अमेरिका ५ - व्हिजिट Nvidia

21 जून 2023 हा आंतरराष्ट्रीय योग दिवस ! आमचा योग आला याच दिवशी आमच्या मुलीच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा येण्याचा! तीचं कॅली मधील, बे तील Nvidia कंपनीचे हे एचक्यू! हे झालं शॉर्ट फॉर्म उत्तर.. समजेल असे उत्तर म्हणजे कॅलिफोर्नियातील बे एरिया भागातील Nvidia कंपनीचं एचक्यू म्हणजे हेडक्वार्टर. आवश्यक सिक्युरिटी चेक करून आम्ही आत आलो. अबब ! भली मोठी 4 मजली छतापर्यंत ओपन दिसणारी बिल्डिंग. पूर्ण छतावर सोलर पॅनल आणि उजेडासाठी ठिकठिकाणी ग्लास पॅनल्स् ! प्रत्येक मजल्यावर चहा-कॉफी-गरम पाणी देणारी पॅन्ट्री एरिया. तळमजल्यावर कॅफे वेगळा. त्यात वेगवेगळ्या देशाचे खाद्यपदार्थ मेन्यू रोज बदलणारे असतात. ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत दिसणारे कॉरिडाॅर्स आणि प्रत्येक मजल्यावर 2-4-6-8 जणांसाठी बसायची सोय असणारी व्यवस्था. सगळीकडे टेबल, खुर्च्या कोच ठेवलेले. आपापले लॅपटॉप घेऊन तुम्ही कुठेही बसा..काम करा. स्वतःच्या टेबलावर माणूस नाही म्हणून दंगा कुठेही नाही.. आरडाओरड नाही. काहीजण तर घरातूनच ऑफिसचं काम इमाने इतबारे करत असतात.

ऑफिसला येताना परीट घडीचे - इस्त्रीचे - भारी कपडेच हवेत याचेही बंधन नाही. कोणी झग्यात, कोणी ट्रॅक पॅन्ट मध्ये तर कोणी हाफ चड्डीत ऑफिसमध्ये दिसतात. साहेब कोण.. सफाईवाला कोण, कळणार पण नाही..सगळ्यांना आदर सारखाच ! प्रत्येकाची वर्क स्पेस ओपन.. बंद दाराआड चर्चा करायची असेल तर काचेच्या भिंती असणारी स्वतंत्र खोली असते. ती सुद्धा इतरांना आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून ही काळजी बरं ! 'बंद दाराआड चर्चा' आपल्याकडची 'कारणे आणि परिणाम' अधिक रंजक असतात. इथे कोणीही 'खूप वेळा किंवा खूप वेळ' एका बरोबर बोलत असेल/ काम करत असेल तर 'पाणी मुरतंय!' ही भानगड नाही. भानगड करणारेही खुलेआम सर्व व्यवहार सर्वांच्या साक्षीनं करतात. जवळ घेणे, मिठी मारणे म्हणजे 'हग', चुंबन घेणे म्हणजे 'किस' तर हलकीशी पप्पी घेणे म्हणजे 'पेक' म्हणे ! हे सर्व सार्वजनिक ठिकाणी करणे, होणे, घेणे सर्वमान्य आहे..पण त्यांच्याकडे पाहणे-पहातच राहणे हे मात्र ते कृत्य करणाऱ्यांना अवमान जनक असू शकते. म्हणजे चार चौघात नव्हे 50-100 जणांसमोर पापी घेणं पाप नाही, पण त्यांची 'पापी पाहणं' मात्र तुमची 'पापी' नजर दाखवतं. असेच खुलेआम पाय (नव्हे.. खरंतर तंगड्या!) कसेही-कुठेही ठेवून तुम्ही काम करू शकता, लेक्चर ऐकू शकता, सूर्यास्त पाहू शकता, कार मधून आणलेल्या खुर्च्यांवर बैठक मांडू शकता. इथे कुणीच् कुणाला टोकत नाही.. आणि कुणाला तुम्ही टोचत पण नाही.

कंपनीत चहा-कॉफी मशीन जवळ ठेवलेली चहा-कॉफी-दूध-साखर इतकच काय मधाची पॅकेट्स कोणीही ढापून, पळवून घरी नेत नाही. स्वच्छतागृह खरोखरच कमालीची स्वच्छ असतात. 'स्वच्छता राखा' असे सल्ले न लिहिता ते स्वच्छ ठेवतात. काही ठिकाणी हल्ली सेन्सर बसवले असल्याने तुम्ही आत जाताच स्वच्छ कमोडमध्ये तुमच्या डोळ्यांदेखत जोरात आवाज करत पाणी पडून पुर्नस्वच्छ होतं. विधी उरकून उठला रे उठला की पुन्हा एकदा मोठ्ठा आवाज... पुन्हा पुन्हा पुर्नस्वच्छ ! आपल्या इतक्याशा 'शू' साठी केवढं पाणी खर्चलं जातंय असा विचार येऊन आणि क्षणभर तुम्ही रेंगाळला तर पुन्हा त्रिवार स्वच्छता होते..मला तो सेंसर नक्की कुठे आहे ते पाहायचं होतं...पण काय घ्या, आपण पाहिलं म्हणून सेंसरला पण आंघोळ घडायची. योगदिनाला सेन्सॉर दर्शन झालं पण सेन्सर दर्शनाचा योग नव्हता..

सगळ्याच कंपन्यांची ऑफिस इतकी मोठी किंवा सोयी सुविधांची नसतात. त्यामुळे काही वेळा इतर कंपनीतले सुद्धा इथल्या कुणाची मैत्री असेल तर पोटपूजेला इथं येतात. आम्ही दोघं त्यादिवशी 'कंपनी कामात' निरुपयोगी होतो, त्यामुळे आमचे आमचे उद्योग घेऊन गेलो होतो.. उदाहरणार्थ: चित्र काढणे-लिहिणे-विणकाम करणे इत्यादी. त्यामुळे काहीं ना कळेना हे कोण कर्मचारी बिना लॅपटॉपचे दिवसभर फक्त टाईमपास करत आहेत. पण इथल्या सभ्यतेपोटी कोणीही विचारलं नाही 'काय विणताय' किंवा हटकलं नाही. 'लिखाण काय... हॅऽ..हॅ..ऽ' म्हणून कुणी डिस्टर्ब केलं नाही. कसलं चित्र काढताय ? म्हणून चित्रकारामागे उभे राहून कुणी डोकावलं पण नाही. सभ्यतेचे आणि प्रायव्हसीचे अदृश्य पडदे पाहण्याचा योग मात्र योगदिनी आला.