महान देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज जयंती. त्यांची स्वातंत्र्यापूर्वीही अवहेलना झाली, स्वातंत्र्यानंतरही झाली आणि आजही काही लायकी नसलेल्या लोकांकडून त्यांची अवहेलना होतच आहे. त्यांचा जन्म झाला तो नाशिकजवळील भगूर ह्या गावी. अगदी काही वर्षांपूर्वी त्यांचे जन्मस्थान असलेला भगूर येथील वाडाही भग्नावस्थेत होता मात्र काही वर्षांपूर्वीच सरकारने त्याची डागडुजी करायला सुरुवात केली आणि आज ह्या वाड्याला बर्यापैकी त्याचे पूर्वीचे स्वरुप प्राप्त झाले असून स्वातंत्र्यवीरांचे एक उचित स्मारकच त्या ठिकाणी उभे राहिलेले आहे. मागच्याच महिन्यात केलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या ह्या जन्मस्थळाच्या सफरीचा हा वृत्तांत.
भगूरला मी खूप पूर्वी म्हणजे सुमारे वीसेक वर्षांपूर्वी नाशिकहून सायकलहून माझ्या मामेभावासमवेत गेलो होतो. तेव्हाच्या सायकली म्हणजे अगदी साध्याच. नाशिकवरुन भगूर सुमारे १६ किमी. तिथे जाताना सायकल तीन वेळा पंक्चर झाल्याची आठवणही अजून ताजीच आहे. मात्र तिन्ही वेळा सायकल पंक्चरचे दुकान जवळच असल्याने तेव्हा निभावले गेल्याची आठवण अजूनही ताजीच आहे. आता मात्र सायकल पंक्चरची दुकाने शोधूनही सापडत नाहीत, हल्लीचे आधुनिक सायकलस्वारही स्वतःच पंक्चर काढताना दिसतात. हा तर तेव्हा देवळाली बघून भगूरला पोहोचलो तर भग्न वाडा नेमका कुलुपबंद होता त्यामुळे हे स्मारक पाहता आले नाही. ती रुखरुख यावेळी मात्र दूर झाली. यंदा जवळपास दहा वर्षांनी नाशिकला गेलो. ह्यावेळी स्वतःची गाडी असल्याने मनाजोगे फिरता आले. नाशिकहून पाथर्डी फाट्याने देवळालीस पोहोचलो, तिथून भगूर जेमतेम ४ किमी अंतरावर. भगूर गावातच सावरकरांचा वाडा आहे. कुणालाही विचारताच कोणीही मार्ग दाखवू शकतो, गूगल नकाशाने तर थेट वाड्यापाशीच पोहोचता येते.
सावरकरांचा हा वाड्या मध्यंतरी पूर्वी कुणा दुसर्याच्या खाजगी मालकीचा होता, पुरातत्त्व खात्याने तो ताब्यात घेऊन त्याच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु आले, पूर्वी वाड्यातली जमीन मातीची होती, आता तिथे फरश्या बसवल्या आहेत, छतावर नवी कौले टाकली आहेत. पूर्वी वाळवी लागलेले जिने भक्कम करुन त्यांना व्यवस्थित पॉलिश केलेले आहे. वाड्याची निगा आता उत्तम प्रकारे राखली जातेय.
स्वातंत्र्यवीरांच्या जन्मस्थानाचे प्रथमदर्शन
स्वातंत्र्यवीरांचे जन्मस्थान असलेला हा वाडा दुमजली आणि प्रशस्त आहे. व्हरांडा, आतील खोल्या, माजघर, देवघर, बळद, अंतर्गत जीने, पोटमाळा यांनी परिपूर्ण आहे. वाड्यात आता ठिकठिकाणी स्वातंत्र्यवीरांच्या जीवनातील विविध छायाचित्रे, त्यांचा जीवनपट व्यवस्थितरित्या मांडलेला आहे. वाडा बघता बघता सावरकरांच्या आयुष्याचे समग्र दर्शन होत असते.
