अमेरिका १- उडतं वडाप

नमस्कार. मी आणि माझे हे नुकतेच आमच्या मुलीकडे अमेरिकेला (प्रथमच) कॅलिफोर्निया येथे गेलो होतो. त्यावेळी प्रवासादरम्यान काही लेख लिहिले.. त्यातील हा पहिला भाग.

....

ज्यांनी विमान प्रवास केलेला नसतो त्यांना त्याचं खूप अप्रूप असतं, ज्यांनी थोडाफारच केलेला असतो त्यांना कणभर अहंकारही असू शकतो, पण माझ्यासारखे... ज्यांनी 'मण'भर आणि 'मन'भर प्रवास रेल्वे, टमटम, हातगाडी, एस्. टी, बस, रिक्षा, लोकल्स्, ट्रेन, टू व्हीलर,फोर व्हिलर आणि स्वतःची 11 नंबरची पायी गाडी असा केलाय, ते मान्य करतील की विमान प्रवास तसा फारसा सुखाचा नसतो. प्रवासाचा वेळ वाचावा म्हणून करायच्या प्रवासाआधी दोन-तीन तास आणि नंतर किमान अर्धा पाऊण तास वेळ घालवावा लागतो. हे सगळं करताना विचित्र वेळेच्या फ्लाइट्स, घरापासून दूर असणारे एअरपोर्ट्स आणि त्यासाठी झोपेचं करावं लागणारं खोबरं लक्षात घेता मला स्वतःला रेल्वे प्रवासच जास्त सुखाचा वाटतो.

आमच्या सांगली-कोल्हापूर भागात शेअर रिक्षाला 'वडाप' म्हणतात. तीन जणांच्या सीटवर चार जण नक्की आणि पोलीस नसेल तर ड्रायव्हरच्या शेजारीही एक जण ड्रायव्हिंग सीट शेअर करतो. तीन चाकी-सहा डोकी प्रवासाला वडाप म्हणतात... विमानाला म्हणूनच मला "उडतं वडाप" म्हणावसं वाटतं.

एकमेकांना खेटून असणाऱ्या तीन-चार सीट्स चिंचोळ्या मार्गातून ढकलगाडीवरून वस्तू देणाऱ्या हवाई सुंदर्या (?) आणि हवाईसुंदर! हो, सुंदर दिसणारे हवाई सुंदर पण असतात.. सर्वात अन्कम्फर्टेबल असणारी कम्फर्ट रूम...अर्थात उडत्या वडापमधील टॉयलेट्स! ही इतकी अरुंद आणि दाटकी असतात की त्यांना कंफर्ट सोडाच रेस्टरूम का म्हणावं असा प्रश्न पडेल. त्यांचे दरवाजे फोल्डिंगचे आणि आत फोल्ड होणारे असतात आणि आत उभे राहिलं तर कमोड आडवा येतो. आत जेमतेम उभं राहता येईल इतकीच जागा असते. इच्छा असो वा नसो कमोडवरच बसावं लागतं! फ्लश बटन दाबलं की भीती वाटेल असा सक्शनचा आवाज येतो. लॉंग डिस्टन्सच्या फ्लाईटमध्ये आधेमधे हवामान खराब आहे तेव्हा लॅव्हेटरी (हा एक उडत्या वडापमध्ये वापरला जाणारा खास शब्द!) वापरू नका अशी तंबी वजा इशारा देतात. करू नका-जाऊ नका म्हटलं की करावं-जावं अशी तीव्र भावना होते तसेच काहीसं होतं. 'आता तुम्ही लॅव्हेटरीचा वापर करू शकता' म्हणून उद् घोषणा झाली की दोन-तीन जण नक्की उठतात आणि एक छोटासा क्यू लगेच तयार होतो. (इथे कम्फर्ट रूम म्हणायला काही हरकत नाही.)

मला तशी रांग लागलेली पाहून माझ्या लहानपणीची आठवण होते. पूर्वी वाड्यात तीन चार बिऱ्हाडात घर मालकांसह एक किंवा क्वचित दोन संडास असायचे. हो... त्याला कोणी वॉशरूम-रेस्टरूम-टॉयलेट म्हणत नसत. बाथरूम आपापल्या घरी.. त्याला मोरी किंवा न्हाणीघर (खरंतर नहाणीघर शब्द आहे) जिथे फक्त नहाणे, स्नान करणे अपेक्षित असते. पूर्वी शौचालय हे घराबाहेर.. थोडेसे दूर-परसदारी असायचे. माझ्या एका मामाकडे तर छोट्याश्या वनराईतून तिथपर्यंत जाताना रात्री 'कंदील आणि पाणी' दोन्ही न्यावं लागे. स्पष्ट सांगायचं तर नंबर 1 घरात नंबर 2 बाहेर अशी नक्की विभागणी असायची. एकत्र कुटुंबामुळे चार-पाच जण एका कुटुंबात आणि त्यामुळे पंधरा वीस जणांत एकच संडास असल्याने संडासबाहेर सकाळी इच्छुकांची रांग स्वाभाविकच असे. रांग नको असेल तर लवकर उठा...नाहीतर प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आवेग आवरा !

आमच्या वाड्यात नंबर2 साठी एका दादाला वेळ लागायचा. हे आम्हाला सगळ्यांना माहीत होतं. शनिवारी आमची शाळा सकाळी लवकर असे. त्यावेळी आम्ही त्या दादाला स्पष्ट विचारत असून 'मी जाऊ दादा तुझ्या आधी' ? किंवा 'दादा, लवकर येते, मी जाऊ'? अशी अजीजी पण दाखवायचो किंवा 'दादा, तुला वेळ लागतो' असं पण स्पष्ट सांगायचो.

आता काळ बदलला..टॉयलेटस् घरात आली. प्रत्येक कुटुंबासाठी स्वतंत्र टॉयलेट झाले. आमच्या पुढच्या पिढीत तर प्रत्येकासाठी स्वतंत्र टॉयलेट आहे/असू शकते. दिवसाकाठी खरंतर केवळ अर्धा तास लागणारी ही जागा.. त्यामुळे आता अशी रांग नव्या पिढीला पाहायला/अनुभवायला मिळणारं हक्काचे ठिकाण म्हणजे आपलं "उडतं वडाप"..