स्त्री-पुरुषांच्या कामक्रीडेतील सुखाची सर्वोच्च पातळी म्हणजे संभोग. ही क्रिया संबंधित जोडप्याला सुख देण्याबरोबरच मानवी पुनरुत्पादनाशीही जोडलेली आहे. सुयोग्य काळात केलेल्या संभोगातून स्त्री-बीजांडाचे फलन होण्याची शक्यता बऱ्यापैकी असते. जेव्हा एखाद्या जोडप्याला नैसर्गिकरित्या अपत्यप्राप्ती नको असते त्या काळात विविध गर्भनिरोधक साधनांचा वापर केला जातो. या प्रकारची साधने पुरुष आणि स्त्री या दोघांसाठी वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध आहेत.

तात्पुरत्या गर्भनिरोधनासाठी पुरुषाने संभोगसमयी वापरायचे साधन हे तुलनेने सोपे असते. निरोध हे या दृष्टीने खूप सुटसुटीत व लोकप्रिय माध्यम आहे. त्याचा काळजीपूर्वक वापर केल्यास त्याची गर्भनिरोधक म्हणून उपयुक्तता बऱ्यापैकी चांगली आहे. याव्यतिरिक्त, निरोधच्या वापरामुळे वापरकर्त्यांना काही गुप्तरोगांपासून काही प्रमाणात संरक्षण देखील मिळते. आज बाजारात लॅटेक्स आणि अन्य अत्याधुनिक साधनांपासून बनवलेले निरोध मुबलक उपलब्ध आहेत. त्यांचा वापरही जगभरात मोठ्या प्रमाणावर होतो. निरोधची मूळ संकल्पना, त्याचा शोध आणि कालांतराने होत गेलेला विकास हा सर्व इतिहास खूप रंजक आहे. तो या लेखाद्वारे सादर करतो.
इतिहासात डोकावता निरोधच्या वापराबाबत एक गोष्ट लक्षणीय आहे. प्राचीन काळी निरोध म्हणून जे काही वापरले गेले, त्याचा उद्देश संबंधित स्त्री-पुरुषांच्या संपर्कातून गुप्तरोगाचा प्रसार होऊ नये, हा होता. (गर्भनिरोधन हा विचार कालांतराने पुढे आला).
निरोधच्या वापराची पहिली ऐतिहासिक नोंद ख्रिस्तपूर्व 3,000 वर्षांपूर्वी झालेली आढळते. तत्कालीन Knossos या राज्याचा Minos हा राजा होता. त्याच्या संदर्भातील दंतकथा विचित्र आहे. त्याच्या वीर्यात म्हणे “साप आणि विंचू” (= विष) असायचे ! त्यामुळे त्याने संभोगलेली एक दासी मरण पावली. या धोक्यापासून त्याच्या बायकोला वाचवण्यासाठी एक ‘निरोध’ तयार करण्यात आला. हा निरोध बकऱ्याच्या मूत्राशयापासून तयार केलेला एक पडदा होता. राजाराणीच्या संभोगादरम्यान हा पडदा राणीच्या योनीमध्ये बसवण्यात आलेला होता. म्हणजेच तेव्हा निरोध हे मुख्यत्वे पुरुषाचे साधन असते ही संकल्पना अजून आलेली नव्हती. थोडक्यात, स्त्री-पुरुष संभोगादरम्यानचा हा एक आंतरपाट अर्थात अडथळा !
या राजाराणीने संभोगसमयी या प्रकारचा प्राणीजन्य निरोध नियमित वापरूनही त्यांना तब्बल आठ अपत्ये झाली !
यानंतर जशी सामाजिक प्रगती होत गेली तसे जगातील विविध संस्कृतींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निरोध वापरले गेले. प्राचीन इजिप्तच्या लोकांनी प्रथमच लिननच्या आवरणाचा निरोध म्हणून वापर केला. रोमन लोकांमध्ये लिनन तसेच प्राण्यांच्या मूत्राशयापासून बनवलेले निरोध वापरात होते. न्यू गिनीतील टोळ्यांनी एक वैशिष्ट्यपूर्ण स्त्री-निरोध बनविला होता. तो 6 इंच लांब असून त्याला कपासारखा आकार होता. योनीच्या दाबाने तो योनीत घट्ट बसत असे.
यानंतर चिनी व जपानी संस्कृतीत वापरले गेलेले निरोध अजून वैशिष्ट्यपूर्ण होते. चीनमध्ये ते रेशमी कागदापासून बनवले गेले आणि त्यात वंगणाचा देखील वापर केला गेला. जपानी निरोध कासवाचे कवच किंवा वेळप्रसंगी चामड्यापासून देखील बनवलेले असायचे. काही आशियाई संस्कृतींमध्ये छोट्या आकाराचे शिस्न-निरोध देखील वापरात होते.
