अमेरिका ८- मेल्टींग पाॅट

आम्ही मुलीकडे ज्या भागात राहतोय तिथं खरोखरच केवळ अठरापगड जातीच्या नाही तर अनेक विविध देशांमधून लोक रहायला येतात. इथल्या काही राज्यात तर मूळ अमेरिकन फारच कमी आणि बाहेर देशातून वेगवेगळ्या कारणांसाठी येणारे आणि आता इथेच स्थायिक होऊन इथलेच झालेले रहिवासी नागरिक जास्त आहेत. मेक्सिको - एशिया मधून हे प्रमाण अधिक आहे. त्यातही कॅलिफोर्निया, टेक्सास, फ्लोरिडा, न्यूयॉर्क, न्यू जर्सी ह्या राज्यांमध्ये हे प्रमाण सर्वात जास्त आहे. इथे मुद्दाम नमूद करावेसे वाटते की भारतातून येणाऱ्यांचे प्रमाण 6% आहे, तर मेक्सिकन लोकांचे 24% आहे. मात्र अनेक मेक्सिकन हे कामगार वर्गात भरती असतात, तर अनेक एशियन (यामध्ये भारतीय, चीन, कोरियन, फिलिपिन्स, तैवान असे सर्व) हे टेक्नॉलॉजी आणि व्यापार, वैद्यकीय अशा क्षेत्रात काम करण्यासाठी येतात. उच्चशिक्षित भारतीय 27% इथे येतात. त्यामुळेच इथल्या मूळ अमेरिकन माणसापेक्षा मुख्यतः भारतीय आणि अन्य आशियाई देशातील लोक जास्त अर्थाजन करतात. अर्थाजन जास्त करतात तसा मूळ अमेरिकनपेक्षा टॅक्सही खूप जास्त भरतात..त्यामुळेच इथल्या भारतीयांशी बोलले असता.. इथल्या इकॉनॉमीला, टेक्नॉलॉजीला, लॉजिकला आणि त्यामुळेच इथल्या जनतेसह देशाला 'आम्ही जगवतो' असा सार्थ अभिमान कॅलिफोर्नियात तरी जाणवतो.

भारतीय लोकांशिवाय इथल्या अनेक कंपन्या काम करू शकणार नाहीत. इथल्या राजकारण्यांनाही त्याची चांगलीच जाण झालेली आहे. त्यामुळेच अमेरिकन धोरणांमध्ये त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. हे सर्व भारतीय एका परीने दोन्ही देशांसाठी काम करत आहेत. प्रत्यक्ष भारतात न राहताही भारताला मदत होते. हे मी इथं राहणाऱ्यांचं अंध समर्थन करत नाहीये तर केवळ याकडे आपलं लक्ष वेधून, आपल्याच भारतीय विद्यार्थ्यांसह इथे राहू इच्छिणाऱ्यांच्या भावना मांडत आहे. इथल्या अभारतीय लोकांशी बोलताना असेही जाणवले की भारतीय सहकारी, कर्मचारी, मित्र-मैत्रिणी त्यांना जास्त सुरक्षित आणि सुहृद वाटतात. इथे जन्मलेल्या पुढल्या पिढीला अमेरिकन आणि मूळ देशातील संस्कृतीशी जमवून घेणं अवघड असलं तरी अशक्य नाही.

खरंतर प्रत्येक देशाच्या संस्कृतीमधील काही भाग आज इथे दिसतो. त्यामुळेच खरंतर मूळ संस्कृतीत अनेक संस्कृतींचा मिलाफ होऊन एक जास्त उन्नत - प्रगत आणि सक्षम - कणखर राष्ट्रसंस्कृती तयार झाली आहे. एखाद्या धातूच्या कमतरतेवर मात करण्यासाठी अन्य धातूंशी संयोग करून, मिश्रण करून, तप्त रस तयार करून त्या धातूचे मूल्य, उपयुक्तता वाढवली जाते ही प्रक्रिया 'मेल्टिंग पॉट'मध्ये होते. म्हणूनच अमेरिकेला 'मेल्टिंग पॉट' हे नाव सार्थ, यथार्थ वाटते.

इथे अनेक विविध संस्कृतींची उत्तम भेळ आणि मेळ दिसतो. भारतीय, थाई, मेक्सिकन, चायनीज, जपानी अशासह अमेरिकन रेस्टॉरंट मध्ये सर्व वर्णीय-वर्गीय- वयीन आणि देशीय लोक दिसतात. आनंदाने एकमेकांचे पदार्थ टेस्ट करतात...वेस्ट करतात! चायनीज रेस्टॉरंट मधील व्हेज स्प्रिंग रोल आणि आपल्याकडे भारतीय चायनीज रेस्टॉरंट मधील व्हेज स्प्रिंग रोल यात खरोखर जमीन अस्मानाचे अंतर आहे. इथे मिळणाऱ्या इडली सांबारला आम्ही 'लय भारी' रेटिंग दिले असले तरी, पक्के सांबारप्रेमी साउथ इंडियन त्याला 'नॉट गुड - नॉट बॅड' मोडवर ठेवतात.

इथे काळे- गोरे इतकेच वर्ण नाहीत तर वेगवेगळ्या संकरातून जन्मलेली मूलं दिसतात. मुल होणे हे इथल्या सुखी संसाराचं सार नाही. लग्न झालंच पाहिजे असे बंधनही नाही. त्याचप्रमाणे लग्न हे स्त्री-पुरुष असंच असेल असेही बंधन नाही. इथं LGBT किंवा LSBTअर्थात समलिंगी, उभयलिंगी लग्न सुद्धा थाटामाटात होतात. आम्ही आलो तो जून महिना तिथे त्यांच्या सन्मानार्थ 'Pride Month' म्हणून सहा रंगी झेंडे, फलक लावून साजरा होत होता. काही व्यक्ती अत्यंत मुक्तपणे तसे दर्शवणारे कपडे, हातात बॅण्ड घालून रॅली काढतात. केवळ संख्येने कमी आहोत आणि बहुजनांसारख्या त्यांना भिन्नलिंगी कामभावना होत नाहीत यामध्ये इथे त्यांची गळचेपी होताना दिसत नाही. खरंतर जगभरात बहुसंख्यांना भिन्नलिंगी आकर्षण वाटते यात त्यांचे 'स्वकर्तृत्व' काहीच नसते. यामध्ये या समलिंगी संबंधांना, आकर्षणाला बिभत्स, किळसवाणे म्हणून इथे कोणीही हेटाळणी करत नाही. तसेच या कामभावने व्यतिरिक्त अन्य सर्व भावभावना त्यांनाही असतात, त्याची कदरही इथे अधिक जाणवते. गे अथवा लेस्बियन कपल्सही या मेल्टिंग पॉटमध्ये समृद्धपणे नांदत असतात. आपण भारतात मात्र अनेकदा लैंगिकतेसह प्रांताचे, वर्णाचे, वंशाचे, पक्षाचे, झेंडे मिरवत संकुचित बेटं तयार करत माणुसकीलाच मेल्ट करतो..