Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

जिरेटोप

जनातलं, मनातलं

जिरेटोप

सदस्य
— लेखन
— प्रतिक्रिया
2026 पासून
📅
सदस्य झाले
13 March 2026

या सदस्याने अद्याप परिचय लिहिलेला नाही.

या सदस्याचे लेखन पाहण्यासाठी येथे Views block ठेवा.

जे.पी.मॉर्गन
Fri, 03/10/2023 - 19:44

"सर... ओळखलंत का मला?"

आईशप्पथ सांगतो... असं अचानक कोणी रस्त्यात भेटलं की माझी जाम गडबड होते. एक तर आपली मेमरी सुभानअल्ला! आणि त्यातून "ओळखलंत का मला" म्हणणारा इसम किमान ४-६ वर्षांनी समोर टपकलेला असतो. अश्या वेळी प्रोसेसर मेमरीची क्लस्टर्स शोधत असताना कितीही प्रयत्न केला तरी माझ्या चेहर्‍यावर मात्र स्क्रीनसेव्हर लावलेला स्पष्ट दिसत असतो.

पण ह्याला ओळखायला क्षणभरच वेळ लागला. कारण त्याचे ते धारदार डोळे आणि त्यांच्या मधला टिळा हे कॉम्बिनेशन. परेश - माझ्या आधीच्या कंपनीतला अ‍ॅडमिन मॅनेजर. उमदा गडी. आपल्याच तानात असायचा. कानाला भिकबाळी, कपाळाला केशरी टिळा, बुलेटवरून फिरायचा. त्याच्या टीमची बाकीची पोरं सिगरेट फुकायची पण ह्याला कधी सिगरेट ओढताना, मावा खाताना बघितला नव्हता. आम्हा दोघांचीही गावं सातार्‍याजवळची असल्यामुळे असेल कदाचित - माझ्याशी जरा जास्त आपुलकीनं बोलायचा. गावाकडच्या गोष्टी सांगायचा. करीअरबद्दल सल्ला मागायचा. कंपनी सोडल्यानंतरही त्याने लग्नाला आवर्जून बोलावलं होतं. पण तेव्हा जमलं नव्हतं.

"अर्रे पर्‍या... किती वर्षांनी भेटतो आहेस. जाड झालास की रे! लग्न मानवलंय. दाढीचा कट वगैरे जोरदार आहे. कसा आहेस?"

"मी मजेत आहे सर. इथे एका कार्यक्रमासाठी आलो होतो."

"अरे व्वा! इथेच आहेस ना? आलोच गाडी पार्क करून."

त्या गर्दीत पार्किंग सापडायला थोडा वेळ लागला. दहा एक मिनिटांनी पुन्हा तिथे गेलो तर आता पर्‍याशेठचा झब्बा बदलून वर जरीचा अंगरखा आला होता. मला बघितल्यावर पर्‍या किंचितसा ओशाळित होऊन हसला. बायकोकडे बघून नमस्कार करून म्हणाला "नमस्कार वहिनी."

"क्या बात है! नाटकात काम करतो आहेस?"

"शिवजयंतीसाठी जाणता राजा चा एक प्रवेश करतोय आम्ही. माझी फक्त शेवटी एंट्री आहे."

"अरे ग्रेट! आता तुझा प्रवेश बघूनच जातो."

आम्ही सुद्धा तिथल्या त्या गर्दीत सामील झालो. मागे चालू असलेल्या जाणता राजाच्या ऑडिओ वर शाहीर महाराजांची थोरवी गायचा अभिनय करत होता.

"ऐका ऐका पाटील, पाटलिणींनो - ऐका ऐका मराठमुलुखीच्या गावकर्‍यांनो, आया-बहिणींनो! ऐका हा काशीचा ब्राह्मण काय सांगतोय! पुरणाच्या पोळीहून गोड गोड सांगतोय तो! म्हणतोय शिवाजीराजाला राज्याभिषेक झालाच पाहिजे!"

"गड बहु चखोट. दीड गाव उंच. तासिल्याप्रमाणे असलेल्या कड्यांवर पर्जन्यका़ळी गवताचे पातेही उगवत नाही. अठरा कारखाने, बारा महाल - हिराजी इंदुलकराने रायगडास सजवायास सुरुवात केली."

"प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानन्दोSनुज्ञया,
श्रीमच्छत्रपते: शिवस्य नृपते: सिंहासने तिष्ठत:||"

"शाहिरांची प्रतिभा, पंडितांचे शास्त्र, महाराजांचे ध्येय, आईसाहेबांच्या अपेक्षा, संतांचे आशीर्वाद, मृत वीरांच्या अतृप्त इच्छा आणि स्वतंत्र महाराष्ट्राचे आनंदाश्रू त्या दिवशी साकार व्हावयाचे होते."