वाड्याच्या प्रांगणात असलेला सावरकरांचा अर्धपुतळा
जतनापूर्वीचे व जतनानंतरचे जन्मस्थळाचे स्वरुप
सातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे १९०६ रोजी पुणे येथे परदेशी कापडाची जाहिररित्या होळी करुन स्वदेशीचा उद्घोष केलेला प्रथम भारतीय, पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केलेला प्रथम भारतीय, बॅरिस्टरची परिक्षा उत्तीर्ण होऊनही राजकिय विचारांमुळे ब्रिटिश सरकारकडून पदवी नाकारण्यात आलेला प्रथम भारतीय, प्रखर राष्ट्रभक्तीमुळे मुंबई विद्यापीठाकडून पदवी हिरावून घेतलेला प्रथम भारतीय, (त्यानंतर त्यांना तब्बल ४९ वर्षांनंतर १९६० साली ह्याच विद्यापीठाकडून सन्मानतेने पदवीचे पुनःप्रदान करण्यात आले), १८५७ च्या उठावाची परदेशात जाहिरपणे सुवर्णजयंती साजरा करणारा पहिला भारतीय, प्रकाशनापूर्वीच दोन देशांनी बंदी घातलेल्या १८५७चे सातंत्र्यसमर ह्या ग्रंथाचा लेखक, भारतातील ब्रिटिश न्यायालयाचा अधिकार नाकारणारा पहिला भारतीय, हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात केवळ एका व्यक्तीच्या अटकेचा खटला लढवला गेलेला पहिला राजकीय कैदी, राजकीय कारणासाठी दोन जन्मठेपींची कैद झालेला एकमेव देशभक्त, कारागृहात लेखणी आणि कागद उपलब्ध नसताना तुरुंगांच्या भिंतीवर लेखन करुन सुमारे दहाहजार काव्यपंक्ती रचणारा आणि त्या मुखोद्गत करवून आणि तुरुंगाबाहेर पाठवून काव्यनिर्मिती करणारा जगातला एकमेव कवी, अस्पृश्योद्धारासाठी समाजाचा विरोध पत्करुन रत्नागिरी येथे पतितपावन मंदिर उभारणारा पहिला समाजसुधारक, मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्षपद भूषवलेली पहिली व्यक्ती, समाजकारणात रुळलेले फारसी, इंग्रजी शब्द काढून मंत्रालय, महापौर, नगरपालिका, क्रिडांगण, नगरसेवक असे विविध शब्द देऊन भाषा शुद्धिकरण करणारा महान भाषाज्ञानी.
त्यांच्या वाड्यातही त्यांचा अर्धपुतळा बसवण्यात आला आहे.
वाड्यात त्यांचा जीवनपट छायाचित्रांसोबत मांडलेला दिसतो. ह्या जीवनपटाचीच काही दृश्ये
वाड्याचा अंतर्भाग
पोटमाळा
वरचा मजला
स्वातंत्र्यवीरांचे पुस्तकांचे फडताळ
वाड्याचा मागील भाग
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९५३ रोजी पुन्हा भगूरला भेट दिली, याखेपी समस्त भगूरवासीयांनी त्यांचा सत्कार करुन त्यांना मानपत्र अर्पण केले.
आज आपल्या जन्मस्थळीच आपल्या प्रत्यक्ष दर्शनाचा सुयोग प्राप्त झाला हे आम्ही आमचे महत् भाग्य समजतो. आपल्या महान् कर्तृत्वाचा प्रारंभ ह्याच भगूरच्या पवित्र भूमीवर झाला, याची जाणीव असल्याने आमची आंतरिक हृदये अभिमानाने आणि उत्कट भावनेने आपल्या प्रदीर्घ काळाच्या या आगमनप्रसंगी आनंदाने भरून येत आहेत म्हणून आपापसांतील सर्व प्रकारचे मतभेद विसरून भगूरची जनता एकमुखानें आपल्या स्वागतास उभी आहे.
