नाईन इलेव्हन - Twin To-Worse: प्रस्तावना

मंगळवार दिनांक ११ सप्टेंबर २००१, संध्याकाळी सात-सव्वा सातची वेळ.
रोजच्या प्रमाणे त्या संध्याकाळीही चकाट्या पिटण्यासाठीचा आमचा अड्डा असलेल्या एका मित्राच्या सायबर कॅफेवर आम्ही काही मित्रमंडळी हजर होतो.
आतमध्ये अमेरिकेतील आपल्या नातेवाईकाशी याहू मेसेंजरवर चॅट करत बसलेला एक नेहमीचा ग्राहक लगबगीने बाहेर आला आणि त्याने अमेरिकेतील 'वर्ल्ड ट्रेड सेंटरवर' विमान धडकल्याची त्याला नुकतीच समजलेली बातमी आम्हाला सांगितली.

त्या बातमीची शाहनिशा करण्यासाठी आम्ही तडक समोरच असलेल्या गोमंतक हॉटेलकडे धाव घेतली तेव्हा टीव्हीवर बातम्यांमध्ये ट्वीन टॉवर्स पैकी एका टॉवरवर विमान धडकून त्याला लागलेल्या आगीची आणि धुराच्या लोटांची दृश्ये वारंवार दाखवली जात होती.

पण अवघ्या काही मिनिटांत दाखवल्या जाणाऱ्या दृश्यांचे आणि बातमीचे स्वरूप बदलले. सुरुवातीला वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या उत्तरेकडील टॉवरवर विमान धडकून 'अपघात' झाल्याचे सांगणाऱ्या बातम्यांचा सूर बदलून सोळा मिनिटांच्या फरकाने दक्षिणेकडील टॉवरवर दुसरे विमान येऊन आदळल्यावर हा अपघात नसून 'घातपात' असल्याचे त्यात सांगितले जाऊ लागले आणि दोन्ही टॉवर्सना लागलेल्या भीषण आगीची दृश्ये पडद्यावर झळकू लागली

हॉटेलमध्ये पाहिलेली टीव्हीवरील दृश्ये आणि बातम्यांवर चर्चा करत आपापली घरे गाठल्यावर येऊन पाहतो तर प्रकरणाचे गांभीर्य आणखीनच वाढल्याच्या बातम्या पाहायला मिळाल्या. दहशतवाद्यांकडून अपहरण करण्यात आलेल्या एकूण चार विमानांपैकी दोन विमाने वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या नॉर्थ आणि साऊथ अशा दोन्ही टॉवर्सवर आदळली तर तिसरे विमान पेंटागॉनच्या पश्चिमेकडील भागावर आदळले आणि चौथे विमान शॅंक्सविल जवळ एका शेतात कोसळल्याचे समजले.

ह्या घटनेनंतर पुढे कित्येक दिवस टीव्ही वरची न्यूज बुलेटिन्स आणि वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने ९/११ च्या अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्याच्या बातम्यांनी व्यापून टाकले होते, तर याहूच्या देशो-देशींच्या चॅटरूम्स ह्याच विषयावरील चर्चांनी ओसंडून वहात होत्या हे आपल्यापैकी अनेकांनी अनुभवले असेल. आणि एकंदरीत त्या चर्चांचा सूर 'बरं झालं छान झालं... म्हातारीचं काम झालं' म्हणतात त्याप्रमाणे अमेरिकेचं नाक कापले गेल्याचा आनंद व्यक्त करणारा असल्याचे त्यावेळी अनेकांना प्रकर्षाने जाणवलेही असेल. सदानकदा इतरांच्या घरादारांची राखरांगोळी करण्याची खोड असलेल्या एखाद्याच्या घराला जर कोणी आग लावली तर त्याच्यावर जसा कौतुकाचा वर्षाव केला जाईल तसेच काहीसे ह्या हल्ल्यामागे अल-कायदा ह्या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे पुढे आल्यावर ओसामा बिन लादेनच्या बाबतीत झाले, जगभरातील अनेकांच्या नजरेत तो रातोरात 'हिरो' ठरून गेला!

