भारताबाहेरचा भारत -अंदमान १

नमस्कार मंडळी
गेले १.५-२ वर्षे घरात बसून पकलो असल्याने एखादी मोठी सहल करायचा मोह होत होता. आणि समुद्र हा नेहमीच आवडीचा विषय असल्याने बहुधा ३-४ दिवस कुठेतरी समुद्राकाठीच जायचे डोक्यात घोळत होते. त्यामुळे सुरुवात अलिबाग पासून होऊन, कोकण,गोवा,कोस्टल कर्नाटक करत करत चर्चा अंदमानला जाऊन पोचली. मालदिव्ह्स आणि सेशेल्स ५.५ ते ६ रुपयाला पडत होते आणि श्रीलंका ५० पैसे असले तरी आधीच झाले होते. शिवाय आत्ता तिथे परिस्थिती वाईट आहे.अंदमान भारतातच असल्याने करन्सी रेशो बघायची गरज नव्हती. दुसरे म्हणजे जालावर शोध घेतला असता चेन्नई आणि कोलकाताहून तिकडे थेट विमानसेवा उपलब्ध होती . मात्र कनेक्टिंग विमाने मुंबईहून जास्त होती. अर्थात पुणे-मुंबई फारसे अंतर नसल्याने बाय रोड जायला आमची काहीच हरकत नव्हती.माझ्या नेहमीच्या एजंटकडून प्लॅन मागवला असता ४ जणांच्या सहलीसाठी त्याने ५ दिवस ४ रात्री साठी सुमारे ६०,०००/- रुपये आकारले. त्यात हॉटेलचे वेगवेगळे पर्याय होते त्याप्रमाणे किंमत थोडीफार कमी जास्त होणार होती. परंतु विमानाचे तिकीट बघता एकूण चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला अशी परिस्थिती होती. पण हातात वेळ कमी होता आणि तेव्हढ्यातच सगळे बसवायचे म्हणजे पदराला खार लागणारच असा "सुज्ञ" विचार करून निमूटपणे बुकिंग करून टाकले. मग हापिसातील कामाचे डोंगर उपसायला सुरुवात केली.(असे म्हटले की कसे छान वाटते) आणि सगळ्या मीटिंगांमध्ये अंदमान सहलीबद्दल एखाद दोन वाक्य टाकून देऊ लागलो. उगाच कोणी आयत्या वेळी म्हणायला नको की "तू असा कसा न सांगता गेलास?" अशा तऱ्हेने ऑस्ट्रेलिया ,कॅनडा, अमेरिका,इंग्लंड आणि कुठल्या कुठल्या लोकांना मी अंदमानला चाललोय हे समजले. आणि त्यांची असूया बघून मला आसुरी आनंद होऊ लागला.(पुढे परत आल्यावर मी नसताना त्यांचे काहीच कसे अडले नाही हे ऐकून दु:ख झाले, ते असोच)

तर यथावकाश तो दिवस उजाडला आणि आम्ही पुण्याहून मुंबईस प्रस्थान करते झालो. दरवेळी मुंबईत गेल्यावर रस्ते, मेट्रो,नवनवीन उड्डाणपूल वगैरे बघून "हीच का ती"? असा प्रश्न मला पडतो. आयुष्याची कित्येक वर्षे जिथे उभा आडवा तिरका (म्हणजे सेंट्रल/वेस्टर्न/हार्बर) फिरलो, त्या मला आता जे व्ही एल आर /एस व्ही एल आर म्हटले की बाउन्सर जातात. चेंबूरहून कुलाब्याला १५ मिनिटात पोचता येते हे पाहून डोळे पाणावतात. घाटकोपरहून अंधेरीला मेट्रोने जाताना साकीनाक्याचे ते संध्याकाळचे ट्राफिक आठवते. आता तर म्हणे शिवडीहून न्हावा शेवाला थेट पूल होणार आहे २२ कि.मी. चा. कालाय तस्मै नमः
==============
पुढील माहिती विकीवरून साभार