"श्रीमन्मंगलमूर्ती मोरेश्वरा ऋद्धिसिद्धीच्या नायका, विघ्नहरा सर्वप्रथम आपण या." पाठोपाठ जेजुरीच्या खंडेरायाला, वेरुळीच्या घृष्णेश्वराला, पंढरीच्या विठुरायाला, आई भवानीला, जगन्माता अंबाबाईला, माहुरीच्या रेणुकामातेला आणि वणीच्या सप्तशृंगी मातेला आवतान दिलं गेलं.

प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच ताणली गेलेली. नगार्‍याचा गजर झाला. तुतारीच्या नादात आता महाराजांच्या वेशात आमचा पर्‍या एंट्री घेणार होता. ढोल ताश्यांच्या गजरात शब्द कानी येत होते -

"दावा द्रुमदंड पर, चीता मृगझुंड पर
भूषन वितुंड पर, जैसे मृगराज है|
तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर
त्यों मलिच्छ बंस पर, सेर सिवराज है|"

तितक्यात मागे गलका झाला "एक मिनिट - सरका सरका"! अच्छा, म्हणजे पर्‍याची एंट्री प्रेक्षकांतूनच आहे होय! मी पर्‍याला वाट द्यायला बाजूला सरकलो आणि सरकताना मागे वळून पाहिलं मात्र - तो पर्‍या नव्हताच! डोक्याच्या जिरेटोपाला मोत्याचा तुरा, दोन्ही हातात कडी. बोटांत अंगठ्या. छातीवर मोत्यांच्या माळा, कानांत भिकबाळी पायांत मोजड्या, खांद्यावर धनुष्य, कमरेला भवानी - साक्षात छत्रपती माझ्या समोरून जात होते. सोबत महाराणी सोयराबाई होत्या, युवराज संभाजीराजे होते, अनाजीपंत, दत्तोपंत होते, सरसेनापती हंबीरराव मोहिते होते, नोतोजी पालकर होते, जेधे होते, बांदल होते! अहो तिथे नसूनही तिथे असलेले सुभेदार मालुसरे, बाजी पासलकर, मुरार बाजी देशपांडे, सूर्याजी काकडे, बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजरही होते.

आमच्या समोरून रुबाबदार पदन्यास करत "महाराज" जनतेचे मुजरे स्वीकारत सिंहासनाधिष्ठित होण्यासाठी जात होते. वेदमंत्रांच्या घोषात आणि जयजयकारात महाराजांचा राज्याभिषेक झाला. नाटकं संपलं. म्हटलं जायच्या आधी पर्‍याला भेटून जायलाच हवं. म्हणून त्या गर्दीतून वाट काढत बॅकस्टेजला गेलो. पण तिथे अजूनही पर्‍या नव्हताच. एका खुर्चीवर एक पाय लांब सोडून आणि एक हात गुडघ्यावर ठेऊन अजूनही "महाराजच" बसले होते. लोकं येऊन जात होती, काही नमस्कार करत होती, काही फोटे काढत होती. मी समोरच उभा होतो. त्यांच्या डोळ्यांत आपुलकी होती पण ओळख नव्हती. आणि "महाराजांना" "फार छान काम झालं" म्हणण्याची किंवा त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्याची माझी हिंमत नव्हती.

"सर सॉरी हा - मघाशी कार्यक्रमानंतर भेटायला जमलं नाही." तासाभराने पर्‍याचा फोन आला.

"अरे मी भेटून गेलो की तुला."

"अ‍ॅक्चुली ना सर, तो जिरेटोप डोक्यावर असला ना की दुसरं काही सुचतंच नाही बघा. फार मोठी जबाबदारी वाटते. जिरेटोप डोक्यावर असताना, हातात भवानी असताना, कपाळाला टिळा असताना - खोटं बोलता येत नाही, टवाळ्या करत टाळ्या देऊन हसता येत नाही, आया बहिणींशी बोलताना त्यांच्या पावलांच्या वर नजर जात नाही, कोणी वेडं-वाकडं वागलेलं - रस्त्यावर थुंकलेलं चालत नाही - अहो सर - त्या वेषात बाटलीनं बिसलेरीचं पाणी पीता येत नाही."

प्रवेश संपल्यावर पर्‍यानी ओळख न दिल्याचं कारण कळालं.

सरकारनं हेल्मेट ऐवजी प्रत्येकाला जिरेटोप घालणं कम्पल्सरी करावं काय?

© - जे.पी.मॉर्गन

फाल्गुन कृष्ण तृतीया शके १९४४

शिवजयंती

  • Log in or register to post comments
  • 3748 views
💬 प्रतिसाद
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा