धा तास घालवून, सभोवतालचा ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला परिसर मनात साठवत भारलेल्या अंतकरणाने लिंगाणा सुळक्याच्या निरोप घेतला.

23

बारा वाजण्याच्या सुमारास लिंगाणा समिटवर डौलाने फडकणाऱ्या भगव्या जरीपटक्याचा निरोप घेतला व डिसेंडला सुरुवात केली. सुरवातीचा टप्पा हा सेल्फ अँकरवरचं काळजीपुर्वक उतरून पहिल्या रॅपल स्टेशनवर पोहोचलो. पुन्हा एकदा, हारनेस, हेल्मेट व्यवस्थित चेक करून घेतले, बॅगेतून ग्लोव्हज काढून ते हातात चढवून पहिल्या रॅपलिंग टप्यासाठी सज्ज झालो. खाली उतरणाऱ्या धारेला पायांच्या आधाराने हळूहळू समांतर होत खाली उतरू लागलो. खाली पोहोचून लगेच दुसऱ्या रॅपल स्टेशनकडे कूच केले, एक-एक करीत ते ही सर्वजण उतरून गेले. एखादं दुसरा थोडा अडखळायचा, धडपडायचा, घाबरायचा ही पण नंतर सावरून, धीर एकवटून पुन्हा कड्याला भिडायचा...दुसरा पर्याय तरी होता कुठे ???

14

दोन-दोनच्या टप्प्यात बिले असल्याने त्यापुढील टप्प्यावर जाण्यासाठी आधीचे टप्पे सर्व ट्रेकर्स ओलांडून येणे गरजेचे होते. त्यामुळे रॅपलिंग जरी फास्ट होत असली तरी पुढील टप्प्यावर बिले पोहोचून सेटल होण्यासाठी सर्वांना वाट पहावी लागत होती. खालच्या मोठ्या रॅपल स्टेशन्सदरम्यान तर वेट टाईम अजूनच वाढण्याची शक्यता होती. याशिवाय, लीड्सला शेवटचा ट्रेकर्स खाली आल्यावर पुन्हा वरच्या स्टेशनवर जाऊन फिक्सड रोप काढून घ्यायचं काम होतं. जे वेळखाऊ होतं. एकुणात, लिंगाणा उतरताना पुन्हा एकदा संपुर्ण परिसराचं अगदी आरामात पोटभर विहंगावलोकन करण्यासाठी भरपूर वेळ हाताशी होता.

21

साधारण तासाभरात सर्वजण गुहेच्या वरच्या स्टेशनवर पोहोचलो, तिथून पुर्ण डिसेंडमधला सर्वात मोठा सलग दीडशे-पावणे दोनशे फूट सरळ धारेचा रॅपल पॉईंट होता. सरळ धारेला अधेमध्ये आत गेलेले रॉक पॅच आणि बाहेर जोरदार वाहणारा वारा असा सगळा मामला होता. या पॉईंटवरून रॅपल करीत जाताना पहिल्यांदाच खांदे भरून आले व थकवा जाणवू लागला. अवसान गोळा करून हा टप्पा उतरून गुहेच्या स्टेशनवर पोहोचलो.

15

सुदैवाने, गुहेच्या स्टेशनवरचं आता ब्रेक होणार होता. एक-एक करून जस-जसे ट्रेकर्स खाली उतरत होते तसे गुहेकडे जेवणासाठी जात होते. जेवण करून व थोडेफार फिरून जवळपास सर्वचजण जागा मिळेल तिथे आडवे झाले, काही जण तर लगेच घोरु ही लागले. वरचे सगळे रोप्स काढीत, गोळा करीत तासाभराने सर्व लीड्स ही तिथे पोहोचले. त्यानंतर त्यांचेही जेवण व थोडा वेळ आराम झाला. हा ब्रेक अंमळ जास्तच लांबला, पावणेचारच्या सुमारास लीड्स पुढील रॅपल पॉइंटसच्या तयारीला गेले व साधारण चारच्या सुमारास पुन्हा ऍक्टिव्हिटी ला सुरुवात झाली.

