शिकागो मिपा कट्टा वृत्तांत

अखेर तो दिवस आलाच ज्याची आम्हाला अनेक वर्षांपासून प्रतीक्षा होती. अमेरिकेच्या मिडवेस्ट भागात मिपाचा कट्टा आयोजित होणे व त्यात आम्हाला सामील होण्याची संधी मिळणे. विजुभाऊंच्या अमेरिका दौर्‍यामुळे हा योग जुळून आला अन १ ऑक्टोबर रोजी शिकागोमध्ये कट्टा आयोजित करण्याचे ठरले. शिकागोमधे दीर्घकाळापासून राहणार्‍या मिपाकर इंन्दुसुता यांनी याकामी पुढाकार घेतला.

उत्सवमूर्ती श्री व सौ विजुभाऊ मिशिगन राज्यातल्या डेट्रॉइटहून कट्ट्यासाठी शिकागोला आले. आयोवा राज्यातील डेमॉइन येथून मिपाकर अनुजा व त्यांचे पती आले. शिकागोत काही महिन्यांपूर्वीच आलेले मिपाकर पुंबा कट्ट्याला आले. मिनेसोटातून मी व मिपाकर जुइ आमच्या कन्येबरोबर आलो. अन हा कट्टा ज्यांच्यामुळे चविष्ट बनला त्या इन्दुसुता यांच्या उपस्थितीने कट्ट्याला बहार आली.

शनिवार १ ऑक्टोबर रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी ११ वाजता मिलेनियम पार्कमधील शिकागो बीनजवळ कट्टा ठरला होता. आम्ही व इन्दुसुता तेथे १०:३० ला पोचलो तर श्री व सौ विजुभाऊ अन अनुजा व त्यांचे पती आधीच पोचलेले होते.

मिलेनियम पार्कमधे पोचताच शिकागो बीनचे प्रथम दर्शन झाले.

पायर्‍या चढून वर पोचल्यावरचे फोटोज

बीनपाशी मिपाकरांना शोधत असताना विजुभाऊंचा मला फोन आला व पाठीमागे वळण्यास सांगितले. वळल्यावर प्रथम पोचलेले मिपाकर दृष्टीस पडले.


फोटोत डावीकडून श्री व सौ विजुभाऊ अन अनुजा व त्यांचे पती.

एकमेकांची ओळख करून घेणे व एकमेकांच्या ठिकाणांना पूर्वी दिलेल्या भेटींबाबत चर्चा करणे सुरू झाले. शनिवार असल्यामुळे शिकागो बीनजवळ पर्यटकांची खूपच वर्दळ होती. पुंबा हे घरून खूप सकाळी निघाले असले तरी काही मेट्रा ट्रेन्सच्या फेर्‍या रद्द झाल्यामुळे त्यांना पोचायला ११:१५ झाले. बीनजवळ बरेच वेळ थांबल्यामुळे इतर कट्टेकर्‍यांनी शेजारच्या द क्राऊन फाउंटनकडे प्रस्थान केले व पुंबा यांना फोनवर तसे कळवले.

पुंबा यांचे आगमन झाल्यावर इन्दुसुता यांनी मिपाच्या प्रथेप्रमाणे कट्ट्याची अधिकृत सुरूवात करण्यासाठी स्वतः बनवलेली बदाम बर्फी सर्वांना खाऊ घातली.

बर्फी अत्यंत चविष्ट असल्याने कट्टेकर्‍यांनी तिचा पुरेपूर आस्वाद घेतला.

नंतर मिसळपाव.कॉम छापलेले कागद घेऊन कट्टेकर्‍यांनी फोटो काढला.

डावीकडून विजुभाऊ, पुंबा, श्रीरंग_जोशी, जुइ व अनुजा

इन्दुसुता यांनी .कॉम हातात धरले होते परंतु त्यांना स्वतःचा फोटो जाहीररीत्या प्रकाशित होऊ द्यायचा नाहीये.