तेराव्या शतकात झाओ रुगुआ यांनी लिहिलेल्या झु फॅन झी या पुस्तकात अंदमानचे नाव मध्य चिनी भाषेत 'ąanh də man( आधुनिक मँडरिन चिनी भाषेत युंटुओमन) या नावाने आले आहे. 'कंट्रीज इन द सी' या पुस्तकाच्या ३८ व्या अध्यायात झाओ रुगुआ यांनी स्पष्ट केले आहे की, लांब्री (सुमात्रा) येथून सेलानकडे जाताना प्रतिकूल वाऱ्यामुळे जहाजे अंदमान बेटांच्या दिशेने वाहतात. १५ व्या शतकात वू बेई झीच्या माओ कुन नकाशात झेंग हे च्या प्रवासादरम्यान अंदमानची नोंद "अँडेमन माउंटन" (आधुनिक मंदारिन चिनी भाषेत आंदेमान शॅन) म्हणून केली गेली. आतापर्यंत नोंदवलेले सर्वात जुने पुरातत्त्वीय पुरावे सुमारे २,२०० वर्षांपूर्वीचे आहेत; तथापि, अनुवांशिक, सांस्कृतिक आणि विलगीकरण अभ्यासातील संकेत असे सूचित करतात की या बेटांवर मध्य पॅलेओलिथिक (सुमारे 60,000 वर्षांपूर्वी) च्या सुरुवातीच्या काळात वस्ती असावी. मूळ अंदमानी लोक त्या काळापासून ते १८ व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत या बेटांवर मोठ्या प्रमाणात विलगीकरणात राहत असल्याचे दिसून येते. राजेंद्र चोल दुसरा याने अंदमान निकोबार बेटांचा ताबा घेतला. अंदमान आणि निकोबार बेटांचा वापर त्यांनी श्रीविजय साम्राज्याविरुद्ध मोहीम सुरू करण्यासाठी सामरिक नौदल तळ म्हणून केला. इ.स. १०५० च्या तंजावूर शिलालेखात सापडलेल्या या बेटाला चोलांनी मा-नक्कावरम ("महान खुली/नग्न भूमी") असे संबोधले.युरोपियन प्रवासी मार्को पोलो (१२ वे-१३ वे शतक) यांनीही या बेटाचा उल्लेख 'नेक्युवेरान' असा केला आहे आणि नक्कावरम या तमिळ नावाच्या भ्रष्ट स्वरूपामुळे ब्रिटिश वसाहतकाळात निकोबार हे आधुनिक नाव पडले असावे.

https://en.wikipedia.org/wiki/Andaman_islands
==========================================
तर यथावकाश ट्रॅफिकमधून वाहत वाहत एकदाचे विमानतळावर पोचलो आणि भरून पावलो. रात्री विमानतळावर दिवस उजाडलेला असतो. एकतर मुंबई कधीच झोपत नाही. त्यातून हे विमानतळ प्रकरण तर नाहीच नाही. तर चेक इन करून मोकळे झालो आणि इकडे तिकडे करत वेळ घालवू लागलो.
a

d

c

विमानतळावर इतके काही बघण्यासारखे असते (शॉपिंग शिवायही) की बरेचदा वेळ भर्रकन निघून जातो.
d
मुंबई विमानतळावरचे काही सजावटीचे प्रकार
c

a
a

d

c

तसा तो गेलाच आणि आम्ही प्रथम चेन्नई आणि मग पोर्ट ब्लेअर अशी दोन विमाने पकडून सकाळी ७ च्या सुमारास वीर सावरकर अंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलो.

चेन्नई विमानतळावरील सजावट--कॉलिंग प्रचेतस फॉर माहीती

d

c

a

d

b

b
b

b

अंदमानला पोचल्यावर सगळ्यात प्रथम जाणवले ते म्हणजे वेळेचा फरक. अंदमान हे जरी भारतात असले तरी नकाशाप्रमाणे ते मिझोराम च्या खाली आणि थायलंडजवळ आहे. त्यामुळे भारतीय प्रमाणवेळच पाळली जात असली तरी वेळेत साधारण तासाभराचा फरक आहे. घड्याळात ७ वाजले असले तरी ८-८.३० सारखे ऊन होते. १० मिनिटात आम्ही हॉटेलवर पोचलो . आज सकाळी मोकळा वेळ होता आणि दुपारी सेल्युलर जेल आणि लाईट आणि साउंड शो बघायला जायचे होते. तसेही रात्रभराचा प्रवास झालेला असल्याने डोळे गपागप मिटत होते. हॉटेलवर जाऊन फ्रेश झालो आणि मस्त ताणून दिली. ३-४ तास मस्त झोप झाल्यावर जरा बरे वाटले. हॉटेलवारचे मेन्यू कार्ड बघितले पण ते काही एव्हढे खास वाटले नाही. झोमॅटो स्वीगी उपलब्ध होते पण गुगलवर शोधले तर जवळपास ५०० मीटरच्या अंतरावरही हॉटेल्स दिसत होती. त्यामुळे चालतच जायचे ठरवले. हॉटेलवरून निघालो आणि अंदाजे चालत पुढे गेलो असता पाहिले एक छान सुपरस्टोर दिसले. लगेच मंडळी आत शिरली आणि सटरफटर खरेदी झाली. थोडेच पुढे एक "ग्रीन पार्क" नावाचे हॉटेल दिसले.

