फोरिए सीरीज - अजुन एक चिंतन

प्रस्तावना :
सर्वप्रथम म्हणजे मी काही उच्च शिक्षित गणितज्ञ वगैरे नाहीये, थोडंफार स्टॅटिस्टिक्स शिकलो आहे, अ‍ॅप्लाईड मॅथेमॅटिक्स नाही, प्युअर तर नाहीच नाही. ह्या आधी केलेले अन अन ह्यानंतर होणारे सर्व लेखन हे वरवरील आकलनावर आधारित असुन हेच अंतिम सत्य आहे असा काही माझा दावा नाही. कोणी वेल ट्रेन्ड गणितज्ञ यदाकदाचित हे वाचेल अन ह्या अर्धवट ज्ञानाची खिल्ली उडवेल तर त्याला काही ही हरकत नाही.

आणि दुसरं म्हणजे हे सारं स्वांतःसुखाय अर्थात स्वतःच्या समाधानाकरता आहे. काहीकाही समविचारी लोकांना कळतं ही बात अलहिदा , पण मुख्य उद्देश म्हणजे आपलं आपल्याला कळलं पाहिजे, लक्षात राहिलं पाहिजे अन जगता आला पाहिजे. मग इतरांना काहीही का वाटेना !

ये नाम केचिदिह नः प्रथयन्त्यवज्ञां
जानन्ति ते किमपि तान्प्रति नैष यत्नः।
उत्पत्स्यते तु मम कोऽपि समानधर्मा
कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी॥ -मालतीमाधवम् १-६ - भवभूति

________________________________________________________________________

हां तर फोरिए सीरीज . मॅथेमॅटिकल अ‍ॅस्पेक्ट कळला , त्याचं अध्यात्मिक कनेक्शन लावलेलं ही कळालं पण ह्याचा नक्की उपयोग कसा करायचा , पंत ? आता रोज काय आपल्याला हिमालयाच्या कुशीत जाऊन बसता येणार आहे का ? इथं राहुन काय करया येईल बोला.

सी, परत एकदा , फोरीए सीरीज काय आहे की कोणतेही पिरियोडिक फंक्शन घ्या , ते तुम्ही साईन आणि कोसाईन च्या वेगवेगळ्या फ्रीक्वेन्सी च्या इन्फायनाईट सम मध्ये लिहु शकतो . आता ह्याची अ‍ॅनालॉजी आपण शिखरे आणि दर्‍या ह्यांच्याशी कशी लागते हे मागच्या भागात पाहिलं पण आता अजुन एक नवीन अ‍ॅनालॉजी.

आपल्या मेंदुत सतत काही ना काही विचार चालु असतात. निर्विचार अवस्था निद्रे व्यतिरिक्त क्वचितच अनुभवायला मिळते. नाहीतर काही ना काही विचारांची आंदोलने चालुच असतात. आता आपण जर ह्या विचारांकडे लक्षपुर्वक पाहिलं तर अखंड सतत नवीन विचार सुचत नसतात, बहुतांश विचारांचे पुनरावर्तन होत असते ! अर्थात मनातील विचार हे एक पिरीयॉडिक फंक्शन आहे ! अर्थात मग त्याची फोरीए सीरीज लिहिता येईल ! बिंगो ! मग सगळ्या विचारांमध्ये एक काहीतरी डॉमिनिएटिंग विचार असेल , माझ्यासाठी तो लोकेशन स्पेसिफिक असतो , उदाहरणार्थ जसे की आपण पुण्यात आहोत . मग त्याला अनुसरुन इतर विचारांच्या फ्रीक्वेस्नी आहेत , जसे की ऑफिस सम्बंधित विचार - तिथलं पॉलिटिक्स, प्रमोशन , अप्रेझल बोनस, नेक्स्ट मूव्ह वगैरे . घरासंबंधी विचार असतात मग त्यात घर , गाडी , पोरांच्या शाळा तब्ब्येती , घरातलं राजकारण, वगैरे वगैरे , मग काही लाईट फ्रिक्वेन्सी असतील , मिपावरचे मित्र त्यांच्या सोबत भेटीगाठी, गावाकडचे मित्र , काही जुन्या मैत्रीणी काही नव्या मैत्रीणी , काही गुलाबी फ्रिक्वेन्सीज, काही टर्कॉईज फ्रिक्वेन्सीज वगैरे वगैरे .

