चौसष्ट रुपयांची बचत

बचत हे आम्हा मध्यमवर्गीयांचं आमरण व्यसन. पैसे वाचवले याचा आनंद काही वेगळाच असतो. बरोबरच आहे. आपला कष्टाचा पैसा उगाच का दवडायचा?

निवृत्तीनंतर वेळ भरपूर, शिवाय मिळकत बंद! आम्ही खाजगी क्षेत्रातले मजूर त्यामुळे पेन्शन नाही, फक्त टेशन. सबब काहीही खरेदी करायचं झालं तर वाण्यापासून अनेक ऑन लाईन विक्रेत्यांच्या किमती पडताळून पाहायच्या. जो स्वस्त तो आपला. कालंच घरातला तेलाचा बुधला संपला आणि राखिव बुधला वापरात आणला गेला. म्हणजे तेल विकत घेणे आले.
तपासाअंती अ‍ॅमेझॉन फ्रेश वर ९९९ चा बुधला ६९९ रुपये हा सर्वात स्वस्त दर आढळून आला. मागणी नोंदवणार तेवढयात डोक्यात किडा वळवळला. चहा एक किलोचा पुडा घेण्यापेक्षा १००ग्रॅमचे दहा पुडे घेतले तर साधारण शंभर रुपये वाचायचे ते आठवलं. वाचायचे अशासाठी मुकेश शेठच्या कृपेने आजकाल १ किलोचा पुडा घेतला तरी १०० ते १६० रुपये वाचतात. त्यामुळे छोटे पुडे घेणं बंद झालं. हे सांगण्याचा प्रपंच अशासाठी की चहाचा न्याय तेलाला का लागू नसावा असा किडा वळवळला. तात्काळ कळफलक बडवला आणि खरोखरच ५ लिटरच्या बुधल्यापेक्षा एक लिटरच्या पाच पिशव्या स्वस्तं असल्याचा साक्षात्कार झाला. एका लिटरला १२७ रुपये म्हणजे एकूण रुपये ६३५ म्हणजेच ६४ रुपये बचत! स्वतः वर खुश होत मी मागणी नोंदवली. आधीचा संपलेला बुधला टाकायचा राहिला होता त्यामुळे पिशव्या सांभाळण्यापेक्षा पिशव्या फोडून तेल बुधल्यात भरून ठेवायचं ठरवलं

दुसर्‍या दिवशी सकाळी माल घरपोच मिळाला. नाश्ता पार पडला होता. स्वयंपाकघर रिकामं होतं. भांडी घासणार्‍या बाई यायला थोडा वेळ होता. बायको बाहेरच्या खोलीत कुणाशीतरी फोनवर बोलत होती. बायकोनं ' या तेलाच्या पिशव्या कोण सांभाळत बसणार? 'अशी कटकट सुरू करायच्या आंत मी तेल बुधल्यात ओतून तिला चकित करायचं ठरवलं. ओट्याच्या टोकाला सिंकच्या कठड्यावर बुधला आणून, झाकण उघडून ठेवला. एक जुनं फडकं जे बाहेर तारेवर वाळत होतं ते आणलं. झालच तर ओट्याखालच्या कपाटात ठेवलेलं फनेल आणि कात्री देखिल आणली. सर्व सज्जता झाल्यावर त्या तेलाच्या पिशव्या आंत ओट्यावर आणून ठेवल्या. पहिली पिशवी उचलली, सफाईदारपणे पिशवी वरच्या टोकाला एका कोपर्‍यात कापली आणि बुधल्याच्या तोंडात ठेवलेल्या फनेलमध्ये ओतली. दूध पिताना लहान मुलं कधी कधी फुर्रकन दूध बाहेर काढतात तद्वत जाणारं तेलं मधेच जागीच खोळंबायचं. मग एका हातात पिशवी सांभाळत दुसर्‍या हाताने फनेल हलवुन तेल बुधल्यात जिरवायचं. पहिली पिशवी बुधल्यात रिकामी झाली आणि चेहर्‍यावर स्मित झळकलं. लगोलग दुसरी पिशवी जिरवली. मग तिसरी. तिसरी पिशवी वरच्या टोकाला कापून बुधल्यात ओतायला उचलली, आणि घात झाला. हाताची बोटं तेलकट, पिशवीही तेलकट ; नकळत पिशवी हातातून सटकली आणि मी सफाईने ती कसरत करत झेलताना तेल सांडलं. किमान अर्धी पिशवीतरी कामी आली असावी.