b

नावावरून जरा घोटाळा झाला पण आत शिरल्यावर मालकाच्या डोक्यावरच्या देवादिकांच्या तसबिरी बघून दाक्षिणात्य हॉटेल असल्याची खूण पटली आणि आम्ही निर्धास्त आत गेलो.तिथे एकदम टिपिकल केरळी पद्धतीचे थाळी जेवण मिळत होते. ३-४ भाज्या,रसम,सांबार, ढीगभर भात आणि अपलम पापड. अहाहा !! मजा आली आणि इथे असेतोवर जेवायला इकडेच यायचा निश्चय केला.

पोटभर जेवणानंतर पुन्हा हॉटेलवर जाऊन टी व्ही बघत लोळत होतो. ३ वाजत आले होते. तेव्हढ्यात ड्रायव्हरचा फोन आला आणि त्याने आम्हाला थोड्याच वेळात सेल्युलर जेलच्या दारात सोडले. एका ऐतिहासिक वास्तूच्या दाराशी आम्ही उभे होतो.

b

b

ब्रिटिशांनी जेव्हा भारतावर किंवा इतरत्र राज्य केले तेव्हा समुद्राच्या आजूबाजूचे प्रदेश त्यांनी तुरुंग म्हणून वापरले जसे की अंदमान,मंडाले,रत्नागिरी,ब्रिटिश गयाना,फ्रेंच गयाना बेटे वगैरे. पण त्यावेळी त्यांना स्वप्नातही वाटले नसेल की अजून १०० वर्षांनी ही ठिकाणे पवित्र तीर्थक्षेत्रे म्हणून ओळखली जातील. जसे प्रत्येक मराठी आणि भारतीय माणसासाठी मंडाले हे नाव टिळकांशी आणि गीतारहस्य ग्रंथाशी जोडले गेले आहे तसेच अंदमान हे नाव स्वा. विनायक दामोदर सावरकर आणि कमला या महाकाव्याशी. ब्रायटन हे त्यांच्या "ने मजसी ने" गीताशी जोडले आहे तर मार्सेली हे नाव जहाजाच्या पोर्ट होल मधून मारलेल्या उडीशी, लंडनमधील इंडिया हाऊस हे बॉम्ब बनविण्याशी आणि पुस्तके कोरून पिस्तुले भारतात पाठवण्याशी अशा अनेकानेक जागा. त्या पवित्र वास्तूमध्ये आत शिरलो आणि पहिले उजव्या हाताला एक बोर्ड दिसला.
b

तिथेच आत एक संग्रहालय होते जिकडे सेल्युलर जेलचे मॉडेल ठेवले होते आणि काही माहितीदर्शक फोटो भिंतीवर लावले होते. ते बघून गाइडबरोबर आत जेलच्या फेरिसाठी निघालो.

गाईड एका कुटुंबाचे २०० रुपये आकारतो पण ते जी माहिती देतात त्यामानाने ही किंमत फार नाही. (एकुणातच अंदमान महागडे नाही, किमती वाजवी आहेत)
b

पुढील माहिती विकिपीडियावरून
==================================
अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेअर येथे हे कारागृह आहे. मुख्य भारतीय भूमीपासून हजारो किलोमीटर अंतरावर आणि समुद्रापासून हजारो किलोमीटर दुर्गम अशा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या सैनिकांना तुरूंगात ठेवण्यासाठी हे ब्रिटीशांनी बांधले होते. काळ्या पाण्याच्या नावाखाली ती बदनाम होती.