अशा अनेक भिन्न विचारांचे मनात आवर्तन चालु असते ! खरं आहे की नै ! दॅट्स ईट . ह्याच त्या वेगवेगळ्या फ्रीक्वेन्सीज आहेत ज्या तुमच्या मनाची मनःस्थिती ठरवत आहेत . यु फाऊन्ड द फोरीए सीरीज ऑफ युवर मेन्टल थॉट्स !

आता कल्पना करा की तुम्ही ह्यातील एकेक फ्रेक्वेन्सी हटवत गेलात , तर त्या विचारांची आवर्तने थांबतील ( हळूहळू का होईना पण थांबतील हे निश्चीत. ) पाण्यात दगड मारतो म्हणुन तरंग उठतात , दगड मारायचे थांबलं की तरंग आपोआप शांत होतात , लगेच नाहीत होणार पण हळूहळू होत जातील हे नक्की . असे करत करत शुन्य फ्रिक्वेन्सी उरल्या कि काय होईल ???

योगसुत्रांमध्ये महर्षी पतंजली म्हणत आहेत की -

योग: चित्तवृत्तिनिरोधः ॥ १.२ ॥

योग म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसुन चित्तात उठणार्‍या वृत्तींचे निरोधन करणे !
पण चित्त म्हणजे नक्की काय ? समजा मन म्हणजे कसे की तलावाचा पाण्याच्या पृष्टभाग म्हणजे मन आहे, चित्त म्हणजे त्या पृष्टभागाच्या खाली जी सघन पाण्याची अवस्था आहे तीला चित्त म्हणता येईल, आणि वृत्ती आणि वासना मध्ये फरक काय ? तर वासना म्हणजे त्या तलावात टाकलेल्या दगडाने पाण्याच्या पृष्टभागावर उमटलेले तरंग आहेत पण हे असे तरंग उमटुन उमटुन सखोल पाण्याची चित्ताची जी अखंड चंचल रहाण्याची जी टेंडन्सी तयार झाली आहे ती म्हणजे वृत्ती आहे ! ह्या चित्तात उमटणार्‍या वृत्तींना आपल्या कह्यात आणणे म्हणजे योग अर्थात राजयोग आहे !

जाऊं दे द्या, सुत्रांविषयी नको बोलायला , ते फारच अ‍ॅब्स्टॅक्ट आहे. मुळात शुन्य फ्रिक्वेन्सी विचार करता येणे हेच अ‍ॅक्स्ट्रॅक्ट आहे .

त्या पेक्षा विचार करा की - समजा विचारांची फक्त एकच फ्रिवेन्सी ठेवली की काय उरेल ! हां थोडा व्हाईट नॉईज असेल सुरुवातीला , त्याला पर्याय नाही पण मुख्य विचार एकच , एकच फ्रिक्वेस्नी .

