काय आहे 'अज्ञात पानिपत'

काय आहे 'अज्ञात पानिपत'

गाभा :- अज्ञात पानिपत पुस्तकाच्या निमित्ताने ऐतिहासिक पुस्तकांचे वाचन.

'अज्ञात पानिपत'
( मराठी: इतिहास -संशोधन )
लेखक - मनोज दाणी
पाने ८३०.
(किंमत १३००रु, )
प्रकाशन Merven Technologies.,११ जून २०२३ . पुणे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्था इथून.
उपलब्ध : सह्याद्री बुक्स
ISBN 978-81956210-4-0

सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की ही ऐतिहासिक कादंबरी नाही. म्हणजे ऐतिहासिक नोंदींवरून वीरश्रीपूर्ण आणि भावनिक कथन असलेले पुस्तक नाही. तर आतापर्यंतचे जे कागदपत्र हाती आले त्यावरून आणखी नोंदी असलेले पानिपत कथन आणि त्या नोंदी अथवा कागदपत्रे याच पुस्तकात समाविष्ट केलेली आहेत. म्हणजे ती कागदपत्रे शोधणे नाही. प्रश्न पडतो की ही कागदपत्रे कुठे आहेत किंवा होती आणि ती अगोदरच्या पानिपत कथानकात विचारात का घेतली गेली नव्हती. पुण्याच्या अभिलेखागारात बरीच पत्रे पेशवे दप्तरात अजूनही आहेत. ती सर्व वाचायला परिश्रम हवेत. काही पत्रे जगातल्या विविध संस्थांमध्ये आहेत. ती पूर्वी तिथे जाऊन पाहावी लागत. परंतू आता संगणकीकरण आणि प्रसार (digitalisation and information technology)या मुळे कुठेही पाहता येतात. गूगल लेन्सने खूप सहाय्य दिले आहेच. शिवाय बरीचशी कागदपत्रे फारसी भाषेत,अरेबिक लिपीत आहेत. त्यातही तीन चार प्रकार आहेत. पण लेखक श्री मनोज दाणी यांनी तो प्रश्न सोडवला आहे. ते स्वतः ती लिपी आणि भाषा शिकले आहेत. याचा दुहेरी फायदा म्हणजे रुमाल/कागद ( ऐतिहासिक मूळ नोंदींना म्हणतात.) सापडले की ते कुणा जाणकारास दाखवून वाचून घ्यावे लागतील. मग त्यात काय लिहिलं यांचा संदर्भ आणि क्रमवार लावणे. हे सर्व लेखकाने आवड,हौस आणि छंद म्हणून केले आहे. पुण्यातील दोन इतिहासविषयक संशोधनाच्या संस्थांचे लेखक आजीव सभासद आहेत. त्यापैकी एक भांडारकर प्राच्यविद्या संस्थेतूनच ११जून २०२३ मध्ये हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. लेखकाच्या सहकार्यामुळे मला हे पुस्तक वाचायची संधी मिळाली.

मला शालेय जीवनापासूनच इतरांप्रमाणे पुस्तक वाचनाची आवड होती. पण पानीपत या विषयावरचे एकही पुस्तक किंवा लेख वाचले नव्हते. इतिहास विषयात जे काही दहा ओळींचे माहीत होते तेवढेच. मराठे आणि पेशव्यांच्या इतिहासाबद्दलही अधिकचे वाचन कधी केलं नाही. खरं म्हणजे माझ्या वर्गातल्या दोन मित्रांना याबद्दल तेव्हाही(आठवी -दहावी)खूप माहिती होती. कोणती लढाई कुठे कोणामध्ये झाली इत्यादी. पानीपत हा तर मराठी लोकांचा आवडता विषय. त्यावर ऐतिहासिक कादंबऱ्याही गाजल्या आणि सतत वाचल्या जातात.
दुसरा मोठा आवडता विषय म्हणजे १८५७चा उठाव. सावरकरांचे यावरचे पुस्तक(१८५७चे समर) आवर्जून वाचले जाते तेही वाचले नव्हते.ते आता वाचले. या अगोदर William Dalrymple यांचे The Last Mughal (2006)(The Last Mughal
https://archive.org/details/lastmughalfallof0000dalr ) वाचले होते. घटना एकच १८५७चा उठाव. पण समर पुस्तकातले लेखन हे वीरश्री पूर्ण भावनात्मक तर द लास्ट मुघल'मध्ये ऐतिहासिक नोंदी देत घटनाक्रम ओघवता लिहिला आहे. कुणाचीही बाजू न घेता , नोंदींतील उतारे देत,संदर्भ देत इतिहास उलगडला गेला आहे.जुनी चित्रे आणि फोटोही आहेत. त्यामुळे असे पुस्तक आवडू लागते.

एकूण इतिहास समजण्यासाठी अगदी तटस्थपणे घटनांकडे बघण्याची गरज असते ती थोडी नंतर येते.

या अवांतरानंतर पुस्तकाकडे वळूया.