इसवी सनाच्या 15 ते 18 व्या शतकांदरम्यान युरोपीय वैज्ञानिकांनी निरोधच्या विकासामध्ये मोठा हातभार
लावला. त्यांच्यामध्ये प्रामुख्याने Gabriele Falloppio या इटालिय शरीररचनाशास्त्रज्ञाचे नाव घ्यावे लागेल (त्यांनी स्त्रीच्या गर्भाशयापासून निघालेली fallopian ही नलिका शोधलेली आहे). त्या काळी सिफिलिस हा गुप्तरोग खूप जोरात होता. म्हणून Falloppioनी असे सुचवले, की संभोगादरम्यान पुरुषाने निरोध चढवल्यानंतर मागच्या बाजूस तो रिबिनीने बांधावा.
17 व्या शतकात निरोधचा गर्भनिरोधक म्हणून देखील महत्त्वाचा उपयोग आहे हा विचार प्रबळ झाला. इंग्लंडमध्ये निरोध मोठ्या प्रमाणावर वापरले जाऊ लागले. परिणामी तिथल्या जन्मदरात लक्षणीय घट झाली. तत्कालीन लष्करात सिफिलसचे प्रमाण बऱ्यापैकी असायचे. त्यावर उपाय म्हणून लष्करात मोठ्या प्रमाणावर निरोधचे वाटप होऊ लागले. ते निरोध मासे, गुरे व मेंढ्या यांच्या आतड्यांपासून तयार केलेले होते.
यानंतरच्या काळात प्रचलित असलेली इंग्लंडमधील एक दंतकथा मोठी रंजक आहे.
इंग्लंडचा राजा चार्ल्स (दुसरा) एका समस्येने त्रस्त झाला होता. अनेक स्त्रियांनी असा दावा केला होता की त्यांना झालेली मुले या राजापासून झालेली आहेत. त्यामुळे राजाची औरस आणि अनौरस मुले कुठली यासंदर्भात बराच गोंधळ निर्माण झाला होता. हे सगळे पाहिल्यानंतर राजाचे डॉक्टर असलेले “कर्नल कंडोम” (Quondam) यांनी त्याला लैंगिक क्रियेदरम्यान नियमित निरोध वापरण्याचा सल्ला दिला. त्यांनी सुचविलेला निरोध हा कोकराच्या आतड्यांपासून तयार केलेला होता. कर्नल कंडोम यांनी ही गोष्ट सुचवल्यामुळे त्या साधनाला condom हे अपभ्रंशित नाव पडले अशी एक व्युत्पत्ती आहे. ही व्युत्पत्ती जरी सर्वाधिक लोकप्रिय असली तरी डॉ. कंडोम यांच्या अस्तित्वाचे ऐतिहासिक पुरावे काही मिळालेले नाहीत.
म्हणून या व्यतिरिक्तही अन्य काही व्युत्पत्ती असल्याचे मानले जाते:
१. Condus या लॅटिन शब्दाचा अर्थ साठवण्याचे भांडे किंवा पात्र..
२. kemdu या पर्शियाई शब्दाचा अर्थ आतड्यांपासून तयार केलेले साठवण्याचे साधन.
३. Guantone या इटालीय शब्दाचा अर्थ ‘मोजा’.
सन 1785 मध्ये कंडोम हा शब्द इंग्लिश शब्दकोशामध्ये समाविष्ट करण्यात आला. विविध प्रांतातील इंग्लिश बोलीभाषेनुसार त्याला wetsuit, the rubber, jimmy आणि nightcap अशी अनेक मजेदार नावे आहेत.
अखेर आधुनिक शब्दकोशांनी condom या शब्दाची व्युत्पत्ती 'अज्ञात' आहे अशी नोंद करून या प्रकरणावर तूर्त पडदा टाकलेला आहे !
मराठीत देखील निरोधसाठी फुगा आणि टोपी ही सोपी नावे प्रचलित आहेत.
अठरावे शतक संपण्याच्या सुमारास निरोधची घाऊक प्रमाणात विक्री सुरू झाली. परंतु तेव्हा जास्ती करून समाजातील सधन वर्गच त्यांचा वापर करीत होता. समाजातील सर्व स्तरांमध्ये लैंगिक शिक्षणाचा तेवढा प्रसारही झालेला नव्हता.
