अंतरीचा ठाव माझ्या
अजून मी घेतोच आहे
अनंत जन्मांचे हे देणे
अजून मी देतोच आहे
वृक्ष छाया तापलेल्या
धरणीला देतोच आहे
पोळलेल्या हृदयावर मी
ती छाया घेतोच आहे
धीर देऊन भ्यालेल्यांना
मीही तरी भितोच आहे
अमृताच्या प्याल्यातूनही
विष मी पितोच आहे
इतरांची मी कीवच करतो
परंतु मीही तोच आहे
आयुष्याची शाई संपली
तरीही मी लिहितोच आहे
मरणाची मी वाट पाहतो
तरीही मी मरतोच आहे
जिंकिले जरी षड्रिपू तरी
अजून मी हरतोच आहे
खेळापासून सावल्यांच्या
मैलन मैल पळतोच आहे
सावली जरी माझी पडली
परंतु मी जळतोच आहे
थकलेल्या पाऊलवाटांवर
परत मी फ़िरतोच आहे
तरीही त्या अंतरात माझ्या
अजून मी शिरतोच आहे
पुष्कळ झाले पुरे करा
अजून मी विनवतोच आहे
परी अंतरीची व्याकुळता
अजून अनुभवतोच आहे
त्याचे देणे संपत नाही
अजून तो देतोच आहे
रिक्त हस्ते भोग हे
भोगून मी घेतोच आहे