या फाऊंटनमधे दोन बाजूंना दोन मोठाले स्तंभ आहेत. त्यावर एका बाजुने माणसांचे चेहरे दाखवले जातात अन त्यांच्या मु़खातून अधुनमधून पाण्याची धार बाहेर पडते. मधल्या मोकळ्या जागेत अंदाजे तीन-चार इंच खोल पाण्यातून फेरफटका मारता येतो.

या भेटींदरम्यान विजुभाऊंनी त्यांचे दोसतार हे पुरस्कार विजेते पुस्तक भेट दिले. आम्ही त्यावर त्यांची स्वाक्षरीही घेतली.

यानंतर इन्दुसुता यांनी सर्व कट्टेकर्‍यांना मिलेनियम पार्कची गायडेड टूर घडवली.
सर्वप्रथम Jay Pritzker Pavilion

फेरफटक्यादरम्यानचा एक फोटो

नंतर मिलेनियम मॉन्युमेंट

नंतर मिलेनियम पार्कमधील उद्यान

यानंतर सर्वांनी दुपारचे जेवण कुठे घ्यायचे यावर चर्चा केली अन सर्वानुमते उपलब्ध पर्यायांपैकी रोटी मेडिटरेनियन ग्रील या उपहारगृहाची निवड करण्यात आली.

यानंतर इन्दुसुता यांनी घरी प्रयाण केले. तसेच गाडीने ५-६ तासांचा परतीचा प्रवास करायचा असल्याने अनुजा व त्यांच्या पतीनेही कट्टेकर्‍यांचा निरोप घेतला.

नंतर जवळच असलेले बकिंगहम फाउंटन पाहण्यासाठी इतर कट्टेकर्‍यांनी सिटी बसने प्रयाण केले. भव्यता, स्थापत्यसौंदर्य याबाबतीत हे फाउंटन खूपच खास आहे. त्याभोवती फेरी मारायला आम्हाला १५ मिनिटे लागली असावी. त्यानंतर इन्दुसुता यांचे घरी जाण्यासाठी आम्ही सर्व प्रत्यम पायी व नंतर सिटीबसने शिकागो युनियन स्टेशनला गेलो.

एवढ्या गजबजलेल्या परिसरातही काही ठिकाणी मोकळी जागा व तेथील सौदर्यीकरण पाहून आम्हाला कौतुक वाटले.

युनियन स्टेशनचे स्थापत्य बाहेरुन भव्य आहे अन आतून कलात्मक आहे.

पुढच्या ट्रेनला अवकाश असल्याने आम्हाला या स्थापत्यसौंदर्याचा निवांतपणे आस्वाद घेता आला.

ट्रेनमधे बसल्यावर अन ट्रेन सुटल्यावर खिडकीतून टिपलेले दृश्य. इमारतीवर असलेले अ‍ॅन्टेनाजची उंची गृहीत न धरल्यास आजही पश्चिम गोलार्धातली सर्वात उंच इमारत विलिज टॉवर या फोटोत दिसत आहे.

इन्दुसुता यांच्या घरी आम्ही सर्व जण पोचल्यावर फर्मास चहाने आमचे स्वागत झाले. दमलेली मंडळी किंचीत विसावल्यावर विजुभाऊंनी आपल्या पोतडीतून (बॅकपॅकेतून) बासरी काढली. सोबतीला फोनवर तंबोर्‍याची धून वाजवून एकाहून एक मराठी व हिंदी गाणी त्यांनी बासरीवर वाजवून आमचे कान तृप्त केले. अधुनमधून स्वतःचा पहिला मिपा कट्टा, मिपावर नवे असताना घडलेल्या प्रत्यक्ष मिपाकरांच्या भेटी याबाबतचे किस्सेही आम्हाला ऐकवले.

थोड्याच वेळात इन्दुसुता यांनी डिनरच्या जेवणाची मांडामांड केली. मिसळपाव.कॉमचा कट्टा मिसळीशिवाय कसा होईल.
मिसळीतल्या सर्व पदार्थांचे दृश्य पाहून अन तर्रीच्या गंधाने आमच्या तोंडाला पाणी सुटले नसते तर नवलच.

