लेखकांना आवाहन

गलेमा संपली की मिपाच्या संपादक मंडळाला वेध लागतात ते आपल्या मिपाच्या दिवाळी अंकाचे.

या वर्षी गलेमाला मिळालेला उत्साहवर्धक प्रतिसाद पाहता दिवाळी अंकही धमाकेदार बनणार यात काही शंकाच नाही .

आपला सर्वांचा उत्साह वाढवणारी अजून एक गोष्ट यावेळी घडते आहे ती म्हणजे, या वेळी दिवाळी अंक आवाहन धागा प्रसिध्द होण्याआधीच साहित्य संपादकांना दिवाळी अंकासाठी लेख मिळायला सुरुवात झाली आहे. तर काहीनी आपापले रुमाल टाकून जागा अडवून धरल्या आहेत.

तेव्हा मंडळी तुम्ही तरी का बरं मागे राहताय? सरसावा आपापल्या लेखण्या आणि होऊ द्या मिपावर बरसात तुमच्या कसदार आणि जोमदार लेखनाची.

या वर्षीही दिवाळी अंकाकरिता ठराविक अशी काही थीम नाही. लेख, कविता, कथा, प्रवासवर्णन, भाषांतर, शशक, अलक, किंवा आपल्याला जे आवडेल, रुचेल ते तुम्ही लिहू शकता.

लेखन देण्याची मुदत २० सप्टेंबर २०२२ ते ५ ऑक्टोबर २०२२ अशी असेल. कोणत्याही प्रकारे पूर्वप्रकाशित लेखन कृपया पाठवू नये.

आपलं लेखन आपण साहित्य संपादक या व्यनिवर पाठवू शकता त्यासाठी येथे क्लिक करा. किंवा sahityasampadak डॉट mipa अ‍ॅट gmail डॉट com या ईमेल पत्त्यावरसुद्धा तुम्ही लेखन पाठवू शकता.

जर तुम्ही ईमेलद्वारे लेखन पाठवलं, तर मेलमध्ये आपला मिपा आयडी लिहायला विसरू नका.

काही प्रश्न, अडचणी असतील तर मदतीसाठी साहित्य संपादक आहेतच.

आलेल्या लेखनातील अंकाला साजेसं लेखन निवडून ते प्रकाशित केलं जाईल. निवडीचा संपूर्ण निर्णय संपादक मंडळाचा असेल.

अंकामधे काय असेल या बद्दल वाचकांची उत्सुकता कायम रहावी या करता आपण आपल्या लिखाणाबद्दल जाहीर तपशील प्रकट करु नये अशी विनंती.

मंडळी दिवस थोडेच उरले आहेत, तेव्हा जास्त वेळ वाया न घालवता लिहायला घ्या बरं...

आपल्या लेखनाच्या प्रतीक्षेत

-मिपा दिवाळी अंक टीम