हळूहळू निरोधचा प्रसार समाजाच्या सर्व स्तरांमध्ये होऊ लागला त्यातून त्याचा वापर वाढला. परंतु समाजातील काही वर्गाकडून निरोधच्या वापराला विरोध देखील होऊ लागला या विरोधाची सर्वसाधारण कारणे अशी होती:
१. मुळातच गर्भनिरोधन करणे ही निसर्गविरोधी कृती आहे.
२. निरोधच्या वापरामुळे संभोगादरम्यानचे स्पर्शसुख बरेच कमी होते .
३. समाजात जर निरोधचा वापर खूप प्रमाणात होऊ लागला तर एकंदरीतच पुरुषांचा बाहेरख्यालीपणा वाढेल.
४. काही ‘संस्कृतीरक्षकांनी’ गुप्तरोग प्रतिबंधासाठी निरोधचा वापर या संकल्पनेला कडाडून विरोध केला. त्यांच्या मते बाहेरख्यालीपणा/ वेश्यागमन यासाठी गुप्तरोग ही निसर्गानेच दिलेली एक मोठी शिक्षा होती !
अशा तऱ्हेने निरोधचे समर्थन आणि विरोध हे दोन्ही हातात घालून वाटचाल करीत होते. दरम्यान निरोध कारखान्यांत तयार करताना त्यासाठी लिननचा वापर बऱ्यापैकी होऊ लागला आणि त्या लिननला विविध रसायनांनी अजून मऊ केले गेले. निरोध बनवून तयार झाल्यानंतर त्याची तंदुरुस्ती तो प्रत्यक्ष फुगवून बघून देखील केली जात असे.

जसजसे समाजातील लैंगिक शिक्षण वाढू लागले तशी निरोधची विक्री अनेक ठिकाणी होऊ लागली. त्यामध्ये औषधांच्या दुकानांव्यतिरिक्त केशकर्तनालये, मद्याचे गुत्ते आणि अन्य काही खुल्या बाजारांचाही समावेश होता. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत निरोध समाजातील गरीब वर्गापर्यंत देखील पोचलेला होता. साधारण सन 1920 च्या दरम्यान इंग्लंडमधील बिशप मंडळींनी, सार्वजनिक ठिकाणी लोकांनी वापरुन फेकून दिलेल्या निरोधांबद्दल जाहीर नापसंती व्यक्त केली होती.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात निरोधचा वापर या विषयाला एक नवा आयाम मिळाला. तेव्हा पाश्चात्य जगतात स्त्रीमुक्ती चळवळींचा उदय झालेला होता. त्यातील स्त्रियांनी,
“गर्भनिरोधनाचे साधन पुरुषांच्या हातात एकवटता कामा नये”
असा विचार समाजात सोडून दिला. त्यातून पुरुष-निरोधा ऐवजी स्त्री निरोध वापरण्याची संकल्पना विकसित झाली. संभोगादरम्यान स्त्रीने विशिष्ट प्रकारचा पडदा (diaphragm) वापरावा आणि संभोगसमाप्ती नंतर योनी शुक्रजंतूविरोधी द्रावणांनी धुवून काढावी असे सल्ले दिले गेले.
1960 च्या दशकात गर्भनिरोधनासाठी स्त्रियांनी खायच्या हॉर्मोनल गोळ्यांचा शोध हा एक क्रांतिकारक टप्पा होता. या शोधानंतर निरोधच्या वापरात काही प्रमाणात घट झाली. बघता बघता पुढील काही वर्षांत स्त्रियांच्या या गोळ्या जगभरात गर्भनिरोधनाचे प्रमुख आणि लोकप्रिय साधन बनल्या. पण पुढे कालांतराने पुन्हा एकदा निरोधच्या वापरांमध्ये लक्षणीय वाढ झाली.
जसजसा समाजात निरोधचा खप वाढत गेला तसे उत्पादकांनी त्याच्या दर्जात विविध सुधारणा केल्या.. अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा निरोध बनवले गेले तेव्हा ते सायकलच्या रबर ट्यूब इतक्या जाडीचे असायचे. हे निरोध उत्पादनानंतर जेमतेम तीन महिने टिकत असत. संशोधनातील पुढील प्रगतीनुसार रबरा ऐवजी latex चा वापर प्रचलित झाला. यांची टिकण्याची क्षमता तब्बल पाच वर्षांपर्यंत असायची. साधारणपणे सन 1990 च्या दरम्यान प्लॅस्टिकचा एक प्रकार असलेला Polyurethane हाही एक पर्याय उपलब्ध झाला. आधुनिक निरोध हे जास्तीत जास्त पातळ आणि तरीही मजबूत असतात. तसेच तयार झालेल्या निरोधमध्ये अतिसूक्ष्म छिद्रे नाहीत ना, हे इलेक्ट्रॉनिक यंत्रणेमार्फत तपासले जाते. विविध उत्पादकांमध्ये निरोधच्या पातळपणाबाबत स्पर्धा चालू असते.