अमेरिकेचा पूर्वइतिहास, दुसऱ्या महायुद्धात त्यांनी जपानविरुद्ध केलेला अणुबॉंब्जचा वापर, व्हिएतनाम युद्ध, भारतासाठी घातक असणारी त्यांची पाकिस्तानशी सलगी, अफगाणिस्तानात रशिया विरुद्ध लढण्यासाठी मुजाहिद्दीनांना केलेला अर्थपुरवठा आणि शस्त्रास्त्रांची मदत (जी पुढे भारतासाठी प्रचंड मोठी डोकेदुखी ठरली), मध्यपूर्वेतील अनेक देशांची केलेली राखरांगोळी आणि त्यातून झालेला नरसंहार अशा अनेक कारणांमुळे मला व्यक्तिशः अमेरिकेबद्दल आजतागायत कधीच आत्मीयता वाटली नसली तरी अमेरिका आणि अमेरिकनांविषयी तिरस्कार किंवा द्वेषही कधी वाटला नाही. त्यामुळे असेल कदाचित पण ९/११ च्या ह्या हल्ल्यात हजारो लोकांचा गेलेला बळी, असंख्य लोकांना आलेले कायमचे अपंगत्व आणि दिमाखदार ट्वीन टॉवर्सची झालेली भीषण दुरावस्था पाहून मन विषण्ण झाले होते.

ट्वीन टॉवर्सचा झालेला तो विध्वंस पाहून त्या परिस्थितीत १९९२ सालच्या 'होम अलोन २: लॉस्ट इन न्यू यॉर्क' (Home Alone 2: Lost in New York) ह्या चित्रपटाची आठवण आली नसती तरच नवल होते. ह्या चित्रपटात पहिल्यांदा पाहताक्षणीच प्रचंड आवडलेल्या ह्या दोन उत्तुंग मनोऱ्यांचे गतवैभव पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी संग्रहात असलेली त्याची व्हीसीडी कितीवेळा लावून त्यातला 'केवीन'च्या वर्ल्ड ट्रेड सेंटर भेटीचा आणि टॉवर वरून त्याने केलेल्या फोटोग्राफीचा प्रसंग रिवाइंड करून करून कितीवेळा पहिला असेल ह्याची मोजदात नाही.

९/११ च्या घटनेनंतर चित्रपटातील हा प्रसंग काही अमेरिकन दूरचित्रवाणी वाहिन्या दाखवत नाहीत असे ऐकून आहे.

दोन विमानांच्या धडकण्याने झालेल्या स्फोटांतून निर्माण झालेल्या प्रचंड उष्णतेने त्यांच्या उभारणीसाठी वापरलेले पोलाद वितळून अवघ्या काही तासांमध्ये दोन्ही टॉवर्स जमीनदोस्त झाले. ह्या विध्वंसातून निर्माण झालेला वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या अवशेषांचा ढिगारा साफ करण्यास आठ महिने लागले होते. ११ सप्टेंबर २००१ ला झालेल्या ह्या हल्ल्यानंतर तब्बल ४४२ दिवसांनी म्हणजे २७ नोव्हेंबर २००२ रोजी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश आणि अमेरिकन काँग्रेसद्वारे न्यू जर्सीचे माजी गव्हर्नर थॉमस किन ह्यांच्या अध्यक्षतेखाली एका चौकशी आयोगाची स्थापना करण्यात आली.

दहा देशांतील १२०० पेक्षा जास्त व्यक्तींची जबानी/चौकशी करून सुमारे पंचवीस लाख कागदपत्रांची पडताळणी करून झाल्यावर सदर आयोगाने तयार केलेला अहवाल २२ जुलै २००४ रोजी प्रसिद्ध करण्यात आला. प्रसिद्धीनंतर लगेचच सार्वजनिक करण्यात आलेला हा अहवाल विक्री आणि मोफत डाउनलोड करण्यासाठीही उपलब्ध करण्यात आला असला तरी बऱ्याच उशिराने म्हणजे साधारणपणे चार ते पाच वर्षांपूर्वी तो माझ्या वाचनात आला.

ह्या हल्ल्यात सहभागी झालेले सर्वच्या सर्व १९ दहशतवादी मृत्यमुखी पडले असले तरी वर म्हंटल्याप्रमाणे व्यापक प्रमाणात नोंदवल्या गेलेल्या जबान्या, त्यातून मिळालेली माहिती, छाननी केलेली गोपनीय कागदपत्रे / दस्तावेज आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारावर तयार करण्यात आलेला हा तपशीलवार अहवाल अपेक्षेपेक्षा जास्त चांगला आणि वस्तुनिष्ठ वाटला होता. एखाद्या थ्रिलर चित्रपटाची पटकथा वाटावी असे ह्या हल्ल्याचे केलेले नियोजन आणि अत्यंत व्यावसायिक पद्धतीने केली गेलेली त्याची अंमलबजावणी थक्क करणारी होती.

