हिमाचल प्रदेश :कांगडा व चंबा : भाग ९: खज्जियार आणि चंबा

भाग ८ येथे वाचा

खाज्जियार हे चंबा खोऱ्यातील ६५०० फूट उंचीवरील एक हिल स्टेशन .
स्वित्झर्लंडशी उष्णकटिबंधीय साम्य असलेले हे ठिकाण म्हणजे सुमारे ५ किमीचा परीघ असलेले एका मोठ्या खोलगट बशीच्या आकाराचे हिरवेगार कुरण आणि मध्यभागात एक सुंदर तळे. कुरणात चरणारे प्राणी, कुराणाच्या पलीकडील बाजूस दिसणारे पर्वत व त्यावरील देवदार वृक्षांचे दाट जंगल याचे नेत्रसुखद दर्शन. कुरणाच्या एका कोपऱ्यात (रस्त्याच्या बाजूने) १२ व्या शतकातील खाज्जिनाथ मंदिर हे येथील आणखी एक आकर्षण. १९९२ मध्ये स्विस दूत यांनी खज्जियारला भेट दिली तेव्हा ते खूप प्रभावित झाले व या ठिकाणाची भारतातील 'मिनी स्वित्झलँड' म्हणून त्यांनी घोषणा केली.

काळ संध्यकाळीच खज्जियारला पोहचलो होतो. हॉटेल लगतच हे मिनी स्वित्झर्लंड म्हटले जाणारे सुंदर ठिकाण आहे. त्यामुळे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या कुरणात येऊन यथेच्छ फेरफटका मारला. दिवसाच्या वेगवेळ्या वेळात निसर्गाचे बदलणारे रूप पहिले.

आज सकाळी उठून फेरफटका मारून रम्य सकाळ अनुभवली.

चम्बाच्या मंदिरांविषयी ऐकले होते. त्यांच्या वेगळेपणामुळे आज ही मंदिरे बघायची ठरवले . खज्जियारपासून साधारण २०-२२ किमी व वेळ एक तास लागणार होता.
चलो चम्बा

वळणा वळणाच्या रस्त्याने गाडी घाट उतरू लागली. हा रस्ताही निसर्गसौंदर्याने परिपूर्ण आहे. थोड्याच वेळात चम्बाच्या 'चोगान' ला येऊन पोहचलो. (चोगान':एक मैदान जेथे सभा, मेळे आयोजित केले जातात) याच्या आसपासच आम्हाला बघायची ती मंदिरे होती.
याच मैदानात दोन दिवसानंतर मोदीजींची सभा होणार होती त्यामुळे रस्ते, मैदान सगळीकडे पोलिसांचा खूप बंदोबस्त होता.
'चोगान'

दहाव्या शतकात राजा साहिल वर्मन याने मुलगी चम्पावतीच्या म्हणण्यानुसार आपली राजधानी भारमौरहून येथे आणली व राजधानीचे नामकरण मुलीच्या नावावरून चंबा असे केले.

चम्बाची पाषाण व लाकडी छत असलेली मंदिरे
चम्बाची बहुतेक मंदिरे दगडी बांधकाम असलेली नगारा शैलीत (किंवा शिखर शैलीत)आहेत. या शैलीतील मंदिरांचे दोन प्रकार दिसून येतात. टेकडी व मैदानी प्रकारातील मंदिरे. टेकडी प्रकारात मंदिरे आतून कोरीवकाम किंवा चित्रकला केलेली तर मैदानी प्रकारात बाह्य भागावर कोरीव काम केलेली दिसून येतात. चम्बाच्या मंदिरांमध्ये बाह्य भागावर विपुल प्रमाणात कोरीव काम आहे. मंदिराच्या भिंतींचे पाऊस किंवा हिमवृष्टीपासून रक्षण व्हावे या दृष्टीने शैलीत थोडा बदल केला गेला असावा. मंदिराच्या शिखराजवळ बाहेरील बाजूने गोलाकार लाकडी छत दिलेले दिसते. देवदार वृक्षांच्या मजबूत लाकडामुळे ही छते हजार वर्षांनंतरही आज चांगल्या स्थितीत टिकून आहेत.