18

आता पुढे तीन ते चार टप्प्यात रॅपल व अधेमध्ये सेल्फ अँकर वर डिसेंड असा मामला होता, पुढील दीड तासात सर्वजण बेस पॉईंटला पोहोचले होते, जसे ट्रेकर्स बेस पॉईंटला पोहोचत होते तसे एक एक करून रायलिंग ट्रॅव्हर्सकडे व पुढे बोराट्याच्या नाळेकडे मार्गस्थ होत होते. आम्ही सर्वात शेवटी होतो. दिवस कलल्यावर बेसला पोहोचून ट्रॅव्हर्स घेतला, आता खालची संपुर्ण दरी नजरेच्या टप्प्यात होती, घसरडी वाट, एका बाजूला कडा तर दुसऱ्या बाजूला दरी असा कुठल्याही चुकीला अजिबात थारा नसलेली वाट चालत, खालची काही ठिकाणी ठार मोकळी तर काही ठिकाणी थोडाफार झाडांचा आधार असलेली दरी, दरीच्या पोटात बऱ्यापैकी जंगल दिसत होतं. इथून काळजीपुर्वक चालत, मधल्या दोन ठिकाणी, जिथे वाटच नाही तिथे लावलेल्या रोपला सेल्फ अँकर टाकीत आम्ही बोराट्याच्या नाळेत पोहोचलो.

17

आता समोर बोराट्याच्या नाळेची खडी चढण होती. संपुर्ण नाळ ही अजस्त्र खडक, छोटेमोठे दगड यांनी भरलेली लूज रॉक्स प्रकारातील आहे. त्यामुळे इथून चालणं अत्यंत धोकादायक आहे. पुढे चालणाऱ्यांच्या पायाने एखादा छोटा मोठा दगड कधी घरंगळत तुमच्या दिशेला येईल याचा नेम नाही, सुरक्षित अंतर ठेवत इथून वाटचाल करावी लागते. दिवसभराच्या खडतर वाटचालीनंतर नाळेची मोठमोठ्या शिलाखंडांमधून जाणारी खडी चढण, शारीरिक क्षमतेची परीक्षा पाहते, आधीच्या आव्हानात्मक क्लाइम्ब आणि डिसेंडमुळे मांड्या, खांदे, पोटऱ्या, तळहात सगळंच थकलेले असतात, त्यात बोराट्याच्या नाळेची चढण अंत पाहते. पण ती चढून जाण्याशिवाय दुसरा कोणता पर्यायही नसतो. ठिकठिकाणी थांबे घेत, एकमेकांचा उत्साह वाढवीत, साधारण पाऊण-एक तासात अंधार पडता-पडता आम्ही नाळ चढून वर पठारावर आलो. पठारावर येऊन थोडा वेळ बसतो न बसतो तो गुडुप अंधार झाला.

16

या अवघड टप्प्यानंतर नाळेच्या तोंडाशी थोडावेळ आराम केला, सर्व खडतर टप्पे आता संपले होते याचा दिलासा तर होता पण शरीरातील सर्वच स्नायु आता पुरते थकले होते, कालपासूनची जवळपास नसलेली झोप व दिवसभराचा शारीरीक-मानसिक कणखरतेची परीक्षा पाहणारा ट्रेक याचा परिणाम आता जाणवू लागला होता. अजून ही मोहरी गावापर्यंतचा तासाभराचा ट्रेल बाकी होता. कुरकुरणाऱ्या हाडां कडे दुर्लक्ष करीत पुन्हा एकदा कपडे झाडीत उठलो, टॉर्च बाहेर काढले व गच्च काळोखातून चालत मोहरी गावची वाट धरली.

