पं वसंतराव देशपांडे

मी वसंतराव

मित्रहो यांनी एक सुंदर लेख लिहिल्याबद्दल अभिनंदन.त्याला प्रतिसाद द्यावा म्हणून लिहीत असताना शब्द भरकटत गेले व खुप मोठा प्रतिसाद झाला. तसेही आज तीस जुलै, कलर्स वर दिवसभरात दोन वेळेस पं वसंतराव हा चित्रपट दाखवला गेला. इतरत्र सुद्धां पं वसंतराव यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या रसीकांनी कार्यक्रम केले असतील. वाटले वेगळा धागा डकवावा.

पं वसंतराव यांना जवळून बघण्याचा,बोलण्याचा योग आला होता. काही मखमली आठवणीं पैकी एक. मी सतरा वर्षाचा नुकतीच शाळा संपवलेला तर पंडितजी पन्नाशीचे.

३० जुलै १९८३,चाळीस वर्षां पुर्वी,आजच्याच दिवशी पं वसंतराव 'या भवनातील गीत पुराणे,मवाळ हळवे सुर जाऊ द्यात', म्हणत 'स्वताच हे भुवन अवघ्या ६३ व्या वर्षीच सोडून गेले. मागे वळून पाहताना असे दिसते, काय एका पेक्षा एक सरस गाणी रसिकांसाठी मागे ठेवून गेलाय हा आवलिया.

पंडितजींची गायकी पन्नास वर्षांहून जास्त वयाची, पण ती 'गुलजार नार, मधुबाला' खोडकर मृगनयना आजही गोड गोड गाऊन रसीकांच्या हृदयाला ओढ लावते. एखादी गुलजार नार भ्रू-धनु सज्ज करून नयनांची शरमाला सोडते व जशी ती चंचल नैना रसीकांच्या हृदयाला सहज विंधिते, त्या प्रमाणेच आज सुद्धा पंडितजींचा आवाज रसीकांच्या हृदयाची तार छेडण्यास सक्षम आहे. ('ही कुणी छेडली तार).

जेंव्हा जेव्हां तो "तराणा",(सुरत पिया की) किंवा "घेई छंद ' सुरवातीचा आलाप ऐकतो तेव्हां तेव्हां नुकतीच कात टाकलेली, सळसळती, डौलदार,चपळ नागीण डोळ्यासमोर येते.

आजही कट्यार मधील, जिंकूनही हरलेल्या खाॅ साहेबांची सुरत नजरे समोर येते व अप्रतिम गायकी बरोबरच त्यांचा अप्रतिम अभिनय आठवतो.

माझ्या मुलींच्या लग्नात,पंडितजींचे अष्टविनायक मधले गाणे डोक्‍यात एखाद्या आडकलेल्या टेप सारखे सतत वाजत होते.

'दाटून कंठ येतो ओठात येई गाणे'

आमच्या गावची नात,शांताबाई शेळके यांचे शब्द व पंडितजींचा स्वर्गीय आवाज, डोळ्यातून गंगा जमाना न वाहातील तर नवलच म्हणावे लागेल. नुसते शब्द वाचून बघा,कंठ दाटून येईल.

शांताबाईनीं अबोल बापाच्या हृदयाचे हृद्य शब्दचित्र रेखाटले आहे तर वसंतरावानी ते अजरामर केले आहे. जोपर्यंत बाप आणी मुलगी हे नाते जीवंत आहे तोपर्यंत हे गाणे, गीतकार, संगीतकार व गायक अजरामर आहेत.

दाटून कंठ येतो, दाटून कंठ येतो
ओठांत येई गाणे
जा आपुल्या घरी तू, जा आपुल्या घरी तू
जा लाडके सुखाने
दाटून कंठ येतो

हातात बाळपोथी, ओठांत बाळभाषा
हातात बाळपोथी, ओठांत बाळभाषा
रमलो तुझ्यासवे मी गिरिवत श्री गणेशा
वळवून अक्षरांना केले तुला शहाणे
जातो सुखावुनि मी, जातो सुखावुनि मी
या गोड आठवाने
जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने
दाटून कंठ येतो

बोलात बोबडीच्या संगीत जागविले
बोलात बोबडीच्या संगीत जागविले
लय ताल सूर लेणे, सहजीच लेवविले
एकेक सूर यावा, एकेक सूर यावा
न्हाऊन अमृताने
अवघ्याच जीवनाचे, अवघ्याच जीवनाचे
व्हावे सुरेलगाणे
जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने
दाटून कंठ येतो

घेऊ कसा निरोप, तुटतात आत धागे
घेऊ कसा निरोप, तुटतात आत धागे
हा देह दूर जाता, मन राहणार मागे
धन आत्मजा दुजाचे, ज्याचे तयास देणे
परक्या परी आता मी, परक्या परी आता मी
येथे फिरुनी येणे
दाटून कंठ येतो, ओठांत येई गाणे
जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने
दाटून कंठ येतो
दाटून कंठ येतो

किती लिहायचं याला काही सीमा नाही. खुप काही ....

पंडितजींची काही गाणी जी माझ्या मोबाईल, लॅपटॉप, टॅब,पेन ड्राईव्ह वर आहेत. कारण कधीही,कुठेही ऐकावी वाटली तर ......

गुलजार नार ही मधुबाला
कर हा करी
घेई छंद
शत जन्म शोधिताना
कानडा राजा पंढरीचा
मृगनयना रसीक मोहीनी
बगळ्यांची माळ फुले
दाटून कंठ येतो
ही कुणी छेडली तार
छेडियल्या तारांनी
राहीले ओठातल्या ओठात
वाटेवर काटे
कुणी जाल का
कानडा राजा....

ध्रुवां सारखं अढळ स्थान निर्माण केलेल्या माझ्या आवडत्या गायकाला माझे शतं शतं प्रणाम.