सावरकर हा विषय का काढला असेल राहुलने आणि तमाम तथाकथित सेक्युलर, ढोंगी पुरोगामी, हुशार विचारवंतांनी का बरे तो उगाळायचा ठरवला असेल ? 2024 मध्ये काहीही करून मोदी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत याची यांना कुणी सुपारी दिलीय की काय ही शंका यावी !!
भारतीय समाजात एक अजस्त्र ध्रुवीकरण झाले आहे. याचा थांगपत्ता मोदी विरोधकांना नाही हे अशक्य आहे. काँग्रेस पक्षाचा नेता तपस्या, रामायण, मंदिरांमध्ये पूजा, जानवे परिधान करून फोटोग्राफी असले उद्योग अन्यथा का करेल ? सगळे राजकीय प्रयत्न करून झाल्यावर ज्या कारणामुळे मतदान मोठयाप्रमाणात विभागले जात आहे ती दृश्य वाटणारी कारणे निष्प्रभ करण्याचे हे प्रयत्न होते. मी ही त्यातलाच, तुमचाच हे सांगण्याचा प्रयत्न. आपल्या ढोंगी पुरोगाम्यांची देखील भाषा गेल्या पाचसात वर्षात बदलल्याचे जाणवले आहे काय ? आम्ही देखील हिंदूच आहोत अशी बऱ्याचदा ते सुरुवात करतात...
ध्रुवीकरण धार्मिक नाहीय. अनेक दशके पसरविलेला खोटा इतिहास, खोटी समाजरचना, खोटा जातीयवाद, खोटे अर्थकारण कळायला लागल्यामुळे जागृत झालेल्या समाजाच्या मोठ्या भागाने - 38 टक्के - मोदीना उचलून धरले आहे. ध्रुवीकरण भ्रमित करणारी व्यवस्था आणि आपली ओळख कळलेला, जागा झालेला समाज यांच्यामध्ये झाले आहे. हिंदुत्व हे निव्वळ वरवरले दर्शन आहे, किंवा चतुर लोकांना तितकेच बघायचे आहे आणि दाखवायचे आहे. त्यामुळे हे बिनडोक लोक मुसलमान भयभीत आहेत वगैरे अत्यंत बकवास आणि पोकळ प्रचार करत असतात. यांना आज ही वाटते की हा केवळ राजकीय विषय आहे. त्यामुळे समस्त विशेषतः ढोंगी विचारवंत, सोंगाडे पुरोगामी इत्यादींच्या लिखाणात बोलण्यात 'काहीही करा - म्हंजे तत्वांना कितीही बगल द्या - पण मोदीला खाली खेचा' इतकाच प्रचार वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये झळकताना दिसेल. समाजाची नस न ओळखणाऱ्या या सगळ्यांची ही स्थिती अतिशय केविलवाणी आहे.
अन्य क्रांतिकारकांच्या का नाही सावरकरांचीच गौरव यात्रा का काढताय या प्रश्नाच्या उत्तरात समाजमनाचे दर्शन आहे. गांधीजींपासून, भगतसिंग, बोस, पटेल, मौलाना आझाद, आझाद, अश्फाक उल्लाह.... इत्यादी सगळ्यांच्या ऋणात भारतीय समाज आहेच. या सर्वांच्या - सहस्त्रावधी ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या - योगदानामुळे आमच्या स्वतंत्र, मुक्त जगण्याचा बेसिक अधिकार मिळाला आहे याची प्रत्येक भारतीयाला जाणीव आहे. पण या पलीकडे अनेक दशके आपली फसवणूक होत होती, इंग्रज गेल्यावर देखील आपलेच स्वार्थी लोक आपल्यात भेद निर्माण करत आपल्यावर राज्य करत राहिले. आपल्याच शहाणे समजले जाणाऱ्या आजुबाजुच्या विचारवंतांनी त्या स्वार्थी लोकांची सुपारी घेऊन आपल्याला फसविले हे आता भारतीय लोकांना समजायला लागले आहे. असा जागृत समाज मोदींच्या पाठीमागे आहे. हे न ओळखता बावळट लोक पुन्हा तोच तो घोळ घालत बसताहेत.
सावरकर हा विषय जितक्या वेळेला छेडला जाईल तितक्या वेळेला समाजातल्या जागृत झालेल्या जनतेला डिवचले जाईल. सावरकरांनी माफी मागितली की नाही किंवा गांधीजी लहान मुलींबरोबर त्यांना कपडे न घालू देता नागडे झोपत होते का होते... याच्याशी लोकांच्या श्रद्धेला काहीही घेणे देणे नाही ! सावरकरांवर अगदी अन्य स्वातंत्र्य सैनिकांवर आहे तशीच आणि तितकीच श्रद्धा आहेच, पण या निमित्ताने व्यक्त होते आहे ती मात्र चीड- अनेक दशके फसविले गेल्याची..याच्या मध्ये केवळ हिंदुत्व, संघ, मोदी असे काहीही नाही.
राहुल आणि सावरकरांवर - म्हणे संशोधन करून - टीका करणाऱ्या समाजातल्या समस्त हुश्शार लोकांचे आभार ! तुम्ही तुमचे धंदे करत राहता त्यामुळे गौरव यात्रा जल्लोषात निघत आहेत सावरकर हा विषय घराघरात पोचतो आहे.. परिणाम हा नाहीय की हजारो नवीन सावरकर भक्त तयार होतील, तो तसा सावरकरांचे तत्वज्ञानच होऊच देणार नाही. परिणाम हा होतोय की अधिकाधिक भारतीय समाज जागृत होतो आहे. अधिकाधिक जनतेला आपण अनेक दशके आपल्याच लोकांकडून नाडले गेलो हे कळते आहे. आणि या सगळ्याचे खलनायक स्टेजवर, टीव्हीत, ट्विटरवर दिसतातच - जे अकारण - सावरकरांसारखा विषय छेडून समाजाच्या भावनांची चेष्टा करीत आहेत. शिवाय आजुबाजुला आपल्या वॉल वर गांधीजींचे फोटो चिकटवून, साने गुरुजींच्या मार्दवतेचा आव आणत, दाढीचे खुंट वाढवून, जातीअंताची भाषणे ठोकत समाजाला भ्रमित करणारे, समाजाचा बुद्धिभेद करणारे, भारतीयत्वापासून नाळ तोडू पाहणारे ...खल नायकांपेक्षाही डेंजरस शत्रु कोणकोण आहेत हे देखील समाज जवळून बघतो आहे.
-सुधीर मुतालीक