"अहो, तुम्ही नका ना त्याला सारखे सारखे टोचून बोलू. आपण दोघे डॉक्टर आहोत म्हणजे त्याने सुद्धा डॉक्टरच व्हायला पाहिजे का? एकुलता एक मुलगा आपला.नसेल त्याची इच्छा तर त्याला जे करायचे ते करू दे ना?"
म्हणजे काय? एव्हढी मेहनत करून आपण हे हॉस्पिटल उभारलंय. ते कोण सांभाळणार पुढे? त्यात रशिया युक्रेनचाही पर्याय बंद झालाय. चायनाबद्दल तर बोलायलाच नको. त्यापेक्षा माझ्या डोक्यात एक कल्पना आलेय. रामसिंग आठवतो तुला?आपल्या हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय होता तो? आजकाल टेचात मर्सिडीजमधून हिंडत असतो. परवाच भेटला होता मला. म्हणाला "डॉक्टरसाब चिंता मत करो. आप बस जेब ढिली रखो, और कितने मार्क्स चाहिये बोलो. बाबू को डॉक्टर बनाने की जिम्मेदारी मेरी"
==============================
खरेतर मला सायन्सला ऍडमिशन घ्यायचीच नव्हती. पण आई बाबांची भुणभुण. त्यात आता हे नीटचे भूत मानगुटीवर बसलेय. मान मोडेतोवर अभ्यास केला पण बायोलॉजि मुळातच आवडत नाही तर काय? बाबांना सांगितले , तर म्हणतात "तू काळजी करू नको, मी बघतो." अरे पण नीट द्यायला मला कॉन्फिडन्स पाहिजे ना?तिकडे तुम्ही थोडीच येणार मदत करायला?
काल रामसिंग आला होता. मला म्हणाला "बाबू, तुम चिंता मत करो.बस मैं बोलता हू वो मोबाईल,सिम और ब्लु टूथ खरीदलो. बाकी मैं संभालुंगा"
आज नीटची परीक्षा आहे. रामसिंगने निळा शर्ट घालून यायला सांगितलेय. छातीत धडधड होतेय. निळा शर्टवाले बरेच दिसताहेत.बुटात मोबाईल टोचतोय, आणि कानात ब्लूटूथ. कानात सूचना ऐकायला येताहेत. आता पुढे?