ब्रिटिश सरकारने भारताच्या स्वातंत्र्य सैनिकांवर झालेल्या अत्याचारांचा मूक साक्षीदार असलेल्या या कारागृहाचा पाया १८९७ मध्ये रचला होता. या कारागृहात ६९४ खोल्या आहेत. ह्या खोल्या बांधण्याचा उद्देश कैद्यांमधील परस्पर संवाद थांबविणे हा होता. ऑक्टोपस प्रमाणेच सात शाखांमध्ये पसरलेल्या या तुरुंगाच्या आता केवळ तीन शाखा शिल्लक आहेत. जेलच्या भिंतींवर शूर शहीदांची नावे लिहिली आहेत. येथे एक संग्रहालय देखील आहे ज्यामधून शस्त्रे ज्यावरून स्वातंत्र्य सैनिकांवर छळ करण्यात आला होता.

अंदमानमधील वसाहतीच्या मुख्य उद्देश म्हणजे समुद्राच्या वादळात अडकलेल्या जहाजांना सुरक्षित जागा पुरविणे. असा विचार केला होता की बंदरांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी तोडगा काढणे हाच एक उपाय आहे. या बेटांवर तोडगा काढण्याचा पहिला प्रयत्न १७८९ मध्ये झाला जेव्हा कॅप्टन आर्चीबाल्ड ब्लेअरने चथम आयलँडमध्ये सेटलमेंट केली. ही जागा नेव्हिगेशनल म्हणून गणली जात असल्याने ही वस्ती उत्तर अंदमानमधील पोर्ट कॉर्नवालिस येथे नंतर हलविण्यात आली. वसाहतीचा तोडगा काढण्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला नव्हता आणि १७९६ मध्ये संपुष्टात आला.

६० वर्षांनंतर, या बेटांवरील बंदरांच्या संरक्षणासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रश्न आला होता, परंतु पहिल्या स्वातंत्र्यलढ्यात देशभक्तांना पेरण्यासाठी वास्तविकपणे १८९७ मध्ये बंदिवान वसाहतीची स्थापना केली गेली. अंदमान आणि निकोबार आणि निकोबार बेटांवर १० मार्च १८५८ रोजी २०० स्वातंत्र्यसैनिकांच्या पहिल्या तुकडीच्या आगमनाने कैद केलेल्या वसाहतीची कारावास सुरू झाली. बर्मा आणि भारतातील मृत्यूदंडातून काही कारणास्तव जगलेल्या सर्व दीर्घावधी व आजीवन कारागृहात असलेल्या देशभक्तांना अंदमानच्या बंदिवासात वसाहतीत पाठविण्यात आले.

पहिल्या स्वातंत्र्ययुद्धानंतर, वहाबी बंडखोरी, मणिपूर विद्रोह इत्यादींशी संबंधित सैन्य व इतर देशभक्तांना ब्रिटीश सरकारविरूद्ध आवाज उठवण्याच्या गुन्ह्याखाली अंदमानच्या बंदिवासात असलेल्या वसाहतींमध्ये पाठवण्यात आले.
=================================================
७ शाखा आणि मध्ये वॉच टॉवर अशा पद्धतीने बांधण्यात आले असले तरी आता या कारागृहाचे केवळ १,६,७ ह्याच शाखा शिल्लक आहेत. बाकीच्या ठिकाणी हॉस्पिटल्स वगैरे तयार करण्यात आली आहेत.

प्रत्येक शाखेच्या समोर पुढच्या शाखेची पाठ येते जेणेकरून कैदी एकमेकांना पाहू शकणार नाहीत. खुद्द सावरकर बंधूना २ वर्षे माहित नव्हते की ते दोघे अंदमानात आहेत. कैद्यांनी कामे करायचे कारखाने प्रत्येक शाखेच्या समोर आहेत. तेथे ठेवलेली तेल काढण्याची आणि काथ्या वळण्याची यंत्रे बघितली तर आजही अंगावर शहारा येतो.
b

b

b

दररोज तेल आणि काथ्याचा ठरलेला कोटा पूर्ण केला नाही तर ज्या शिक्षा देत असत त्या बघून कैद्यांचा किती भीषण छळ होत असेल याची पुरेपूर कल्पना येते.

b

आणि सर्वात कहर म्हणजे आजही तेथे असणारी फाशी देण्याची जागा. एका बंद झोपडीवजा खोलीत ३ फाशीचे दोर , त्याखाली पांढरी खूण केलेली कैदी उभी करण्याची जागा आणि एका बाजूला असलेली एक लोखंडी लिव्हर. ३ कैदी आणि मृत्यू यांच्या मधला अखेरचा दुवा.

b

b

किती जणांनी तिथे परमेश्वराकडे अखेरची प्रार्थना केली असेल? हा आपला शेवटचा क्षण आहे हे समजून किती जणांना तिथे रडू आले असेल? मृत्यू परवडला पण इथल्या कठोर शिक्षांमधून आता सुटका होणार या भावनेने किती जणांना तिथे आनंद झाला असेल? मला तिथे उभे राहवेना. हळूहळू समोरचे दृश्य डोळ्यातील अश्रुनी पुसट होत गेले.

