चित्रपट पाहताना सतत मध्येमध्ये येणारे कर्कश्य संगीत नकोसे झालेय ?
घिस्यापिट्या आणि ‘फ’कारयुक्त संवादांचा कंटाळा आलाय ?
तोच तोच मसाला पण नकोसा वाटतोय?
आणि
शांतपणे एखादी निव्वळ दृश्यमालिका बघावीशी वाटते आहे काय?
वरील सर्व प्रश्नांना तुमचे उत्तर ‘होय’ असेल.. तर मग खास तुमच्यासाठीच आहे हा चित्रपट: The Bra.

विदेशी चित्रपट असल्याने त्याची भाषा कोणती हा महत्त्वाचा मुद्दा. परंतु काळजी करायचे काहीच कारण नाही, कारण हा कागदोपत्री ‘जर्मन’ चित्रपट असला तरी एकही संवाद नसलेला आहे!
चित्रपट प्रभावी दृश्यमान आणि पुरेसा गतिमान असल्याने संवादांची गरज जाणवत नाही. नाही म्हणायला एका म्हाताऱ्या बाईंचे आवाजरहित जोरदार हास्य मात्र खूप मजेदार दिसते.
* चित्रपटाचे चित्रीकरण बाकू या अजरबैजानच्या राजधानीत आणि जॉर्जियात.
* The Bra या नावावरून जे आपल्या मनात येते तोच तर चित्रपटाचा विषय आहे.
* एका ट्रेनचालकाने त्याला सापडलेल्या निळ्या चोळीच्या मालकिणीच्या शोधाची ही रंजक कथा.
ट्रेन खेड्यातील वस्तीच्या अगदी जवळून किंबहुना धोकादायक अंतरावरून जाताना दाखवलेली. ट्रेन वस्तीच्या शेजारून जात असताना लोकांनी अंगणात वाळत टाकलेले दोरीवरचे कपडे (ज्यात स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांचाही समावेश आहे) वाऱ्याच्या झोताने उडून ट्रेनच्या बाहेरील भागात अडकून पडणे ही नित्याची घटना.
अशाच एका दिवशी ट्रेनवर एक निळी आकर्षक काचोळी (bra)अडकते. तो दिवस संबंधित ट्रेन चालकाच्या नोकरीतील अखेरचा दिवस असतो. त्याच्या त्या ट्रेन-प्रवासादरम्यान त्याने एका घराच्या खिडकीतून आतमध्ये चोळी बदलत असलेली एक स्त्री पाहिलेली असते. ती आठवण मनात ठेवून आता तो या सापडलेल्या चोळीच्या मालकिणीचा शोध घेऊ लागतो.
ही कल्पनाच मोठी मजेदार आहे.
बारीक-सारीक तपशिलांचे सुंदर चित्रीकरण. ट्रेन सुरू करताना तिचा पँटोग्राफ जेव्हा इलेक्ट्रिक वायरला स्पर्श करतो तेव्हा उडणाऱ्या ठिणग्या मस्त दिसतात.
ट्रेन नियंत्रण कक्षातील कर्मचारी स्त्रीच्या सुरेख हालचाली.
“ही चोळी कोणाची?” या मोहिमेवर निघालेला चालक… त्याला दारोदारी आलेले अनेक अनुभव..
काही स्त्रिया त्याला दारातूनच परत पाठवतात तर काही स्त्रियांनी प्रत्यक्ष ती चोळी स्वतः घालून बघितल्याची भन्नाट दृश्ये...
जेव्हा तो अशा स्त्रियांना बॅगेतून काढून ती चोळी दाखवतो, तेव्हा त्या स्त्रिया "ही माझी नाही" असे लगेच का सांगत नाहीत, हा प्रश्न मात्र प्रेक्षकांनी विचारू नये !
अशा बऱ्याच स्त्रियांकडून नन्नाचा पाढा ऐकल्यानंतरही त्या चालकाने चालूच ठेवलेला शोध..
दरम्यान त्या गावात एक फिरते मॅमोग्राफी शिबिर भरते. तिथे लागलेली स्त्रियांची रांग.. चालकाने तिथे डॉक्टरचा वेश घालून तोतया डॉक्टर बनून जाणे..
तरीही अजून त्याचा शोध चालूच ..
एका घरात हा चोळीप्रयोग केल्यानंतर त्या बायकोचा नवरा आणि त्याने बोलवलेल्या माणसांकडून चालकाची झालेली बेदम पिटाई.. त्याला साखळदंडांनी जखडून रेल्वे रुळांवर आडवे टाकतात..
त्यातून त्याची सुटका होते का ? कोण मदत करते त्याला ?
अखेर..
कर्मधर्मसंयोगाने चोळीच्या मालकिणीचा शोध लागतो का? हे प्रत्यक्ष चित्रपटातच बघा.. !
यू ट्युबवर उपलब्ध.
आधुनिक काळातील एक चांगला मूकपट !