जेथे त्यागाला मर्यादा नाही, वैयक्तिक सुखदुःखाची चिंता नाहीं, आणि मृत्यूचे भय नाहीं, अशा उज्वल देशभक्तांचें उग्रवीरवत आपण आयुष्यभर प्रत्यक्ष आचरून दाखविलें आहे. तसेच रुढींच्या आणि फसव्या दांभिकतेच्या बंधनांनी जखडलेल्या समाजाला आपले सामाजिक जीवन विशुद्ध आणि विकसित करण्यासाठी सुधारणेच्या मार्गाने आपण पुढे नेत आलांत हे सर्व करीत असतांना आत्यंतिक आणि कठोर अशी निष्काम कर्मयोगाची भूमिका आपण यशस्वितेनें लढवू शकलांत ह्याची सत्यता भगूरकरांनांच काय पण संपूर्ण भारताला पटली आणि म्हणूनच आपले शब्द व आपली कृती राष्ट्राच्या इतिहासांतील एक अमोल संपत्तीच झाली आहे.
पारतन्त्र्याच्या काळांत मातृभूमीच्या श्रृंखला तोडण्याची आपण पराकाष्ठा केली. जन्मठेपेची शिक्षा आपण फुलासारखी झेलली. अन्दमान येथील हालअपेष्टांनी भरलेल्या भयंकर अशा कारागृहाला प्रासादतुल्य मानून हंसत हंसत कालक्रमणा केली. परक्यांनी निर्माण केलेल्या सर्व संकटमय अवस्थांतून पार पडण्यासाठी नी त्यांतून भारतमातेची मुक्तता करण्यासाठी प्राण पणाला लावून जी कार्यकुशलता, अतुल चातुर्य, प्रखर ध्येयनिष्ठा नी ज्वलन्त राष्ट्रभक्ती इत्यादि गुणांचा एक महान आदर्श निर्माण केला आणि याचि देही याचि डोळा आपली ही भारतभूमी स्वतंत्र झाल्याचे पाहिले.
स्वातन्त्र्य प्राप्त झाल्यानंतरही आपल्या देखत सर्वत्र समृद्धि नी शांतता व्हावी, परक्यांच्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी तसेच स्वराष्ट्र शक्तिशाली होण्यासाठी राष्ट्रांतील तरुणांनी अहमिकेने पुढे यावे आणि आपापसातील सर्व प्रकारचे क्षुद्र मतभेद नष्ट होऊन राष्ट्रपुरुष सर्वांग परिपुष्ट व्हावा म्हणून आपण ह्या आपल्या उतार वयांतही अविरतपणे कष्ट करीत आहात.
अशा प्रकारच्या आपल्या दिव्य आणि त्यागमय जीवन प्रणालीकडे पहात असतां आम्हां भगूर वासीयांना या खर्या देशभक्तीचा, समाजसेवेचा आणि नागरिकत्वाचा एक उत्कृष्ट आदर्श दिसत आहे.
तव अनुशासन जन संजीवन सिंहासन तुज नसे| सार्वभौम भूपाल परी तू जनादराचा असे |हे स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंद यांचे शब्द आपणांस यथार्थत्वाने शोभतात. यास्तव आत्यंतिक आत्मियतेने, अभिमानाने आणि अत्यादराने नतमस्तक होऊन आमच्या मनातील भावनांचे आणि विचारांचे निदर्शक असे हे मानपत्र आपणास समर्पित आहोत.
परमेश्वराने आपणास उदंड आयुष्य देऊन आपला भारतवर्ष सुख, समृद्धी आणि शांतता यांनी परिपूर्ण असलेला पाहण्याची संधी आपणांस द्यावी अशी आम्ही भगूरकर नागरिक एकमुखाने प्रार्थना करतो.
भगूर
दिनांक १२ मे १९५३
आपलें स्नेहांकित
समस्त भगूरवासीय नागरीक
भारतभूमीच्या ह्या महान सुपुत्राला प्रणाम