मागच्या आठवड्यात मला एका मुलीचा व्हॉट्सअप मेसेज आला होता.मग कुठल्यातरी अमेरिकेतल्या नंबरावरून फोन आला.म्हणाली घरून काम करा आणि पैसे कमवा.म्हणे फेसबुक,इंस्टाग्राम,युट्युबवर वगैरे बघून ते सांगतील त्या अकाउंटला लाईक करायचे पैसे मिळणार. म्हटले घरबसल्या काय वाईट आहे? ती म्हणाली तसे पहिले ५०० रुपये भरून अकाउंट उघडले.पहिल्याच दिवशी १०० रुपये मिळाले कामाचे. मी खुश. रोज साधारण तेव्हढेच मिळत होते.२-३ दिवसांनी मी कॉल करून विचारले की जास्त पैसे मिळवायला काय करावे लागेल? ती म्हणाली ५० हजार रुपये भरून प्रीमियम अकाउंट काढावे लागेल. तेही काढले. आता मला दररोज ५०० रुपये मिळू लागले. मजाच आहे, हे असेच चालत राहिले तर लवकरच मी नवी गाडी घेऊन टाकणार.
=====================================
काल पुन्हा तिचा फोन आला.म्हणाली १० लाख रुपये भरून गोल्ड अकाउंट काढलेत तर रोज साधारण ५ हजार रुपये कमवाल. कुठेत माझ्याकडे एव्हढे पैसे? काहीतरी जुगाड करायला हवा. २-३ मित्रांना विचारून पहिले. सगळेच कंगाल. शेवटी बाबांनी एक एफडी मोडला आणि थोडे पैसे दिले. बाकी पैसे आईने दागिने विकून दिले.ताबडतोब त्या मुलीच्या अकाउंटला ते पाठवले.रात्रभर झोपच आली नाही. मी आता माझी कुरियर बॉयची नोकरी सोडून हेच काम करणार. घरबसल्या दिवसाला ५ हजार रुपये मिळणार असतील तर अजून काय पाहिजे? घरही बांधायचे आहे. पुढच्या वर्षी गावी जाऊन लग्नाचा बार उडवणार.
पण सकाळपासून त्या मुलीचा फोन बंद येतोय.आज कामही मिळाले नाहीये.नक्की काय झाले असावे?