भारतात फार कमी लोक स्वतःच्या तब्येतीची-आरोग्याची काळजी घेतात आणि नगण्य लोक मनापासून व्यायाम करतात. अस्मादिकही त्यास अपवाद नाहीत. 'केला पाहिजे' म्हणून, डॉक्टरनी विचारलं तर होकार भरता यावा म्हणून किंवा स्वतःला फसवणं थोडं सोपं जावं म्हणून जितका व्यायाम करणं आवश्यक असेल तेवढाच मी करते. याबाबत थोडा अवमान गिळून कबूल करते की 'कळतंय पण वळत नाही' च्या धर्तीवर 'पटतंय पण उठवत नाही.' अशी पहाटे साखरझोपेत अवस्था असते. व्यायाम हा केवळ प्रातःसमयी करण्याचा असल्याचा पूर्वजांचा योग्य सल्ला आणि आमचा सोयीस्कर गैरसमज आम्ही मोफत पाळल्याने 'भल्या पहाटे ते सकाळी लवकर' इतकाच वेळ व्यायाम करणे आम्ही योग्य मानले आहे. खाण्यासाठी मात्र पुन्हा स्वसोयीने पूर्वजांचा सल्ला आम्ही धुडकावून पार फाट्यावर नेऊन ठेवलाय.
अमेरीकेत मात्र भल्या पहाटे ते उशिरा रात्रीपर्यंत लोक कधीही, कितीही, कसाही, कोणताही व्यायाम करताना दिसतात. भल्या पहाटे आम्ही बळेबळे उठून फिरायला जावं तर आपल्या बाजूने एखादा सायकलस्वार घामाने डबडबून तरीही अत्यंत जोमाने सायकल हाणत असतो. (आम्ही फक्त खाद्यपदार्थ हाणतो!) कुणी श्वानप्रेमी आपल्या लाडक्यास थंडी वाजू नये म्हणून त्याला मुलायम स्वेटर मध्ये गुरफटून 'सेहत के साथ..कुत्ते के बाद!' असे श्वानासह फेरफटका मारत असतात. इथे टेनिस कोर्टावर, बास्केटबॉल-फुटबॉल एरियात, कुठलीही तक्रार, कुरकुर न करता एकलव्यासारखा कुणी एकटाच 'ग्रुप गेम' चा सराव करत असतो. कोणी जोडीने खेळत असेल तर एक घाम गाळलेला टी-शर्ट बाजूला ठेवून नव्या दमाने दुसऱ्या टी-शर्टला घामाच्या धारांनी पावन करायला लागतो. पळणारे, धावणारे, चालणारे आपापल्या ॲपनुसार अखंड नामस्मरणासारखे अखंड फिरत असतात. आपल्या आधीपासून आलेले, आपण पावलं घराकडे वळवली तरी फिरत-पळतच असतात. किल्ली दिलेल्या खेळण्यांसारखी अव्यहात हालचाल करत राहतात. कुणी एखादी फिरता-फिरता आपल्या घरच्यांशी गप्पा मारताना पाहून भारतीय मॉर्निंग वॉक आणि टॉक काकूंची आठवण मात्र नक्की करून देते.
दहा ते पाच या ऑफिसच्या वेळेत जिममध्ये कोण जातय? असा विचार करून आम्ही एकदा दुपारी जिम मध्ये गेलो..तर एक अत्यंत फिट तरुणी ट्रेडमिल वर सुसाट धावत होती. थोडी जरी दमली तरी स्पीड कमी करायची आणि पुन्हा सुसाट वेग पकडायची. एक ताई वाटणाऱ्या आजी तितक्याच शांतपणे सायकल चालवत होत्या.. तर अजून एक दोन जणही आपापल्या आवडीचा व्यायाम करण्यात मग्न होते.
मुलीच्या बॅडमिंटन कोर्टवर एक दिवस गेलो होतो. त्यावेळी रात्रीचे आठ वाजले होते. दार उघडून आत गेल्यावर अंदाजे 25-30 कोर्ट्सवर एखादी टूर्नामेंट चालावी तशी अनेक जण खेळत होते. काही ठिकाणी तर एकमेकांना अनोळखी व्यक्ती सुद्धा एकमेकांसोबत मॅचेस खेळत होत्या. विषय जाणवलेली गोष्ट म्हणजे त्या सर्व कोर्टवर बहुतांशी सर्व खेळाडू एशियन अर्थात चिनी, जपानी, भारतीय, कोरियन किंवा स्पॅनिश होते.
इथल्या अजून एका प्रकारच्या मॅचेसचा वेगळा प्रकार म्हणजे तुम्ही टीम म्हणून अंडर 80, अंडर 100, अंडर 110 खेळू शकता. याचा अर्थ विचारल्यावर फारच रंजक माहिती समजली. अंडर 80 मध्ये दोन्ही खेळाडूंच्या वयाची बेरीज 80 च्या खाली पाहिजे. त्यामुळे 55 वर्षांचे बाबा आणि 25 वर्षाखालील मुलगा एक टीम म्हणूनही खेळू शकतात. मुलीच्या बॅडमिंटन ट्रेनिंग कोर्ट वरही असंख्य फुलराण्या आणि राजे मनःपूर्वक प्रॅक्टिस करत होते. तिच्या चायनीज सरांनी 3 मोठ्या मोठ्या बास्केट्स भरून शटलस् आणली होती. प्रत्येकजण प्रॅक्टिस करत तरी होता किंवा प्रॅक्टिस घेत तरी होता. टाइमपास करत हसत खिदळत कडेला कुणीही बसलेले नव्हते. मुख्य म्हणजे कोणत्याही कारणास्तव मोबाईलवर रील पहात, व्हिडिओ पहात अथवा अवांतर वेळ न घालवता सगळेजण खेळत होते. रात्री 11 वाजता आम्ही कोर्टावरून निघालो तेव्हा कोर्टवरील स्टाफनेही आठ्या न घालता 'शुभ रात्री' म्हणून शुभेच्छा दिल्या.
व्यायामाच, फिटनेसच 'वेड' वाटावं इतका मनापासून व्यायाम करताना पाहून कठोर मेहनतीमुळेच क्रीडा क्षेत्रात हे देश पदकांची लयलूट करताना दिसतात. आमच्यासारखे मात्र 'आराम में राम है !' या वाक्यावर गाढ श्रद्धा ठेवून रामराज्य साकारत राहतात.