जर तुम्ही पू लं चे चाहते असाल तर जनोबा रेगे हा इसम/व्यक्तिरेखा तुम्हाला माहिती नाही असे होणे शक्य नाही. बटाट्याच्या चाळीतला एक अफलातून विनोद बुद्धी असणारी ही व्यक्ती. चाळीत खर म्हणजे एकापेक्षा एक नमुने आहेत, पण ह्याची बात काही औरच. ह्या व्यक्तिरेखेची 2 ठळक वैशिष्ट्ये, अत्यंत मोजक्या शब्दात विनोद निर्मिती आणि अफलातून म्हणावी अशी टायमिंग. एखादा अत्यंत महत्वाचा प्रसंग आहे त्यात सगळे गंभीरतेने चर्चा करत आहेत आणि अशा वेळी अचानकच असं काहीतरी ही व्यक्ती बोलून जाते की त्या प्रसंगाच गांभीर्य समूळ नष्ट होऊन जातं आणि चालू असणारी गोष्ट खरोखरच गांभीर्याने घ्यायची गरज आहे का असा प्रश्न निर्माण होतो. गच्चीसह झालीच पाहिजे ह्यात आचार्य बाबा बर्वे हे भाषण करत असताना मूळ मुद्द्यावर न येता बाकीची बडबड करत असताना, "अरे पण गच्चीच काय? हे काय बोलता?" हा प्रश्न अख्ख्या चाळीत फक्त जनोबाच विचारू शकतो किंवा पंत वजन कमी करण्यासाठी उपोषण चालू करतात तेव्हा सगळी चाळ त्यांना सल्ले द्यायला उलटते तो प्रसंग. आलेला प्रत्येक जण काहीच्या काही सल्ले देतोय त्यात बटाटा सोड असा सल्ला आल्यावर, "कोणी कुठं राहतोस असं विचारलं तर नुसतच चाळीत राहतो म्हण, बटाट्याची म्हणशील तर वजन वाढेल" अशी सामान्य भाषेत ज्याला कुजकट म्हणतात ती कमेंट सुद्धा हाच इसम करो जाणे.
तर अशा ह्या जनोबाचे 2 वंशज मला भेटले. त्यांना पाहून कळलं की जनोबा ही एक वृत्ती आहे. आमच्या सोसायटीची मीटिंग होती. त्यात वेगवेगळे मुद्द्यांवर अतिशय कंटाळवाणी चर्चा सुरू होती. एक आजोबा म्हणत होते की आपल्या सोसायटीत जो वॉकिंग ट्रॅक आहे त्याच्या बाजूला आपण तुळशीची रोपे लावुया. नकार कोणाचाच नव्हता पण आजोबा फायदे सांगायला लागले, थांबायचं नावच घेत नव्हते. इतक्यात माझ्या बाजूला बसलेले काका मला म्हणाले ही चांगली कल्पना आहे, तेवढंच बायकोला हैदरबादमध्ये तुळशीबागेत फिरल्याचा फील येईल. मला चांगलचं हसू फुटलं आणि ते मात्र शांत होते.
दुसरा वंशज ऑफिसमध्ये भेटला. ऑफिसमध्ये काही उत्साही लोकांना बऱ्याच गोष्टींची हौस असते. त्यांनी काही senior लोकांची मुलाखत घ्यायचं ठरवलं. आता मी नवीन असल्यामुळे प्रेक्षकात बसलो होतो आणि माझ्या बाजूला एक senior बसले होते. मुलाखती कंटाळवाण्या होत्या. त्यात एकीने विचारलं की नवीन जॉईन झालेल्या लोकांना तुम्ही काय सांगाल? माझ्या बाजूचे जनोबा एकदम मला म्हणाले, " फक्त काम कर, हे असले रिकामे कामं नको करू!" हे वाक्य आजूबाजूच्या काही जणांना पण ऐकायला आलं, ते मात्र मी त्या गावचाच नाही असे भाव घेऊन बसले होते.
पू लं च्या प्रतिभेला सलाम केला मी. असे वंशज तुमच्या पण आजूबाजूला असतीलच, नक्की. तुम्ही मात्र कुशाभाऊ अक्षीकर असणं गरजेचं आहे कारण जनोबा फक्त त्याच्याच कानात ह्या गुजगोष्टी करत असतो!
अमोल कुलकर्णी