कुटचलनाची बाराखडी----ब्लॉक-चेन

नमस्कार मंडळी
माझ्या मागच्या एका लेखात कुटचलनाबद्दल थोडी माहिती दिली होती. पण कुटचलन हे ज्या तंत्रज्ञानाचा वापर करून पुढे आले किंवा ज्यावर ते आधारित आहे , त्या ब्लॉकचेन बद्दल काही लिहायचे राहून गेले होते. ते आपण इथे पाहूया. जसे आपल्याला झेरॉक्स म्हटले की समजते पण खरेतर "फोटो कॉपियर" हे त्या तंत्राचे मूळ नाव आहे आणि झेरॉक्स ते बनवणारी एका कंपनी. तसे ब्लॉकचेन हे तंत्रज्ञान आहे आणि बीटकॉइन हे ब्लॉकचेनवर आधारलेले एक कुटचलन.

मागच्या लेखाचा दुवा
कुटचलनाची बाराखडी

तर मुळात ब्लॉकचेन काय आहे ? तर ते एक उघडे इलेक्ट्रॉनिक पुस्तक आहे, जे कोणीही बघू शकते, पण त्यात फेरफार करू शकत नाही.

ज्यांना बँक कसे काम करते हे माहित असेल त्यांना लेजर सिस्टीम सुद्धा माहित असेलच. समजा ए च्या खात्यातून बी च्या खात्यात १०० रुपये गेले, आणि सी च्या खात्यातून बी ला २०० रुपये मिळाले .तर बँकेच्या लेजरमध्ये त्याची सर्व नोंद होते.असे दिवसाभराचे व्यवहार सुद्धा लेजरमध्ये डेबिट किंवा क्रेडिट च्या स्तंभात नोंदले जातात.याला डबल एंट्री म्हणतात. पण हे व्यवहार फक्त बँकच बघू शकते. कारण इथे बँक ही मध्यस्थ आहे. बँकेचा या व्यवहारांवर पूर्ण कंट्रोल आहे. पण हे व्यवहार जर कोणी खोडले तर? तर होणार गोंधळ टाळायला ट्रिपल एंट्री पद्धत वापरली जाते. ज्यात आपण असे समजू की कुठेतरी दूर या होणाऱ्या व्यवहारांचा मागोवा ठेवला जातो. म्हणजे त्यांची विश्वासार्हता वाढते. आता जर हे व्यवहार बँकेशिवायच करायचे झाले तर ते विश्वासार्ह होण्यास काय करावे लागेल? इथे ब्लॉकचेन कामास येते.

ब्लॉकचेन हे बँकेपेक्षा अजून एक पाऊल पुढे जाऊन काम करते. म्हणजे ए माणसाने बी ला १०० रुपये दिले, या व्यवहाराचा एक इलेक्ट्रॉनिक ब्लॉक तयार होतो. त्याला एक युनिक हॅश किंमत दिली जाते. हा ब्लॉक मग त्या ब्लॉकचेन मध्ये सहभागी असणारे सगळे नोड (म्हणजे संगणक) तपासून बघतात आणि तो योग्य असल्याचा निर्वाळा देतात. आणि मग तो ब्लॉक साखळीत म्हणजे ब्लॉकचेनमध्ये जोडला जातो. अशा पहिल्या ब्लॉक ला जेनेसिस ब्लॉक म्हणतात. पुढच्या व्यवहारात बी ने सी ला २०० रुपये दिले. त्याचा नवा ई- ब्लॉक तयार होतो, पण या दुसऱ्या ब्लॉक मध्ये आधीच्या ब्लॉकची माहिती हॅश सकट असते. आता समजा असेच व्यवहार होत राहिले, तर प्रत्येक ब्लॉक मध्ये आधीच्या सगळ्या ब्लॉकची माहिती-साखळी असेल. आणि ब्लॉकचेनचा भाग असणाऱ्या सगळ्या संगणकांकडे तीच माहिती-साखळी असेल. आता समजा कोणीतरी या साखळीत मधेच घुसून एका ब्लॉकमध्ये फेरफार केला , तर तिथपासून पुढची साखळी करप्ट होईल . म्हणजे सगळ्या संगणक नोड्स कडे जी माहिती आधीपासून आहे, त्याच्याशी हे डिटेल्स जुळणार नाहीत, आणि तो ब्लॉक व त्यापुढचे ब्लॉक किंवा साखळी कोणीच ग्राह्य धरणार नाही. थोडक्यात हे फेरफार लगेच पकडले जातील आणि इन-व्हॅलिड केले जातील.