लक्ष्मी नारायण मंदिर (चंबा येथील मुख्य मंदिर)
राजा साहिल वर्मन याने १० व्या शतकात या मंदिर संकुलाचे निर्माण केले. शिखर शैलीतील सहा मंदिरांचा हा समूह. मंदिरे शंकर, विष्णू व कृष्णाला समर्पित आहेत. मुख्य मंदिरातील विष्णूची मूर्ती हि विंध्य पर्वतातून आणलेल्या संगमरवरी दगडातून तयार केली गेली आहे. असे म्हणतात की राजाची दहा पैकी नऊ मुले मूर्तीसाठी दगडाच्या शोधात मध्य भारतात आली होती जी त्यांच्यावरील हल्ल्यात मरण पावली. मूर्ती घडवण्याबद्दल राजाची अपार श्रद्धा होती व त्यामुळेच त्याने दहाव्या मुलालाही शिळा आणण्यास पाठविले. त्याने आणलेल्या संगमरवरी शिळेतून नारायणाची सुंदर मूर्ती साकारल्या गेली.

मंदिर संकुल प्रांगणाच्या प्रवेश द्वारासमोर गरुड स्तंभ असून त्यावर पितळेची गरुड मूर्ती आहे.

प्रवेश केल्यावर नंदी मंडप असून पुढे मुख्य लक्ष्मी नारायण मंदिर आहे. प्रवेश द्वारावर गंगा यमुना आहेत. वर सांगितल्याप्रमाणे सर्व मंदिरांना शिखराजवळ लाकडी छत असून बाह्य भागावर सुंदर मूर्तिकाम व नक्षीकाम दिसते.

संकुलातील मंदिरे :
१. लक्ष्मी-नारायण (मुख्य मंदिर)
२. राधा कृष्ण
३. चंद्रगुप्त
४. गौरी शंकर
५. त्रंबकेश्वर
६. लक्ष्मी दामोदर

लाकडी छत

हरी राय मंदिर
चम्बाचे मैदान 'चौगान' च्या अगदी बाजूस हे मंदिर आहे. मूर्ती ९-१०व्या शतकातील असून मंदिर ११व् व्या शतकातील आहे. विष्णूची वैकुंठ स्वरूपातील दागिन्यांनी नटलेली सुंदर मूर्ती आहे.

चंपावती मंदिर
अकराव्या शतकात राजा साहिल वर्मन याने आपल्या मुलीच्या नावे हे मंदिर बांधले. हे मंदिरही चोगान च्या जवळच (पोलीस स्टेशनच्या मागे) आहे. यामागची कथा अशी सांगितली जाते की चंपावती नेहमी एका ऋषींना भेटण्यासाठी जात असे. राजाने संशय घेऊन ऋषींच्या खोलीत प्रवेश केला. खोलीत कोणीही नव्हते. राजाला प्रायश्चित्त म्हणून उभ्या असलेल्या जागीच मंदिर बांधण्याबद्दल आकाशवाणी झाली.

येथे अजूनही काही चांगली ठिकाणे आहेत जसे चामुंडा मंदिर, सुई माता मंदिर ,अखंड चंडी पॅलेस,रंगमहाल, म्युझिअम इ. पण आवरते घेतले. अशीही दोन दिवसांनी मोदीजींची सभा असल्याने गर्दी खूप होती आणि खाज्जियार पासून बरेच खाली आल्याने वातावरणातही थोडा उष्मा होता . एक वेगळ्या प्रकारची मंदिरे पाहायची होती ती बघून झाली असल्याने खज्जियारसाठी परत निघालो.
(ज्यांना इतिहास, प्राचीन मंदिरे वगैरेची आवड आहे त्यांनीच इकडे फिरकावे बाकीच्यांनी खज्जियारला थांबून हिल स्टेशनची मजा अनुभवावी. दोन्ही ठिकाणांच्या उंचीत साधारण १८०० फुटांचा फरक असल्याने येथील वातावरण व शहरातील गर्दी यामुळे फिरणे थोडेसे कंटाळवाणे होऊ शकते म्हणून एक फुकटचा सल्ला)

दुपारी अडीचच्या सुमारास परत खज्जियारच्या जवळ पोहचलो. वाटेत एक उंच शंकराची मूर्ती दिसली. येथेच जगदंबा मातेचे मंदिर होते. दर्शन घेऊन परत हॉटेलवर आलो.