शरीरातील ऊर्जा पुर्णपणे संपली होती, पहाटे उत्साहाच्या भरात सहज पार केलेल्या रायलिंग पठार ट्रेलने परतीच्या मार्गावर चांगलीच परीक्षा पाहिली, शेवटच्या टप्प्यात तर शरीर केवळ यांत्रिकपणे पाय उचलत होतं. कसंतरी सलग चालत तासाभरात मोहरी गाव गाठलं व बॅगा पडवीच्या ओसरीत टाकून सर्व इक्विपमेंट्स काढून पाच एक मिनिटे शांत पडून राहीलो. नंतर चेहरा- हातपाय धुतल्यावर जरा बरं वाटू लागलं.

19

साडेसात वाजून गेले होते व पडवीत जेवणाच्या तयारीची लगबग सुरू होती. गरमागरम तांदळाच्या भाकरी, आख्ख्या मसुराची भाजी, भात, कढी, पापड, लोणचं असा सुग्रास बेत होता. पुढच्या दहा मिनिटात पानावर बसलो व भरपेट जेवलो. जेवणानंतर जरा तरतरी आली पण निवांत बसायला वेळ नव्हता. मोहरी ते केळद खिंडीदरम्यानचा दहा किलोमीटरचा मोटोक्रॉस लेव्हल अगदी निर्जन असा रस्ता मनात धडकी भरवत होता. रात्रीच्या अंधारात मोठमोठ्या दगडगोट्यांमधून वाट काढीत न चुकता गाडीसहीत सुखरूप बाहेर पडण्याचं आव्हान होतं.

झटपट बॅगा भरल्या, सर्वांचा निरोप घेतला व चालत गाडी पार्क केलेल्या जागी पोहोचलो, बॅगा गाडीत टाकल्या व गाडी काढली. अगदी संथ गतीने, मजल दरमजल करीत तब्बल तासाभराने केळद खिंड गाठली व चांगल्या रस्त्याला लागल्यावर सुटकेचा निःश्वास टाकला. तिथून पुढेही विशेष घाई न करता रात्री पावणे एकच्या दरम्यान घरी पोहोचलो.

श्रीमान रायगडाच्या दुर्गसंरक्षक फळीतील पुर्वेकडील एक महत्त्वाचा असा किल्ला म्हणजे लिंगाणा, तब्बल 3 हजार फुट उंचीचा व राजगड-तोरणा ही जोडगोळी आणि श्रीमान रायगड यांच्या मध्यभागी वसलेला दुर्गम गड. सुळक्याचीच उंची साधारण अकराशे फूट भरावी. शिवकाळात कारागृहाची भूमिकाही याने पार पाडलीय. लिंगाणा चढाई ही तयारीच्या ट्रेकर्सचाही कस पाहते, तब्बल बारा ते चौदा तासांची ही सलग ऍक्टिव्हिटी शारीरिकचं नाहीतर मानसिक कणखरतेचीही परीक्षा पाहते. बोराट्याची नाळ तथा रायलिंग ट्रॅव्हर्स या अतिशय धोकादायक जागा आहेत, शिवाय चढाईदरम्यान सुद्धा कुठलीही दयामाया लिंगाणा दाखवत नाही त्यामुळे नवख्या ट्रेकर्सनी याच्या वाटेला पुर्वतयारी तसेच थोडाफार पुर्वानुभव असेल तरचं जाणे श्रेयस्कर.

24

याशिवाय सिंगापूर-मोहरीचा दुर्गम परिसर, या परिसरात तग धरून राहणारे आदिवासी-शेतकरी लोक, त्यांचं रोजचं खडतर आयुष्य, साधं वाणसामान आणण्यासाठी ही आठ-दहा किलोमीटरची पायपीट, मुलांना चौथीपुढच्या शाळेसाठी किमान दहा किलोमीटरची रोजची पायपीट, आरोग्यसेवा वगैरे हे तर वेगळ्याच लेखाचा विषय.....

असो... बऱ्याच वर्षांपासुन बकेट लिस्टचा भाग असणारा एक आव्हानात्मक किल्ला सरत्या वर्षाच्या संध्येला सर करता आला हाचं काय तो आनंद.....