दिव्याचे तेज डोळ्यांचे वेज कोण तिथे जाळीत आहे
शंभर वर्षांनंतर कोण माझी कविता वाचीत आहे?
वा रा कांत
चंद्रकांत सखाराम चव्हाण कोण होते म्हणून विचारले तर पुष्कळ लोकांना माहीती नसेल. एखादा वात्रट पोरगा म्हणेल चव्हाणांचा चंद्या.
११७ वर्षापुर्वी ठाण्याच्या वसई तालुक्यात अर्नाळा गावी चंद्रकांत सखाराम चव्हाण यांचा जन्म ९ जुन १९०६ साली झाला.(आज ९जुन आहे)
सर्वात जास्त पुस्तके लिहीण्याचा विक्रम याच माणसाने केला, त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मधे आहे.चंद्रकांत सखाराम चव्हाण यांनी बाबुराव अर्नाळकर या टोपण नावाने लिहीले. यांच्या रहस्य कथा इतक्या लोकप्रिय झाल्या त्यामधे त्यांचे खरे नाव लपले.लहानपणी बाबू म्हणत मोठेपणी बाबुराव. अर्नाळ्याचे म्हणून अर्नाळकर.तेच नाव जनमानसात रुजले,वाढले आणी अजरामर झाले.
द पां खांबेटे,नाथमाधव,धारप यांच्या पुस्तकाच्या बरोबरच अर्नाळकरच्या पुस्तकांवर आम्हा मुलांच्या उड्या पडायच्या.
मराठीतील आघाडीचे रहस्यकथा लेखक होते.त्यांनी १०४२ कदाचित जास्तच,रहस्यकथा लिहिल्या. खर्या अर्थाने त्यांनी तळागाळातल्या मुलांना व त्याच बरोबर मोठ्या माणसांना वाचनाची गोडी लावली. त्यांची रहस्यकथा आमच्या बाल मनाला एका जागी तासंतास खिळवून ठेवायची.कथांचे नायक झुंजार,धनंजय-छोटू,मेजर सुदर्शन, इन्स्पे दिलीप,डिटे.रामराव,दर्यासारंग मराठी घरांघरांतले झाले.मुबंई,
ग्रांटरोड,गिरगाव,कामाठीपुरा, काळाघोडा,धोबीतलाव इ.नावे आणी अंडरवर्ल्डची तोंड ओळख यांच्याच रहस्य कथांमुळे वाचकांना झाली.
११७ वर्षानंतर सुद्धा यांची पुस्तके आज बाजारात दिमाखात उभी आहेत.ते एकुण ९३ वर्ष जगले. १९८८-८९ मधे डोळ्याच्या विकारा मुळे लेखन थाबंले.एकंदरीत लेखन कारकिर्दीचा आढावा घेता साधारण एका महिन्यात चार कथा या वेगाने रहस्यकथा लिहील्या.गिरगावात त्यांचे चष्म्याचा दुकान होते.रहस्य कथा लोकप्रिय होत असताना लोक खरेदीला कमी पण काय लिहीतात हे बघायला दुकानात गर्दी करू लागले, या वाचकांच्या प्रेमाचा लिखाणात व्यत्यय येवू लागला म्हणून दुर कुठे तरी एकांतात लिखाणास बसूलागले.
ग्रांटरोडवरील एका चाळीत बाबुराव रहात होते.सुरवातीच्या काळात स्व. भारतरत्न लतादीदी जवळच राहात होत्या.बाबुरावांची आणी मंगेशकर कुटुंबाची ओळख होती.
लेखकाने वाचक वर्गाला अक्षरशाः झपाटून टाकले होते. सतीशभावसार या झपाटलेल्या वाचकाने निवडक बाबुराव अर्नाळकर हे पुस्तक लिहीले. लतादीदी,रत्नाकर मतकरी यांनी पुस्तकावर अभिप्राय लिहीला आहे.
अशा या अफलातून लेखकास त्रिवार वंदन.
साभार,आठवणीच्या पोतडीतून व अंतरजालावरून.
काळापहाडचा पंखा.