खोलीतून दिसणारा नजारा

माकडांपासून खुप सांभाळावे लागते.

तळ्याकाठी फिरायची हौस अजून पूर्ण झाली नव्हती पण बाहेर पाऊस पडायला सुरुवात झाली होती. त्यामुळे थोडे थांबून बाहेर पडलो. भरपूर फोटो काढले व येथील फोटोग्राफरकडूनही काढून घेतले.

हॉटेलच्याच कडेने रस्त्यापलीकडे 'खज्जीनाग मंदिर ' आहे. मंदिर १२ व्या शतकातील असून नागांचा राजा खाज्जिनाग ह्याची मूर्ती आहे.मंदिराला उतरते स्लेट दगडाचे छत असून इतर काम खांब वगैरे लाकडी आहे.

१६ व्या शतकात राजा बालभद्र वर्मन यांच्या काळात लाकडापासून बनविलेल्या पांडवांच्या पाच पूर्णाकृती मूर्ती येथे आहेत.

हिडिंबा व शिवाचेही छोटेसे देऊळ आहे.

उद्या सकाळी अमृतसरकरिता निघायचे असल्याने आवराआवर करून लवकरच झोपी गेलो. सकाळी सातलाच बिल भरून गाडीवर सामान लादले. हॉटेलमधील अनुभव खूपच चांगला होता. खज्जियारला मुक्काम करावयाचा असेल तर हॉटेल 'देवदार' सारखे चांगले ठिकाण शोधूनही सापडणार नाही. गाडी परत डलहौसीमार्गे धावू लागली. डलहौसीच्या बिजीज पार्कजवळचा सुंदर रस्ता परत एकदा अनुभवला.

साडे आठ नऊच्या दरम्यान एका ढाब्यावर नाश्त्याकरिता थांबलो. वनविभागाच्या एका निवृत्त कर्मचाऱ्याचा हिमाचल प्रदेश,, जम्मू -काश्मीर व पंजाबच्या सीमेवरच्या निसर्ग सुंदर जागेवर असलेला हा ढाबा.

काही मिनिटातच आम्ही हिमाचल प्रदेशची हद्द ओलांडून पंजाबच्या सीमेत प्रवेश केला.
ही लेख मालिका हिमाचल प्रदेशच्या कांगडा व चंबा पुरतीच मर्यादित ठेवण्याचा विचार असल्याने इथेच संपवीत आहे.
यानंतर अमृतसर येथेही काहींनी एक तर काहींनी दोन रात्र मुक्काम करून अटारी-वाघा बॉर्डर, सुवर्ण मंदिर, जालियनवाला बाग , श्री दुर्ग्याना तीर्थ इ. ठिकाणांना भेट दिली.

आधीच्या काही भागातील प्रतिक्रियेत सहलीचा कार्यक्रम व खर्चाबाबत काहींनी चौकशी केली होती त्याबद्दल माहिती खाली देत आहे
सहलीची रूपरेषा

सहल खर्चात समाविष्ट गोष्टी:
* मुंबईपासून पठाणकोट व अमृतसर ते मुंबई रेल्वेचा ससंपूर्ण रेल्वे प्रवास वातानुकूलित.
* पठाणकोटला उतरल्यापासून ते परतीच्या ठिकाणापर्यंत भटकंतीसाठी सर्व दिवस खाजगी वाहन
* पूर्ण जेवणखर्च
* सर्व ठिकाणांची प्रवेश फी , गाईड खर्च, टीप

अंदाज येण्यासाठी प्रवासासहित संपूर्ण १२ दिवसांचा प्रत्येकी खर्च

सहलीतील एक सदस्य श्री विजय गोरेगावकर यांनी सहलीचा थोडक्यात घेतलेला आढावा

जमलं तर भेटू पुन्हा एकदा अशाच एखाद्या लहान-मोठ्या सहलीच्या निमित्ताने. धन्यवाद.

समाप्त