माझाही एक भयानक अनुभव

या आठवड्यात मला एक जरा वेगळा आणि भनायक अनुभव आला
अहमदाबाद मधे दोन तीन दिवसांच्या कामासाठी गेलो होतो.
ऑफिसने हॉटेल बुक केले होते. पण जी रूम मिळाली त्या रूमला एकही खिडकी नव्हती. रूम वातानुकूलीत असल्याने खिडकी नसल्यामुळे काही फरक पडणार नव्हता म्हणून घेतली. सकाळी बाथरूम मधे गेलो. बाथरूमला ही अर्थातच खिडकी नव्हती, व्हेंटीलेशन साठी छतावर एक एक्झॉस्ट फॅन होता. अंघोळ करून बाथरून मधून बाहेर जाण्यासाठी दार उघडायला गेलो तर लक्ष्यात आले की दाराचे लॅच लॉक झाले आहे. आणि दार उघडता येत नाहिय्ये.
दाराला हँडल ऐवजी एक गोल नॉब होता त्यावरच लॅच उघडण्यासाठी एक बटन होते. बटन दाबले की त्यामुले लॅच च्या कळीची हालचाल होऊन दार ओढले की उघडले जायचे. हात ओले झाल्यामुळे ओढणे शक्य होत नव्हते. त्यात ओले असल्यामुळे हात सटकत होते.
परिस्थिती अशी होती की माझा मोबाईल बाहेर रूम मधे होता. आतून ओरडून कोणाला बोलायचे तर आवाज बाहेर जाणे शक्य नव्हते.
दहा एक मिनीटे शांत बसलो. लॅचचा नॉब टॉवेल ने पुसून काढले. आणि दाराच्या चौकटीला पाय लावून लॅच दोन्ही हातानी दाबून दार एकाच झटक्यात जोर लावुन ओढले. दार उघडले गेले आणि जीव भांड्यात पडला.
हे लिहीताना आता मनात विचार येतोय की समजता ते ओढताना जर तो दाराचा नॉब तुटला असता तर?
माझी रूम आतून कडी लावून बंद केलेली होते त्यामुळे क्लीनिंग स्टाफला आत किल्ली लावूनही रूमचे दार उघडता आले नसते.
बाथरूम मधे फोन नेला असता तर निदान फोन करून तरी स्टाफला कळवता आले असते. पण तेही शक्य नव्हते.
ते दहा मिनीट मात्र माझ्या मनात काहीच्याकाही विचार येऊन गेले.
समजा दार उघडलेच गेले नाही तर? इथे गुदमरून आपले काही झाले तर? इथपासून ते हॉटेलच्या रूम मधे मृत्यू आल्या च्या बातम्या डोळ्यासमोर येवून गेल्या. समजा आपले काही असे झाले तर आपल्या कुटूंबीयाना आपल्या बद्दल कसे कळेल?
तुम्हाला आलाय का असा अनुभव कधी?