५८५ पानांच्या ह्या प्रदीर्घ अहवालाचे तुकड्या तुकड्यात वाचन सुरु असतानाच योगायोगाने २०१० साली प्रदर्शित झालेला 'फ्रोजन' (Frozen) हा हॉलीवूडपट माझ्या पाहण्यात आला. वास्तविक ह्या सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपटाचा आणि ९/११ च्या घटनेचा अर्थाअर्थी काहीच संबंध नाही पण त्यातल्या एका प्रसंगातील संवादाने एक वैचारिक कीडा डोक्यात सोडण्याचे काम मात्र केले होते.

एके रविवारी दोन कॉलेज विद्यार्थी मित्र आणि त्यातल्या एकाची प्रेयसी असे तिघेजण स्कीईंग करण्यासाठी एका स्की-रिसॉर्टला जातात आणि तिथल्या चेअर लिफ्ट ऑपरेटरच्या हलगर्जीपणामुळे म्हणा किंवा गैरसमजामुळे म्हणा पण रात्रीच्या वेळी त्यांना डोंगरावर घेऊन जाणारी चेअर लिफ्ट यंत्रणा बंद करण्यात आल्याने ते मध्यावरच अडकून पडतात.

बिघडणारे हवामान आणि सुरु झालेली हिमवृष्टी त्यात दुसऱ्या दिवसापासून म्हणजे सोमवार ते शुक्रवार स्की रिसॉर्ट बंद राहणार असल्याने अशा अडकून पडण्याच्या परिस्थितीत त्यांची भीतीने गाळण उडणे स्वाभाविक असते. भीती दूर करण्यासाठी काहीतरी गप्पा माराव्यात ह्या उद्देशाने एकजण 'कोणत्या प्रकारे आलेला मृत्यू सर्वात भयानक असतो?' असा, खरंतर त्या परिस्थितीत चुकीचा वाटणारा प्रश्न विचारतो.

त्यावर प्रश्नकर्ता स्वतःच भर समुद्रात सर्फिंग करताना शार्क माशाने खाल्ल्याने होणारा मृत्यू सर्वात भयानक असल्याचे मत व्यक्त करतो. त्यावर त्याची प्रेयसी 'जिवंतपणी आगीत जळून येणारा मृत्यू सर्वात भयानक असतो' असे उत्तरते आणि आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ ती ९/११ च्या घटनेचे उदाहरण देते. ती म्हणते ९/११ च्या घटनेनंतर मी टीव्हीवर वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीतून कित्येकांनी उडी मारतानाची दृश्ये बघितली होती, विचार करा इमारतीच्या आतली परिस्थिती किती भयानक असेल कि त्या लोकांनी जळून मरण्यापेक्षा इतक्या उंचीवरून उडी मारून मरणे पसंत केले!

अशा अर्थाचा हा संवाद मेंदूत कुठेतरी फिट बसला होता आणि लगेचच पुढच्या दोन-तीन दिवसांत आठवडा पंधरा दिवसांतून होणाऱ्या आम्हा काही जुन्या मित्रमंडळींच्या मैफिलीत सध्या काय वाचतोय/बघतोय टाईप चर्चेत ९/११ च्या रिपोर्टचा आणि ह्या संवादाचा विषय मी काढला होता.

आमच्या ह्या ग्रुपमध्ये मी आणि आणखीन एक मित्र अशा दोघांचा (तसा तो जगात अनेकांचा असेल) एक सामायिक छंद आहे. चित्रपटातील किंवा कथा-कादंबरीतील एखादा प्रसंगात मग तो काल्पनिक असो कि वास्तव, अथवा प्रत्यक्षात घडलेली एखादी घटना असो, त्या प्रसंगात / घटनेत सहभागी असलेल्या एखाद्या पात्राच्या भूमिकेत शिरून उपलब्ध तपशील, आपली कल्पनाशक्ती आणि जाणिवा-नेणिवांच्या बळावर त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून तो प्रसंग आभासीरीत्या अनुभवायचा, त्यांची त्यावेळी मन:स्थिती काय आणि कशी असेल ते अनुभवायचे, प्रसंग आनंददायी असेल तर त्यातला आनंद आणि थरारक असेल तर त्यातले साहस अनुभवायचे. खूप मजा येते अधून-मधून हा मानसशास्त्रीय प्रयोग करायला. पण अर्थात त्यासाठी एक 'विशिष्ट मूड' बनावा लागतो, कधीपण वाटले म्हणून केले असे होत नाही!

