मुंबईत फ्लेमिंगो पक्षी बघणे.

फ्लेमिंगो पक्षी बघणे.

फ्लेमिंगो पक्ष्यांनी मुंबईत येण्याची सुरुवात होऊन आता पंचवीस वर्षे तरी झाली असतील. अधुनमधून दरवर्षी ते पाहायला जात असतो. या आठवड्यात गेलो होतो त्याची थोडक्यात माहिती देत आहे. ते पक्षी डिसेंबरच्या सुरुवातीला कच्छ (गुजरात) आणि इतर ठिकाणांहून येऊ लागतात आणि मे महिन्यात परत जातात. मुंबईत ते ठाणे खाडीच्या कांदळवन किनाऱ्यावर येतात. दिवसा पाण्यातले शेवाळ खातात आणि रात्री जवळपासच्या चेंबूर,देवनार,तुर्भे इत्यादी ठिकाणी असलेल्या उंच कांदळवनांचा आश्रय घेतात.

आहे त्या परिस्थितीत आपली जागा आणि खाणं शोधून थव्याने राहणारा सुंदर पक्षी म्हणजे फ्लेमिंगो/रोहित पक्षी असं वर्णन करता येईल.

त्यांना पाहण्यासाठी
१)शिवडी,
२)ऐरोली नवी मुंबई/ठाणे खाडी
३)भांडूप पंपिंग स्टेशन
या तीन विशेष जागा आहेत.

जावे कसे

शिवडी हे मुंबई हार्बर लाईन रेल्वेवरील एक स्टेशन आहे. इथे रेल्वे क्रॉसिंग फाटकही आहे. शिवडी पूर्व भागात आल्यावर कोळीवाडा रस्त्याने दहा मिनीटे चालत गेल्यावर ( इतके जवळ आहे) एक दर्गा प्रवेश कमान लागते. इथे उजवीकडे वळून पाच मिनिटांत आपण जेट्टीवर येतो. २०१८मध्ये इथे आलो होतो पक्षी बघायला तेव्हाच कळले की इथूनच 'कोस्टल रोड' समुद्रातून रेवस/मांडवाकडे जाणार आहे आणि तुम्हाला चार पाच वर्षे येता येणार नाही. तसेच झाले. मोठा पूल बांधत आहेत आणि जेट्टीवर जाऊन देत नाहीत. तर ही जागा आता बंद झाली.

अगोदरच्या वळणावरच्या दर्ग्याच्या कमानीच्या पायऱ्या चढून वर गेल्यावर शिवडी किल्लेदाराचा वाडा दिसेल.यालाच चिकटून डावीकडे दर्गा आहे आणि त्यालाच चिकटून डावीकडे शिवडी किल्ला आहे. तशी शिवडी किल्ल्यात जाण्यासाठी एक स्वतंत्र दगडी पायऱ्यांची वाटही आहेच. (३-४-५ मार्च २०२३ला दर्ग्यात उरुस उत्सव आहे. तेव्हा जाऊ नका.) हा किल्ला कुणी कशाला बांधला वगैरे नेटवर भरपूर माहिती आहेच ती इथे देत नाही.
फोटो १

शिवडी स्टेशन ते किल्ला, जेटी फेरी रूट नकाशा


विडिओ १
शिवडीचा किल्ला.Sewri Fort.
Sewri, Mumbai.
Recorded on 2023_02_27
https://youtu.be/SpSSu8t-ux8

_____________________
विडिओ २
शिवडी किल्लेदाराचा वाडा.
House of chief of Sewri fort
https://youtu.be/X7HKVCLf58M

विडिओ पाहिल्यावर कोठार कोणते याची कल्पना येईलच. किल्लेदारासाठीचा वाडा आता बराचसा पडलेला दिसतो आहे. पण पाच वर्षांपूर्वी उजव्या कोपऱ्यातला प्रशस्त लाकडी जिना, वरच्या मजल्यावरच्या खोल्या,छप्पर हे सुस्थितीत होते आणि मी वरती जाऊनही आलो होतो. विटा ,चुना आणि लाकूड वापरले आहे. लाकूड कुजल्यामुळे वाडा पडला. किल्ला मात्र चूना, वाळू आणि दगडी बांधकामाचा असल्याने भक्कम आहे. तर फ्लेमिंगोसाठी जाताना हा किल्ला अनायसे पाहून होतो.
शिवडीची फ्लेमिंगोसाठीची जागा निरीक्षणाखाली उत्तम, आणि विनाशुल्क होती ती आता तरी बाद झाली.

क्रमांक (२) आणि (३) या जागा एकाच खाडीचे दोन किनारे आहेत. तिथे पोहोचून बोट घ्यावी लागते. खर्चिक आहेच. पण आपल्याकडे चांगल्या दुर्बिणी, झूम कॅम्रे हवेत. बोट (लॉन्च) आवाज करत जाते आणि पक्षी उडून दूर जाऊन बसतात. या ठिकाणाचे बरेच चांगले विडिओ यूट्यूबवर पाहून समाधान मानू शकतो.