पण हे सर्व झाले फक्त चलनाच्या किंवा देवाण घेवाणीच्या बाबतीत. पण सामान्य माणसाला याचा काय उपयोग? तर असे अनेक व्यवहार असतात की ज्यात देणारा आणि घेणारा समोरासमोर नसतात किंवा असले तरी त्यांना एकमेकांबद्दल विश्वास नसतो अशा ठिकाणी ब्लॉकचेन काम करते
--स्मार्ट काँट्रॅकट-दोन माणसे किंवा कंपन्यांमध्ये जे काँट्रॅक्त्त कागदावर होते, त्याला हा इलेक्ट्रॉनिक पर्याय आहे.
--सायबर सुरक्षा -या पद्धतीत विदा म्हणजे डेटा अनेक ठिकाणी विखरून ठेवलेला असल्याने हॅकर ला तो चोराने आणि त्यात फेरफार करणे खूप अवघड असते.
--इंटरनेट ऑफ थिंग्स - जिथे जिथे मोठ्या प्रमाणावर डेटा गोळा केला जातो आणि तो वापरून निष्कर्ष काढले जातात तिथे ब्लॉकचेन उपयोगी पडते. एक उदाहरण म्हणजे समजा एखाद्या ग्रीन हाउस मध्ये दर मीटरवर सेन्सर लावून तापमान, आर्द्रता वगैरे मोजले जाते आणि प्रत्येक मिनिटाला ते सर्व्हरकडे पाठवून किती पाणी द्यायचे, किती ऑक्सिजन पाहिजे वगैरे ठरवले जाते तिथे हा डेटा सतत सेन्सर कडून सर्व्हरला जाताना तो करप्ट होऊ नये म्हणून ब्लॉकचेन कामी येते.
-क्रिप्टो करन्सी- हे तर बिट कॉईन मुले आपल्याला माहीतच आहे.
--एन एफ टी- नॉन फंजिबल टोकन्स-- म्हणजे एखाद्या वस्तूचा युनिक टॅग. समजा मी मित्राकडून ५ रुपयाचे नाणे घेऊन त्याला ५ रुपयाची नोट दिली तर ते झाले फंजिबल टोकन. पण मी त्याऐवजी त्याला जर एका कागदावर कोड लिहून दिला ,जो तो जगात कुठेही वापरू शकेल तर ते झाले नॉन फंजिबल टोकन.
जमिनीची दस्त नोंदणी- एखादी मालमत्ता खरेदी करताना आपण सर्च रिपोर्ट काढतो आणि टायटल क्लिअर आहे ना ते बघतो. ब्लॉकचेन मुळे प्रत्येक मालमत्तेला एक युनिक टॅग येईल ज्यामुळे तिचा पूर्ण इतिहास एका टिचकीवर समजेल.
फळे आणि शेतमाल- युरोपमध्ये अनेक ठिकाणी फळे किंवा भाज्या विकताना त्यावर ब्लॉकचेन वापरून तयार केले कोड वापरणे बंधनकारक आहे. हा कोड स्कॅन केल्यास ती भाजी/फळ कुठून आले, त्यावर किती कीटकनाशके फवारली , पेरणी,कापणी वगैरे कधी झाली सगळे समजते.

मी तर ऐकले आहे की आजकाल रिझर्व्ह बँकही इतर बॅंकांमधले सेटलमेंट ब्लॉकचेन वापरून करते. जाणकारांनी प्रकाश टाकावा. तर असे हे आपल्या आयुष्याला सर्वांगाने भिडलेले ब्लॉकचेन तंत्रज्ञान. जितके सोपे करून सांगता येईल तितके सांगितले आहे. आवडल्यास प्रतिक्रियेतून जरूर कळवा.