“आमचा निरोध इतका तलम व मुलायम आहे, की तुम्हाला दोघांना मध्ये ‘तिसरा’ असल्याचे जाणवणार देखील नाही”
या प्रकाराच्या त्याच्या जाहिरातींनी ग्राहकांना आकर्षून घेतले जाते.
पारंपरिक निरोध पूर्ण ताणल्यानंतर बाहेरून गुळगुळीत असतात. त्यामध्येही काही वैशिष्ट्यपूर्ण सुधारणा पुढे केल्या गेल्या. अशा सुधारित निरोधांचा पृष्ठभाग खवल्यांचा (ribbed) बनवलेला असतो. या प्रकारच्या निरोध वापरामुळे संभोगादरम्यान पुरुष व स्त्री अशा दोघांनाही अधिक सुख मिळते असा दावा केला जातो. परंतु या बाबतीत जोडप्यांमध्ये बरीच अनुभवभिन्नता आढळते. निरोधच्या अंतर्गत भागात शुक्रजंतूमारक रसायन घालायचे किंवा नाही हा अत्यंत वादग्रस्त विषय आहे. काही उत्पादकांनी अजूनही त्याचा वापर चालू ठेवलाय परंतु बऱ्याच उत्पादकांनी आता त्याचा वापर थांबवलेला आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले काही निरोध येत्या भविष्यकाळात बाजारात येतील. त्यामध्ये प्रामुख्याने खालील तंत्रांचा समावेश आहे:
१. Graphene निरोध: यामध्ये कार्बन स्फटिकांचा वापर केलेला असल्याने ते अत्यंत तलम आणि तितकेच मजबूत असतात.
२. nano-वंगणयुक्त : यामध्ये पाण्याच्या रेणूंचा अतिसूक्ष्म थर वापरलेला असतो.
३. ‘अदृश्य’ निरोध: यामध्ये पुरुषाने प्रत्यक्ष परिधान करण्याचे साधन एक gel असते. संभोगादरम्यान त्याचा योनीशी संपर्क आल्यानंतर तिथल्या तापमानामुळे ते कडक होते.
४. ORIGAMI निरोध : हे सिलिकॉनचे असून त्यांच्या वापरतून 'नैसर्गिक स्पर्शसुख' जास्तीत जास्त मिळते असा उत्पादकांचा दावा आहे. तसेच ते गुदसंभोगासाठी विशेष उपयुक्त असल्याचे म्हटले जाते.
निरोधचे उत्पादन केल्यानंतर त्याचे आकर्षक वेष्टण बनवण्यात देखील बरीच कलात्मकता दिसून येते.
आज बाजारात पुरुष-निरोधांचाच वाटा मोठा आहे. त्यानुसार त्याच्या विक्री पाकिटांवरील चित्रांत स्त्रीदेहाचा मुक्त वापर केलेला आढळतो. आजच्या घडीला संपूर्ण जगात मिळून होत असलेली निरोधची व्यापारी उलाढाल कित्येक दशअब्ज रुपयांमध्ये आहे.
निरोध हे तात्पुरत्या गर्भनिरोधनाचे आणि ‘सुरक्षित’ संभोगाचे एक महत्त्वाचे साधन असल्यामुळे त्याचा सरकारी आणि खाजगी पातळीवरून भरपूर प्रचार केला जातो. त्याच्या विविध माध्यमांतील जाहिराती हा विषय देखील गेल्या शंभर वर्षांपासून वादग्रस्त ठरलाय. अनेक देशांत गेल्या शतकात त्याच्या जाहिरातींवर बंदी असायची; कालांतराने ती उठवली गेली. अजूनही निरोधच्या जाहिराती टीव्हीसारख्या माध्यमातून कोणत्या वेळेस दाखवायच्या यावर चर्चा झडताना दिसतात.
आजपासून सुमारे पाच ते सहा हजार वर्षांपूर्वी, संभोगादरम्यान निरोधचा वापर ही संकल्पना उगम पावली. त्याचा शास्त्रशुद्ध विकास गेल्या काही शतकांत झाला. या लेखात आपण निरोधची जन्म आणि कर्मकथा पाहीली. आरोग्याच्या दृष्टीकोनातून निरोधची उपयुक्तता, मर्यादा (यशापयश) आणि त्याच्या काही वापरसमस्या यासंबंधीचे विवेचन सवडीने नंतर कधीतरी स्वतंत्र लेखात करेन.
*****************************************************************************
चित्रसौजन्य: ‘विकी’.