मी ऐरोली किनाऱ्यावरच्या सरकारी केंद्रावर जाऊन आलो.
नवी मुंबईतील राहणाऱ्यांनी कोणत्याही वाहनाने ऐरोली सेक्टर १० बस स्टॉप (ऐरोली - मुलुंड लिंक पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे) येथे यावे. तिथून फक्त पाचशे मिटरांवर हे केंद्र आहे.
मुंबई मध्यरेल्वे लाईनवरच्या नाहूर स्टेशनवरून बसेस आहेत. त्या ऐरोली सेक्टर १० ला जातात. वाटेत अगोदरच्या भांडूप पंपिंग स्टेशनवरूनही किनाऱ्यावर जाण्याचा पर्याय आहेच.

काही बसेस पश्चिम उपनगरांतून ऐरोलीला जातात त्याने थेट ऐरोली सेक्टर १० गाठता येते.

Nahur to Airoli sector 10

1) Nahur station WEST TO Airoli sector 10
बस नं
522, 523, 512,
नाहूर पश्चिमेला थोडे चालावे लागते. तिथे स्टॉप आहे पण तीन बसेस मिळतात.
___________________

2) Nahur station EAST TO Airoli sector 10

545
नाहूर पूर्वेच्या स्टॉप अगदी स्टेशनला चिकटून आहे पण इथून फक्त एकच बस जाते.
दोन्हीकडून फक्त पंधरा मिनिटे लागतात आणि बस तिकिट फक्त पाच रु आहे.

बस मार्ग आहेतच पण स्वतःचे वाहन,ओटो, टॅक्सीचे पर्यायही गोरेगाव,अंधेरी,मुलुंड,नाहूर इथून घेता येईल.
_________________

फोटो २

नाहूर स्टेशन ते ऐरोली सेक्टर १० लिंक रोडचा बस स्टॉप बस मार्ग नकाशा

फोटो ३

ऐरोली सेक्टर १० बस स्टॉप ते 'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य' सेंटर' एन्ट्री गेट (चालत पाचशे मिटर) नकाशा

फोटो ४

'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य' सेंटर, ऐरोली, दरपत्रक १

फोटो ५

'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य' सेंटर, ऐरोली, दरपत्रक २

फोटो ६

म्युझियम .. आतमध्ये दोन आहेत.

फोटो ७

पाट्या

_________

जावे केव्हा

पाणपक्षी हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. समुद्र अथवा खाडीत भरती ओहोटी असेल त्याप्रमाणे किनारा पाण्याने भरतो अथवा रिकामा दिवसातून दोनदा होतो. फ्लेमिंगो किंवा इतर काही पक्षी हे ओहोटी लागल्यावर किनार्याला जे उथळ पाणी राहते त्यातून अन्न मिळवतात. त्यांच्या पायांच्या उंचीप्रमाणे खोल पाण्यात जातात . जेव्हा भरती संपून ओहोटी सुरू होते म्हणजे पाणी मागे गेल्याने किनारा उघडा पडू लागतो तेव्हा लगेच त्यातले जीव चिखल,वाळूत आसरा शोधायची घाई करतात तेव्हा त्यांना पकडता येते. फ्लेमिंगो पक्षी मात्र इतरांच्या अन्नात फारसे भागीदार नसतात.ते पाण्यातले शेवाळ गाळून खातात. तरीही ते ओहोटीच्या मागे जाणाऱ्या पाण्याबरोबर मागे सरकत राहतात. या भरती ओहोटीची वेळ जाणून घेण्यासाठी साधा ढोबळ नियम म्हणजे भरतीच्या वेळेनंतर दोन तासांनी पक्षी बघायला जावे. चंद्राची रोजची तिथी हे दाखवते. प्रथमा/प्रतिपदेला दुपारी एकानंतर, द्वितियेला दुपारी दोन नंतर, तृतियेला दुपारी तीन नंतर, चतुर्थीला दुपारी चार नंतर, पंचमीला दुपारी पाचनंतर, षष्ठीला सकाळी सहानंतर, सप्तमीला सकाळी सातनंतर, अष्टमीला सकाळी आठ नंतर, नवमीला सकाळी नऊ नंतर, दशमीला सकाळी दहानंतर . एकादशीला दुपारी अकरा नंतर, द्वादशीला सकाळी बारानंतर, त्रयोदशीला दुपारी दोन नंतर, चतुर्दशीला दुपारी तीन नंतर. . पौर्णिमेला/(किंवा अमावस्येला ) दुपारी चार नंतर योग्य.
****

