अमेरिका २- बावळट आम्ही..!!

'खुदके गली मे कुत्ता भी शेर होता है ।' असा कुण्या एका हिंदी सिनेमामध्ये डायलॉग होता. पण आपल्या घरात-कामात-गावात 'शेर' नसलो तरी काहीतरी साध्य केलेल्या आमच्यासारख्या पालकांना 1-2 टक्के ते 100 % इन्फिरीएरीटी कॉम्प्लेक्स इथे आल्यावर येत असणार. याची झलक खरंतर एअरपोर्टला आल्यावरच सगळ्या भारतीय आई-बाबांच्या चेहऱ्यावर दिसायला लागते. भारतातून निघतानाच ठासून भरलेल्या बॅगा, वजनाला जास्त झालं की विमानतळावर होणारे चेक इन बॅगेतून 'वस्तूहरण' आणि केबिन बॅगेमध्ये 'वस्तूभरण' होते. नव्याने घेतलेल्या बुटांमधून अवघडत चालणार्या, मुद्दाम परदेश प्रवासासाठी घेतलेली नवी पर्स सांभाळणाऱ्या आया लगेच ओळखू येतात. बाबा लोक पेहरावात सराईत असले तरी मुंबई एअरपोर्टवर बाळगत आणलेला कोट, वजन काट्यावर जायला नको म्हणून अंगावर घालून अधिकच फुगलेले असतात. त्यांच्याकडे दोघांचे पासपोर्ट, तिकीटे सांभाळणे हे प्रमुख आणि बावचळलेल्या बायकोला योग्य क्यूमधून अपेक्षित दारापर्यंत नेणे हे दुय्यम काम नेमून दिलेले दिसते. विमान प्रवासातही हे आई-बाबा वेगळे कळतात, दिसतात, समजतात.

इथे उतरल्यावर एखाद्या जाणकार वाटणाऱ्या व्यक्तीच्या मागे चालताना अचानक रेस्ट रूम दिसते आणि वाटाड्याचा नाद सोडून आधी नैसर्गिक सादाला प्रतिसाद देण्यासाठी पावलं थांबतात. ते कर्म होताच आपल्या बॅगा इतर कोणी नेणार तर नाहीत ना? या शंकेने त्रस्त होऊन बॅगांच्या सरकत्या पट्ट्याकडे आई-बाबा चालू लागतात. खुणेसाठी बांधलेल्या लाल/गुलाबी रिबीनच्याच असंख्य बॅगा बघून आपण 'हुशार' नसून 'बावळट आणि सामान्य' आहोत याचा पहिला साक्षात्कार होतो. एक निळी आणि एक काळी बॅग आहे आपली! असं सांगणाऱ्या मातेची असंख्य निळ्या छटा आणि आवाढव्य काळया बॅगा पाहून बोलती बंद होते. एअरपोर्टवरील वायफाय झोन मध्ये आल्याने परदेशस्थ मुलं चौकशी करत असतात. आपलं बाळ भेटणार म्हणून आनंद होत असतो.. तर बॅगा हरवल्या तर कसं करायचं याच्या टेन्शनमुळे चेहरे अधिकच बावळट दिसायला लागतात.

मुलं एअरपोर्ट बाहेरून सूचनांचे डोस देत असतात/ त्रास नाही ना झाला प्रवासाचा असे विचारत असतात/ मला इथं फार वेळ कार घेऊन थांबू देत नाहीत असं सांगून भीतीची लाट निर्माण करत असतात. सर्व बॅगा अवतरल्या आणि प्राप्त झाल्या की बॅगांना हाकारत बाहेर पडलं की झालं असं वाटत असतानाच 'इमिग्रेशन' काउंटरसाठी देशानुसार वेगवेगळे क्यु असतात. आपला नंबर येईपर्यंत आधीच्या व्यक्तीचे निरीक्षण सुरू होते. काहीजण पासपोर्ट देतात आणि काही शब्दात अलगद सुटतात, तर काहीजण लांबलेल्या तोंडी परीक्षेसाठी खूप काही बोलून काचेपलीकडच्या माणसाला/बाई माणसाला जीवतोड काहीतरी समजवण्याच्या प्रयत्नात असतात. 'बाईच बाईचं मन जाणेल' अशी आशा वाटणाऱ्या आयांना कळतं की सगळे गडी 'लै पक्के' आहेत. आपला नंबर येतो - इंग्लिश मधील त्यांचा प्रश्न आणि आपण इंग्रजी शब्दांची शोधाशोध करून जुळवलेलं उत्तर, त्यांच्या चेहऱ्यावरचे अगम्य भाव आणि पुढचा प्रश्न ! या अमेरिकन आणि भारतीय इंग्लिशच्या झटापटीत आपण ब्रिटिशांवर सुड उगवतो. इंग्लिशची चिरफाड करून चेहरा बावळटपणासोबत रडवेला, भेसूर, केविलवाणा दिसायला लागतो. 'चेहरा दिल का आईना होता है।' आपला बावळटपणा ओसंडून वाहत असल्याने आणि आपण निरूपद्रवी असल्याची साक्ष पटल्याने आपण जिंकतो.. ऑफिसर स्वागतपर वाक्य फेकत पासपोर्ट पुन्हा आपल्याला परत देतो. आपल्या चेहऱ्यावर आता 'हुश्श...!' असे भाव उमटतात.. आणि परीक्षेत वरच्या श्रेणीत पास झाल्याचा आनंद पसरतो.

बाहेर ताटकळणाऱ्या बाळाला किंवा बाळीला भेटलो की परदेशवारीच सार्थक होणार असतं... फोन लावून बाहेर यायला लागलो की मूल सांगते 'तुम्ही दिसताय मला..तसेच पुढे.. तसेच बाहेर या !' आनंदाच्या भरात आपण काचेपलीकडे पाहायला लागतो...पण काचेच्या अलीकडे मात्र डोळ्यातल्या पाण्याचा पडदा आड येऊ लागतो.