ह्या अवस्थेलाच तुकोबा एकविध भाव असे म्हणत आहेत

आम्हां आम्ही आतां वडील धाकुटीं । नाहीं पाठीं पोटीं कोणी दुजें ॥१॥
फावला एकांत एकविध भाव । हरि आम्हांसवें सर्व भोगी ॥२॥
तुका म्हणे अंगसंग एके ठायीं । असों जेथें नाहीं दुजें कोणी ॥३॥

हा एकविध भाव , ही एक डॉमिनेटिंग फ्रिक्वेन्सी तुकोबांच्यासाठी पांडुरंग आहे ,

आणिक दुसरें मज नाहीं आतां । नेमिलें या चित्तापासुनियां ॥१॥
पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनीं । जागृतीं स्वप्‍नीं पांडुरंग ॥२॥
पडिलें वळण इंद्रियां सकळां ।भाव तो निराळा नाहीं दुजा ॥३॥
तुका म्हणे नेत्रीं केलीं ओळखण । साजिरें तें ध्यान विटेवरी ॥४॥

https://www.youtube.com/watch?v=8RIcdA5PK78

हा एकविध भाव इतका एकमेवाद्वितीय आहे की तिथे तो भाव ज्या मनात निर्माण होत आहे ते मनही नाही , तेही तद्भावरुपच झाले आहे ! ही अवस्था हळुहळु प्राप्त होत जाईल . हाच आपला एकाकडुन शुन्याकडील प्रवास असेल
१ > ०
.... ही अवस्था प्राप्त करायचे अनेक मार्ग आहेत , पण महत्वाचं काय तर एकविध भाव ! तो आधी साधला पाहिजे: माऊलींच्या शब्दात बोलायचे तर

मन हें राम जालें मन हें राम जालें । प्रवृत्ति ग्रासुनि कैसें निवृत्तीसी आलें ॥१॥
श्रवण कीर्तन पादसेवन कैसें विष्णुस्मरण केलें । अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन केलें ॥२॥
यम नियम प्राणायाम प्रत्याहार संपादिले । ध्यान धारणा आसन मुद्रा कैसे समाधीसी आले ॥३॥
बोधीं बोधलें बोधितां नये ऐसें जालें । बापरखुमादेविवरु विठ्ठलें माझें मीपण हारपलें ॥४॥

https://www.youtube.com/watch?v=c0yTIaNeEfw

आता बस एक फ्रिक्वेन्सी आहे . फक्त एकच . हा एकविध भाव . अन त्याहीपुढे जाऊन "तो भाव आहे" हे अनुभवणारे तुम्हीही त्यात विरुन जाल तेव्हा ती अनुर्वाच्च्य समाधानाची अवस्था असेल ...

न चैकं तदन्यद् द्वितीयं कुतः स्यात् न वा केवलत्वं न चाकेवलत्वम् ।
न शून्यं न चाशून्यमद्वैतकत्वात् कथं सर्ववेदान्तसिद्धं ब्रवीमि ॥ १० ॥ श्रीमत् शंकराचार्यकृत् दशश्लोकी

ज्याला मुळात "एक आहे" असेच म्हणता येत नाही , त्याला दुसरे असे काय असणार ? जिथे केवलत्व अर्थात एक आहे ही अवस्था नाही तिथे अकेवलत्व अर्थात अनेक आहे ही अवस्था तरी कशी असेल ! शुन्य नाही आणि शुन्य नाही असे म्हणणेही नाही , अशा त्या अवस्थेचे काय वर्णन करणार !

https://satsangdhara.net/shankar/dashashloki.htm

आणि कितीही वर्णन केलं तरी काय उमगणार ? आपण लाख शब्दांचे लेख पाडू - सातारचा कंदी पेढा कसा आहे, किती भारी आहे हे सांगायला शक्य आहे का ? ते वाचुन, ऐकुन उमगणारेच नाही, त्यासाठी स्वतः सातार्‍याला जाऊन पेढा खल्ल्यावरच कळेल . आणि ज्याला कळलं त्याला कितीही कळलं तरी त्यालाही ते वर्णन करुन सांगता येणारच नाहीये !

हे तो अनुभवाच्या गोष्टी !

दर्पणी पाहता रूप न दिसे वो आपुले | बाप रखुमादेवीवरे मज ऐसे केले ||
________________________________________________________________________
-
इत्यलम . मर्यादेयं विराजते .

लेखनसीमा
________________________________________________________________________