एक चावट लेख!!

नमस्कार मंडळी
पुण्यात गाडी म्हणजे "स्कुटर". पण ह्या लेखात गाडी म्हणजे "मोटारगाडी" असे वाचावे. तर सहसा प्रत्येक माणसाला गाडी घ्यायची आणि चालवायची हौस असतेच. ठराविक वय झाले की गाडीची गरज प्रकर्षाने भासू लागते. काही जण इतरांची गाडी चालवून आपली हौस भागवून घेतात. पण सगळ्यांचेच नशीब एव्हढे चांगले नसते. त्यांना वाट बघायला लागते. काहीजणांना तर फारच उशीर होतो तर काहीजण त्या फंदातच पडत नाहीत. काहीजणांना गाडीचा इतका वाईट अनुभव येतो की ते प्रतिज्ञा करतात की वेळ पडल्यास टॅक्सीवर काम भागवेन पण पुन्हा आयुष्यात गाडी घेणार नाही.

तर मुद्द्यावर येउयात.
गाडी घेण्याआधी पैशाची सोय करावी लागते. जागेची सोय करावी लागते एक ना दोन. मग गाडी घ्यायला उत्सुक लोक टी.व्ही./ इंटरनेट, अनुभवी लोकांचा सल्ला, शो रूमच्या फेऱ्या अशा चक्रात अडकतात. सगळ्यांना वाटते की आपली गाडी युनिक असावी. रस्त्याने जाताना लोकांनी वळून वळून बघावे आणि हेवा करावा. आपली कॉलर ताठ व्हावी. पण नंतर आपली कुवत लक्षात आली की आपसूक पाय टाटा, मारुती , ह्युंदाई कडे वळतात. फक्त एक काळजी घ्यावी , बजेट कमी असेल तरी शक्यतो सेकण्ड हॅन्ड गाडी घेऊ नये. नक्की काय प्रॉब्लेम असेल काय माहित?

पुढे एक मॉडेल पसंत पडले तरी अजून चांगले दुसरे मॉडेल बाजारात येईल किंवा असेल या विचाराने चालढकल केली जाते. एखादे मॉडेल पसंत पडले तर ते महाग असते, दुसरे जरा बजेटमध्ये पण थोडे कमअस्सल वाटते. शेवटी एकदा सगळे जुळले की गाडी बुक होते.मग ती घरी येण्यासाठी वाट बघणे सुरु होते. या काळात ती गाडी आपल्याला अधिकाधिक सुंदर वाटू लागते. रोज स्वप्नात येऊ लागते.कधी एकदा ती आपल्या हातात येईल याची स्वप्ने रंगवणे चालू होते. त्या स्वप्न रंजनात कधी हातातून चहा सांडतो तर कधी जेवणाकडे लक्ष राहत नाही.ऑफिसच्या कामाचे तर विचारूच नका.

शेवटी एकदाचा तो दिवस उगवतो. आप्त स्वकीयांबरोबर गाडी घरी आणली जाते. घरादाराला तिच्या स्वागताची उत्सुकता असते. पहिल्या वहिल्या गाडीचे जंगी स्वागत केले जाते. तिला कुंकू वगैरे लावून ओवाळले जाते. शेजारपाजारची मंडळी दारा खिडक्यांतून डोकावून आनंद, आश्चर्य ,जळजळ इत्यादी भाव दाखवत असतात. आपण त्या सगळ्याची मजा घेत असतो. या सगळ्यात पहिला दिवस कसा भर्रकन निघून जातो.

आता खरी लढाई सुरु होते. ड्रायव्हिंग स्कुलची सुरक्षित गाडी आणि आपली ही गाडी यात जमीन अस्मानाचा फरक असतो. ती गाडी शंभर जणांनी हाताळलेली असते आणि ठोकाठोकी करून झालेली असते. शिवाय बाजूला शिक्षकाच्या हाती कंट्रोल असतो. आपली गाडी नवीकोरी, शिवाय चुका सांगायला कोणीच नाही. अशा वेळी अपघात टाळण्यासाठी सुरक्षा साधने वापरणे कधीही चुकवू नये. रबर सीटबेल्ट , जीवरक्षक फुगे(एअर बॅग्स) नक्की वापरावे. काहीजण तर ड्रायव्हिंग स्कुलमध्ये न जाता एकदम स्वतः:च्याच गाडीवर शिकतात , त्यांनी तर हे नियम नक्कीच पाळावेत.

पहिले पहिले गाडी चालवताना फार टेन्शन येऊ शकते. पण हळूहळू गाडीला तुमची आणि तुम्हाला गाडीची सवय झाली की एक प्रकारचा सहजपणा येतो, नव्हे हळूहळू मजा येऊ लागते. पट्टीचा पोहणारा कसा नंतर वेडावाकडा , उलटा सुलटा, एका हाताने किंवा पायाने , बसून किंवा झोपून पोहतो तशा वेगवेगळ्या प्रकारे गाडी चालवावी असे वाटू लागते. फक्त या सगळ्या प्रकारात गाडीला त्रास होणार नाही ना , हे मात्र बघावे. गाडी चालवण्या आधी थोडा वेळ चालू करून तिचे इंजिन गरम होईल असे बघावे. जर हे गणित जुळले, तर मात्र तुमच्यासारखे सुखी तुम्हीच. हळूहळू जशी तुमची तार जुळत जाते, तसे गाडी जास्त ऍव्हरेज देऊ लागते. मात्र तरीही सिग्नल वगैरे सारखे `नियम नेहमीच पाळावेत.

गाडीची वेळोवेळी सर्व्हिसिंग करावीच पण कधी कधी मात्र गाडीला काही खरचटले किंवा दुखले खुपले तर् इमर्जन्सी सर्व्हिसिंग करावी लागू शकते. यासाठी एक नेहमीचा ओळखीचा मेकॅनिक असावा. किंवा सरळ शोरूम मध्ये गाडी न्यावी. मात्र काही केल्या या छोट्या काट्याचा नायटा होऊ देऊ नये, नाहीतर गाडी रुसायला वेळ लागत नाही. आणि गाडी एकदा का रुसली की तिची समजूत काढून तिला रुळावर आणायला फार म्हणजे फारच प्रयत्न करावे लागतात. ते फार वेळखाऊ (आणि कधी कधी पैसेखाऊ पण ) काम असते. तर् या छोट्या मोठ्या कुरबुरी वाढू देऊ नयेत. म्हणजे आपल्याला आणि गाडीला दोघांना त्रास नाही. अजून एक मुख्य गोष्ट म्हणजे गाडी नेहमी वापरात असावी. न वापरल्याने वस्तू गंजतात. वापरातील वस्तू कधीही हुकमी कामाला येते. आणि हो!! आपली गाडी आपणच चालवावी, कधीही दुसऱ्याच्या हाती देऊ नये. कारण प्रत्येकाची चालवण्याचे पद्धत वेगळी असल्याने गाडीला त्रास होतोच , आणि आपल्याही नात्यावर त्याचा परिणाम होतो. तर् मंडळी लिहिण्या सारखे बरेच काही आहे. पण सूज्ञांस अधिक सांगणे नलगे. त्यामुळे थांबतो.

आणि काय म्हणताय ? या सगळ्यात चावटपणा काय आहे? तर् मग आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!