निरोप

रस्त्यावरून या तू
चालू नकोस आता
निक्षून ती म्हणाली
हातात हात होता

(आला सुवास तोच
ती बैसता समीप
पण साठवू कसा तो
मन क्षुब्ध, हात कंप)

हळवे जुने तमाम
तू आठवू नको ते
कसलाच अर्थ नाही
उरला न जीव तेथे

नाही मी राहिले ती
तूही आता निराळा
वेड्या मनास लागे
वेडा निरर्थ चाळा

मैत्री असेल अपुली
भेटू अधूमधून
नजरेस मात्र ठेव
अपुल्या जरा जपून

नजरेत ना दिसू दे
ती ओल पावसाची
एकांत तो मनस्वी
ती रात्र मीलनाची

वळुनी न पाहताही
तत्काळ ती निघाली
मी आर्त, स्तब्ध, सुन्न
दाटून रात्र आली
---

झाला बराच वेळ
आहे इथे बसून
तो गंध ओळखीचा
आहे इथे अजून

(टीप: आम्हाला इतपतच काव्य येते)