क्षणांत स्वयंपाकघराची अवस्था "खालून तेल, वरं तेलं, तेलं बाजूनी " अशी झाली. जमिनीवर तेल. ओट्यावर तेल. सिंकच्या कठड्यावर तेल, सिंकमधल्या भांड्यांवर तेल. फ्रिज्च्या दरवाजावर तेल. ओट्याखालच्या कपाटांच्या खाली फटीतून आत तेल. आणि साक्षात माझ्या देहाच्या डाव्या भागावर खांद्यापासून ते दोन्ही पायातल्यी रबरी चपलांना तैलस्नान! क्षणभर मी हतबुद्ध झालो. काय करावे सुचेना. नकळंत दबक्या आवाजात बयकोला हाक गेली. तो आवाज ऐकताच चाणाक्ष बाय्केला समजलं की काहीतरी गडबड आहे. स्वयंपाक घराच्या दारापाशी पोचताच बायको ते विहंगम दृश्य पाहून अवाक झाली. तिच्या चेहर्‍यावर एकाच वेळी हास्य आणि संताप झळकले. "तिथेच थांब"! कर्फ्यु मध्ये रस्त्यावर दिसलेल्या माणसाला पोलिस हटकतात त्याच जरबेच्या आवाजात बायको ओरडली. मग बराच वेळ माझं बौद्दिक झालं. "सरळ पाच लिटरचा बुधला आणायचा तर हे उपद्व्याप कोणी सांगितले होतं? " पासून 'तेल कसं भरायचं' यावर ज्ञान मिळालं. "आता हे कोण निस्तरणार? आधी सांगितलं असतंस तर मी आले असते मदतीला इत्यादी ऐकवलं गेलं. नशिब, त्या दिवशी शुक्रवार होता. शनिवार असता तर "तेल ओतलंच आहे, आता रूईच्या पानांचा हार आणते"हेही ऐकावं लागलं असतं.

आता ऐकावं तर लागणारंच होतं. बायकोनं एक जुना टॉवेल आणुन दिला, हात पुसायला. चपला कढुन ठेवायला एक प्लास्टिकची पिशवी देण्यात आली. उभं राहायला चार घड्या मारलेला एक जुना अभ्रा आला. मी किचन नॅपकिन रोलची मागणे केली; तेल टिपायला असा दुसरा उपाय नाही. ती पुरवण्यात आली,वर ऐकवण्यात आलं की तेल गेलं आणि निस्तरायला एक पेपेर रोल जाणार. आता अंगावरचं तेल निघालं तरी खाली आणि सिंकवर/ मध्ये सांडलेल्या तेलाचा प्रश्न होताच. वरच्या सफाईसाठी जुने कपडे देण्यात आले. मग खाली सांडलेलं तेल टिपायला बायको लांब दांडा लावलेली इस्त्रीच्या आकाराची फरशा साफ करायची घासणी घेऊन आली. परिस्थिती आटोक्यात आल्यावर पेपर नॅपकिनला पावलं पुसुन मला थेट अंघोळीला जायचं फर्मान सुटलं. तेलकट कपडे साबणात बुडवायला टब देण्यात आला. तोपर्यंत कामाच्या बाई आल्या. आपलं काम वाढलं हे त्यांनी ओळखलं. पण वरकरणी सगळं स्वछ होईल असं आश्वासन देत त्यांनी हे कसं झालं ते बायकोला विचारलं. बाइंनी संपूर्ण स्वयंपाकघर , ओटा, सिंक, भांडी वगैरे पुसुन लख्ख केलं. मी मुकाट्यानं अंघोळ केली. प्रकरण थंडावलं.

असो. पण या निमित्ताने अनेक गोष्टी झाल्या
चौसष्ट रुपये वाचले
तेल कसं ओतावं (किंवा ओतु नये) याचं प्रशिक्षण मिळालं
संपूर्ण स्वयंपाकघर ओट्यासह धुतलं गेलं
घरात घालायच्या चपला धुतल्या गेल्या
अनेक जुनी फडकी कामी आली
ऊठ सूठ वस्तू टाकून न देता जपून ठेवल्याचा कसा फायदा होतो हे ऐकायला मिळालं
दिवाळी नसतानाहे अभ्यंगस्नान घडलं