ह्या चर्चेतून उपरोल्लिखित प्रयोग करण्यासाठी आम्ही दोन पात्रे निवडली होती, त्यापैकी एक होते ९/११ च्या घटनेत अमेरिकन एअरलाईन्सचे बोईंग ७६७-२२३ ईआर हे विमान वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या नॉर्थ टॉवरवर धडकावून हल्ल्याची सुरवात करणारा 'मोहम्मद अट्टा' आणि दुसरे म्हणजे त्यावेळी नॉर्थ टॉवरच्या ९३ ते ९९ अशा सात पैकी कुठल्याही एका मजल्यावर उपस्थित असलेल्या, आणि खिडक्यांच्या काचांतून सुसाट वेगाने त्यांच्या दिशेने येणारा विमानरूपी यमदूत प्रत्यक्षपणे पाहणाऱ्या अनेक व्यक्तीं पैकी कोणीही एक, ज्याला आपण 'निनावी' म्हणूयात.

तर पहिल्यावेळी (जेव्हा मूड लागेल तेव्हा) आमच्यापैकी एकाने 'मोहम्मद अट्टाच्या' भूमिकेत शिरायचे तर दुसऱ्याने 'निनावी' पात्राच्या भूमिकेत शिरायचे आणि दुसऱ्यावेळी ह्या पात्रांची अदलाबदल करून हा प्रयोग पुन्हा करून आपल्याला आलेले दोन्ही अनुभव शेअर करायचे असे ठरले. त्याप्रमाणे थोडे दिवस लागले पण दोघांनी स्वतंत्रपणे घेतलेले दोन्ही अनुभव शब्दातीत होते!

वाचलेला ९/११ आयोगाचा अहवाल, फ्रोजन चित्रपटातील तो प्रसंग आणि वरीलप्रमाणे घेतलेले अनुभव ह्यांचा एकत्रित परिणाम म्हणून असेल किंवा तोपर्यंत मिपावर बरे-वाईट लेखन करू लागल्यामुळे 'आपणही लिहू शकत असल्याचा झालेला साक्षात्कार' कारणीभूत ठरला असल्याने असेल कदाचित पण ९/११ च्या घटनेवर एखादी दीर्घकथा/कादंबरी लिहावी ह्या विचाराने मला बराच काळ पछाडले होते, पण कालांतराने तो विचार बासनात गुंडाळून ठेवला गेला.
परवा प्रचेतस ह्यांच्या धाग्यावरच्या एका प्रतिसादात गवि साहेबांनी नाईन इलेव्हनच्या रिपोर्टचा विषय काढला आणि अडगळीत पडलेल्या माझ्या जुन्या विचारावरची धूळ झटकली गेली आणि पुन्हा त्याने नव्याने उचल खाल्ली.

समर्थ रामदास स्वामींनी म्हटले आहे 'केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे' त्या धर्तीवर 'लिहिल्याने होत आहे रे, आधी लिहिलेची पाहिजे' असा विचार करून ह्या प्रस्तावनेचा निमित्ताने नव्या लेखनाला सुरुवात तर केली आहे पण त्याचा पुढचा प्रवास कसा होईल, म्हणजे ती दीर्घकथा होईल?, कादंबरी होईल? कि निव्वळ लेख मालिका होईल? आणि हे लेखन पूर्ण होण्यास किती आठवडे, महिने, वर्षे लागतील ह्या विषयी मी तूर्तास तरी संपूर्णपणे अनभिद्न्य आहे.

"आगाज तो कर दिया हैं, अंजाम क्या होगा 'राम जाने'... चलो जो होगा देखा जायेगा और क्या!"

जय हिंद ! जय महाराष्ट्र !

पुढचा भाग :
नाईन इलेव्हन - Twin To-Worse: भाग १