रानभाजी - आघाडा

रोजच्याप्रमाणे आजहि सकाळी भुईकोट किल्ला परिसरात आमच्या मातोश्री फिरायला गेल्या व येताना "आघाडा" या रान वनस्पतीला घेऊन आल्या.
हाडाची शिक्षिका असल्याने आधी सर्वांना त्या भाजीचे महत्व समजावून सांगितले व नंतर हळुवारपणे भाजी निवडून मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून काढली .... नंतर जिरे, मोहरी, मीठ,मिरची, थोडासा दाण्याचा कुट व लसूण एव्हढ्या अल्प सामग्री च्या बळावर अफलातून अशा चवीची हि पालेभाजी खाऊ घातली.

आईकडून समजलेली माहिती हि अशी : पावसाळा सुरु झाला कि बहुतांश ठिकाणी रानभाज्यांना बहर येतो. आपल्या आजूबाजूला बऱ्याचदा या औषधी वनस्पती कुठलीही विशेष अशी मेहनत न घेता निसर्ग आपोआप आपल्याला देत असतो आपण फक्त थोडेसे ज्ञान घेऊन डोळे उघडे ठेऊन वावरले कि आपल्याला या भाज्यांची पर्वणी साधता येते.
या रानभाज्या चविष्ट व पौष्टिक असतात. ठराविक ऋतूतच येत असल्या कारणाने त्यांचे महत्वही आपण जाणून घ्यायला हवे तरच त्याचे फायदे आपण मिळवू शकतो.

आघाडा रोपवर्गीय रानभाजी आहे. ‘अ’ जीवनसत्वाने भरपूर अशी ही भाजी आहे. हाडे बळकट करण्यासाठी आघाडा खावा. आघाडा रक्तवर्धक आहे, पाचक आहे. मुतखडा, मुळव्याध व पोटदुखीवर गुणकारी आहे.

पावसाळ्यात रानातील या भाज्या मुळातच चवदार असतात. अगदी थोडेसे पाकसंस्कार त्यावर करून त्या शिजवल्या कि झालेच कि, नैसर्गिक व पौष्टिक असल्याने या हंगामी भाज्‍या आवर्जून सर्वांनी खायलाच हव्यात.

मी तर बुवा आज सकाळीच आस्वाद घेतलाय आणि मिपाकरांसाठी काही फोटो. फार काही अवघड नसल्याकारणाने अगदी डिट्टेल अशी पाकृ देत बसत नाही. (तसेही मला त्यात विशेष ज्ञान नाहीच)

येथील तज्ञ् जाणकारांनी आणखी काही रानभाज्या व त्यांचे महत्व विशद करावे जेणेकरून येणाऱ्या पिढीलाही त्याचे ज्ञान होईल.

भाजी बनवतानाचे काही क्षण.