बोटीने जाऊ इच्छिणाऱ्या आणि तिथे जाऊन तिकिटे काढणाऱ्यांसाठी -
भरती सुरू होण्याच्या वेळा .या वेळी पाणी आत येऊ लागते आणि पक्षी उडून दूर जाऊन बसू लागतात. चंद्राच्या तिथीप्रमाणे पाहावे
(भरती पुढच्या दिवशी पन्नास मिनिटे उशिरा येत असते. पुढचा ढोबळ हिशोब आहे. )
बोटीने जाऊ इच्छिणाऱ्या दर्शकांनी ओनलाइन बुकिंग केले असेल तर त्यांना तारीख,वेळ मिळालेली असतेच. पण तिथे जाऊन तिकिटे काढणाऱ्यांना या वेळेचा उपयोग होईल. खाडीत पाणी भरून जेटीला बांधलेल्या बोटी तरंगू लागतात आणि निघतात.

प्रथमा - सकाळी दहा नंतर
द्वितीया - सकाळी दहा नंतर
तृतीया- सकाळी अकरा.
चतुर्थी - दुपारी बारा नंतर.
पंचमी - दुपारी एक नंतर.
षष्ठी - - दुपारी दोन नंतर.
सप्तमी - दुपारी तीन नंतर.
अष्टमी - दुपारी चार नंतर.
नवमी - संध्याकाळी पाच नंतर.
दशमी - सकाळी सहा नंतर
एकादशी - सकाळी सात नंतर
द्वादशी - सकाळी आठ नंतर
त्रयोदशी - सकाळी नऊ नंतर.
चतुर्दशी - सकाळी दहा नंतर
पौर्णिमा किंवा अमावस्या - दहा नंतर.
_______________
इतर माहिती लिंकस

ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य- कांदळवन कक्ष, महाराष्ट्र शासन
https://mangroves.maharashtra.gov.in/Site/1094/Thane-Creek-Flamingo-San…

Thane Creek Flamingo Sanctuary
https://flamingosanctuary.com/

_____________________

काल (2023_03_12) ऐरोली इथल्या केंद्रावर रविवारी एक फेरी मारली तेव्हा मोबाईलवर काही फोटो घेता आले. बोटफेरीच्या धक्क्याजवळच फ्लेमिंगो दिसले . भरती ओहोटीच्या नियमाप्रमाणे ओहोटीचे पाणी ओसरले की पक्षी गर्दी करतात. धक्क्याजवळूनच पक्षी पाहता येतात. पण . . .या वेळी बोटी चिखलात असतात आणि पुढे जाऊ शकत नाहीत. ओहोटीचे पाणी आत जाते त्या रेषेपर्यंत वाट/धक्का बांधलेला नाही. काही लोक येत होते परंतू बोट जाणार नाही म्हटल्यावर नाराजीने परत जात होते. विशेषतः लहान मुलांना बोटीमध्ये बसण्याचीच हौस होती, जवळून पक्षी पाहण्याची नव्हती. बोटीचे नावाडी सांगत होते की इथूनच दिसतात हेच पाहा ना. बोटीने गेल्यावर पक्षी दूर कुठे किनाऱ्यावर दिसतात त्यापेक्षा हेच बरे आहे. पण ऐकतो कोण.

बोटीमध्ये सीट {ओनलाइन/ ओफलाईन} बुक करणे व त्यांचे दर पाहिल्यावर ते खर्चिक आहे हे दिसेल. पण ओहोटीची योग्य वेळ धरून धक्क्यावर गेल्यास पक्षी पाहता येतात. त्या एन्ट्रीचे तिकीट फक्त ५०/- रु आहे. बाकी तिथली व्यवस्था,पार्कींग,सुरक्षा,स्वच्छता ,विस्तृत जागा,कर्मचारी इत्यादी पाहिल्यावर तिकीट वसूल आहे.

बोटी एकूण पाच दिसत होत्या. लाईफ जाकेट्स सीटांना बांधली होती. २४ सीटर आणि ८ सीटर अशा दोन प्रकारच्या बोटी असून त्यास दोन प्रापेलर एंजिने आहेत.

फोटो 2023_03_12_(1)
एका रांगेत

फोटो 2023_03_12_(2)
लहान थवा

फोटो 2023_03_12_(3)
हा चिखलातून खाणं शोधणारा एक पक्षी ( पाण टिळवा, black-tailed godwit) त्याची लांब चोच खुपसून जीव शोधत होता

फोटो 2023_03_12_(4)
Board walk. खारफुटी वनातून जाण्यासाठी

इथे दिसणारे छोटे गुलाबी फ्लेमिंगो (lesser flemingos) आहेत. मोठे उंच पक्षी(greater flemingos) नव्हते.
___________________

सूचना आणि दुरुस्तीचे स्वागत. आपले अनुभवही मांडा.