ही मिसळ इतकी चविष्ट होती की आपण अमेरिकेत आहोत हे विसरायला झाले. अक्षरशः भारतात असल्यासारखे वाटले. अमेरिकेत भारतीय अन्न शिजवताना बरेच जिन्नस भारतातल्यासारखे दिसत असले तरी भारतातल्या चवीसारखे नसतात (उदा. शेंगदाणे) त्यामुळे भारतातल्यासारखी चव मिळवणे अत्यंत आव्हानात्मक असते.
मिसळ खाऊन पोट भरलं तरी मनाचं समाधान होत नव्हतं. विजुभाऊंनी मिसळ खाऊन, नाक पुसावे लागल्याची पोचपावती देऊन मिसळीच्या चवीच्या अपेक्षापूर्तीबाबत शिक्कामोर्तब केले. सोबतीला घट्ट ताक व नंतर दहीभातही होते. गोड म्हणून इन्दुसुता यांनी स्वतः पेढे देखील बनवले होते. परंतु थोडे बाजुला ठेवले गेल्याने अन अक्षरशः पोटात जागा न उरल्याने त्यावेळी कुणी पेढ्यांचा आस्वाद घेऊ शकलं नाही. नंतर सर्वांना बदाम बर्फी व पेढ्यांचे पार्सल मिळाले :-).

जिव्हातृप्ती झाल्यावर मग रंगली गप्पांची मैफिल.

मिपावरचे अनेक गाजलेले लेख, मोकलाया दाही दिशा, गाजलेल्या प्रतिक्रिया, कोटिभास्कर मिपाकरांच्या कोट्या अशा अनेक गोष्टी आठवणींच्या कप्प्यांतून अलगदपणे बाहेर आल्या. मिपाकर असल्यामुळे मिळणारे ज्ञान, समाधान व विविध क्षेत्रांतल्या तज्ञ अन अनुभवी मंडळींशी होणार्‍या मैत्री अशा अनेक घटकांबाबत सोदाहरण चर्चा झाली. जगभरात कुठेही असणार्‍या मराठी माणसांना जोडणारे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल स्व. तात्या अभ्यंकर यांना अन ते व्यासपीठ वर्षानुवर्षे जोमाने चालवल्याबद्दल नीलकांत यांना धन्यवाद देण्यात आले.

अनेक उत्तम लेखन करणारे किंवा उत्तम प्रतिक्रिया देणारे मिपाकर आजकाल मिपापासून दुरावल्याने खंत व्यक्त करण्यात आली. तसेच गेल्या काही वर्षांत हे जग अकाली सोडून गेलेल्या बर्‍याच मिपाकरांच्या आठवणी निघून काही क्षणांसाठी मंडळी उदास झाली.

पुंबा हे वयाने बरेच तरुण असुनही मिपाच्या अन मराठी आंतरजालाच्या इतिहासाबाबत त्यांच्या ज्ञानाबाबत इतरांचा अचंबा वाटला. त्यांच्या चौफेर वाचनाला इतरांनी दाद दिली.

व्यक्तिशः मला गेल्या बर्‍याच वर्षांत अशा मनसोक्त गप्पांच्या मैफीलाचा आस्वाद घेता आला नव्हता. ही संधी मला या मिपाकट्ट्यामुळे मिळाली. पॅनडेमिकच्या बंधनांतून जरा मोकळे झाल्याची अनुभूती मिळाली. भारतातले अन इतर ठिकाणचे मिपाकर हजर नसूनही या कट्ट्यासाठी त्यांच्या शुभेच्छांमुळे खूप बरे वाटले. काही वेळा गप्पांमधे आलेल्या किश्शांबाबत काही इरसाल मिपाकरांच्या प्रतिक्रिया काय आल्या असत्या असा विचार करुन मनातल्या मनात हसू आले.

पुन्हा भेटण्याचे अन संपर्कात राहण्याचे ठरवून कट्टेकर्‍यांनी एकमेकांचा निरोप घेतला अन एका अविस्मरणीय कट्ट्याची यशस्वी सांगता झाली.

फोटो सौजन्य - सर्व कट्टेकरी.