'अज्ञात पानिपत'.या नावातूनच कळते की मराठी वाचकांना काही माहिती कथा कादंबऱ्यांतून झाली आहे. वाचनालयातून
पानीपत १७६१,त्र्यंबक शं शेजवलकर, प्रकाशन १९६१ हे मिळवून वाचले. हे ज्ञात पानीपत. पानीपत येथे दोन युद्धे,लढाया याअगोदर झाल्या होत्या. तिसरी लढाई मराठे विरूद्ध अहमदशहा अब्दाली यांच्यात झाली. मराठे महाराष्ट्र सोडून अब्दालीशी लढण्यासाठी दिल्लीच्या पुढे का गेले, एकमेकांचे किती सैन्य होते, सुरुवात कशी झाली, कोणी मराठ्यांना सहाय्य केले कोण फितूर झाले आणि शेवट कसा झाला हे दिले आहे. मराठ्यांकडून नाना फडणवीस(वय१८) आणि इतर शिंदे,होळकर सरदार पत्रे पाठवून घटना काय घडत गेल्या ते पत्रांनी पुण्याला पेशव्यांकडे पाठवत होते. मुघलांची टपाल व्यवस्था होती. काही पत्रे पोहोचवली जात तर काही हस्तगत होत.जी काही आहेत ती पत्रे 'पेशवे दप्तर' या नावाने पुणे अभिलेखागार, सरकारकडे आहेत. हे सर्व आपल्या बाजूने लिहिलेल्या नोंदी आहेत. तर हे आतापर्यंतचे ज्ञात पानीपत.पण शत्रुपक्षानेही नोंदी केल्याच असतील त्या तारीख वार एकच घटना दोन्हींकडून कशी लिहिली आहे ते तपासून अंतिम इतिहास नोंद होईल. ही सर्व कागदपत्रे,बखरी परदेशी वाचनालये,म्युझिअमस, विद्यालये येथून ओनलाईन पाहून चाळून भाषांतर करून पुस्तकात दिली अहेत.
यांचे फक्त संदर्भ सूची मध्ये पुस्तकाच्या शेवटी दिले असते तर पुस्तक चारशे पानांत आटोपले असते. मराठी वाचकांनी वाचले असते परंतू संदर्भ फारसी,अरेबिक आहेत ते जसेच्या तसे देऊन पानापानाचे भाषांतर दिल्याने ते अधिकचे वाचन झाले आहेच शिवाय इतिहासाच्या नवीन अभ्यासकांचा मूळ कागद शोधून वाचण्याचा खटाटोप वाचला आहे. संदर्भ ग्रंथ झाला. वाचकवर्ग व्यापक झाला. आगामी काळासाठी वाचनीय (future proof)ग्रंथ झाला. हेच काम लेखकाने केले आहे. ते आहे 'अज्ञात पानीपत'मध्ये.

(हे पुस्तक आमच्या नगरपालिका वाचनालयात आणा म्हणून सांगणार होतो (निधी भरपूर असतो) परंतू दोन अडचणी लक्षात आल्या. प्रत्येक पुस्तकाला शिवून बांधून घेतात ते नंतर वाचता येत नाही. दुसरे म्हणजे अशी पुस्तके संदर्भ ग्रंथांत टाकून वेगळी ठेवतात.घरी नेऊ देत नाहीत. तिथेच रोज दहा रुपये भरून वाचणे अशक्य आहे. म्हणजे पुस्तक तिकडेच पडून राहणार,वाचले जाणार नाही.)

पुस्तकातील मुख्य लढाईवर्णन संपते त्यानंतर येतात शत्रुपक्षांकडून झालेल्या नोंदी,बखरी. त्यात एक विशेष माहिती पण आहे 'काबूल अखबार'. हे प्रकरण उजेडात आणले ते इतिहासकार ग.ह.खरे यांनी. ही होती त्या काळातली रोइटरसारखी बातमी देणारी संस्था. त्यांची कार्यालये काबूलसह इतर शहरांत असावीत. ते पुण्याचे 'पेशवे' यांना बातम्या पाठवत. ती जमवून काही उदाहरणे दिली आहेत. काशीराजा नावाचा एक लेखनिक तिकडे होता त्याची बखर आहे. शिवाय महमूद अल हुसैनी याने लिहिलेला अहमदशहाचा इतिहास, पानीपतचा अहवाल -लेखनिक बक्षुल्ला,इब्राहिम अली खान याने लिहिलेला इब्रतनामा हे सर्व भाषांतरासह उपलब्ध आहेत. अब्दालीचा अस्सल शिक्का आणि तुघ्रा याचेही फोटो आहेत. हे सर्व पुस्तकात पाहा. इकडे पुनरावृत्ती टाळत आहे.

एकूण खूप कष्ट घेऊन लेखक श्री मनोज दाणी यांनी एक उत्तम ऐतिहासिक पुस्तक मराठी वाचकांसाठी उपलब्ध केले आहे. कादंबरी-छाप पुस्तकांबरोबरच अशी पुस्तके वाचनाची आवड वाचकांत निर्माण होईल यात शंकाच नाही. पुस्तक खपेल का नाही असा व्यावसायिक विचार न करता असे प्रकाशन करण्याचे धाडस दाखवल्याबद्दल Merven Technologies (श्री मनोज केळकर)यांचे आभार मानतो.