पुढे निघालो आणि ७ व्या शाखेत तिसऱ्या मजल्यावरची शेवटची खोली बघायला गेलो. काय विशेष आहे या खोलीत? जश्या इतर ६९३ खोल्या तशीच ही पण एक.

b
पण नाही. या खोलीचे नशीब इतके विलक्षण की एक असामान्य कैदी तिथे काही वर्षे वास्तव्यास होता. त्या खोलीत त्याला मुद्दामून ठेवले होते. त्या खोलीत जायला नेहमीच्या दाराशिवाय अजून एक लोखण्डी दार आहे जेणेकरून कैदी पळून जाऊ नये. त्या खोलीतून समोरची फाशीची जागा सतत दिसत राहते आणि तिथल्या किंकाळ्या रोज ऐकू येत राहतात. तिथे राहणाऱ्या कैद्यांचे मन खच्ची व्हावे यासाठी ही सगळी व्यवस्था आहे. आपल्या असामान्य बुद्धीच्या जोरावर हजारो लोकांना दिशा दाखवणाऱ्या भयंकर जहाल आणि धोकादायक माणसासाठी एव्हढी तयारी तर हवीच.
b

b

पण कसले काय? ५० वर्षे मुदतीच्या दोन काळ्यापाण्याच्या शिक्षा एकत्र सुनावणाऱ्या न्यायाधीशाला हा कैदी म्हणाला होता "तुम्हाला नक्की खात्री आहे की अजून पन्नास वर्षे तुमचे राज्य आमच्यावर राहील?" जेलमधील हिंदू मुस्लिम कैद्यांना एकमेकांविरुद्ध भडकविण्याचा ब्रिटिशांचा प्रयत्न त्याने हाणून पाडला. दंडाबेडी वाजवून एकमेकांशी बोलायची भाषा तयार केली आणि कैद्यांना शिकवली. कमला हे महाकाव्य रचले. आणि तेलाच्या घाण्याला जुंपून शिवाय चाबकाचा मार देणाऱ्या बारी साहेबाला ठणकावले की "खबरदार यापुढे हात उचललास तर, आम्ही तर शीर तळहातावर घेऊन बाहेर पडलोय, तू मात्र सांभाळ--की घेतले न हे व्रत अंधतेने । लब्धप्रकाश इतिहास निसर्ग माने । जे दिव्य, दाहक म्हणूनी असावयाचे । बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे।।'

एकीकडे पावले यंत्रवत पुढे पुढे जात होती तर डोक्यात हे सगळे विचार धावत होते. त्या नादातच खाली उतरलो आणि बाहेर पडलो. थोडावेळ समोरच्या बागेत वेळ घालवून पुन्हा लाईट आणि साउंड शो साठी आत शिरलो. या शो बद्दल मी काय लिहिणार?

b

b

प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी बघावाच असा हा जबरदस्त शो आहे. शाखा १ आणि ७ च्या भिंतीचा पडदा करून प्रोजेक्टरने जी कथा तासभर दाखवली जाते ती पाहून एखाद्याचे डोळे पाणावले नाहीत तरच नवल.

b

b

शो च्या शेवटी राष्ट्रगीत चालू झाले आणि शेवटी उत्स्फूर्त पणे भारतमाता की जय असा जयघोष झाला. यंत्रवत बाहेर पडलो आणि गाडीत बसलो.

वाटेत बोलताना सगळेच या अनुभवाने भारावून गेले होते. पुढे एका चढावर बरेच ट्राफिक लागले. वाहने अडकली होती. काही कारण तर दिसत नव्हते. गाडी हळूहळू पुढे सरकली आणि ड्रायव्हरने सांगितले डावीकडे पहा. तिथे एक वाईन शॉप होते आणि ते बंद व्हायला शेवटची ५ मिनिटे बाकी असल्याने तिथे आडव्या तिडव्या गाड्या लावून दारू घेण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. क्षणात धाडकन वर्तमानात आलो आणि हसत हसत हॉटेलवर पोचलो.(क्रमश:)