h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Baloo 2', cursive;}
p {text-align: justify;font-family: 'Poppins', sans-serif;font-size:16px;}
.field-items img {margin-bottom:16px;margin-left: auto;margin-right: auto;}
पारनेरमधील ऐतिहासिक वास्तू
ऋषी पराशर यांच्या नावावरून पारनेर हे नाव या तालुक्याला लाभले, असे मानण्यात येते. पारनेर तालुक्यात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यातील दोन नगरकोट - जामगावचा व पळशीचा नगरकोट याची थोडक्यात माहिती इथे देत आहे. नगरकोट म्हणजे चहुबाजूंच्या तटबंदीच्या आत वसलेले नगर अथवा गाव.
जामगाव नगरकोट – महादजी शिंदे यांचा वाडा
पेशव्यांचे शूर सेनापती आणि इंग्रजांकडून ‘द ग्रेट मराठा’ अशी उपाधी मिळालेले महादजी शिंदे (१७३०-१७९४) यांनी जामगाव येथे हा नगरकोट निर्माण केला. ८०-८५ एकरात एका टेकडीवर दगडी तटबंदी आणि चार वेशींमध्ये याचे बांधकाम आहे.
मुख्य दरवाजा पूर्वाभिमुख आहे. त्याच्यासमोरच किल्ल्याबाहेर मारुतीरायाची भव्य मूर्ती आहे. या दरवाज्यातूनच पुढे परकोट (वाडा)कडे जाताना वाटेत अनेक जुनी मंदिरे, बांधकामे दिसतात.
जामगाव वाडा प्रवेशद्वार

वाड्यासमोरील मारुतीराया

जामगाव येथील जुनी मंदिरे

वाड्यात प्रवेशासाठी पुन्हा दोन दरवाजे आहेत. त्यातील सध्याच्या मोठ्या दरवाजातून आत गेल्यावर समोरच चंद्राकृती विहीर नजरेत भरते. विहिरीची खोली १५० फूट असून पाणी काढण्यासाठी मोटेची व्यवस्था आहे.
शिंदे यांचे वारस जिवाजीराव शिंदे यांनी रयत संस्थेस हा वाडा बक्षीस दिला आहे, त्यामुळे सध्या येथे शिक्षणशास्त्र पदविका महाविद्यालय सुरू असते.
वाड्यात शिरताच सल्लामसलतीचा एक छोटेखानी दरबार दिसतो. तिथे असलेल्या लाकडी खांबांवर सुंदर कोरीव नक्षी पाहायला मिळते. कोपर्यात एक खोली आहे, जेथे महादजी शिंदे यांची तसबीर आहे. समोर वाड्याचा मोठा चौक आहे.
महादजी शिंदे यांची तसबीर

जामगाव वाड्याचा चौक

सोप्यातून असलेला जिना चढून वरच्या मजल्यावर जाता येते. वरील मजल्यावर आकर्षक नक्षी असलेल्या खिडक्यांचे झरोके आहेत. बांधकामातच बनवलेल्या कुंड्याही छान आहेत. शेवटच्या मजल्यावरून सभोवतालचा आकर्षक परिसर नजरेत भरतो.
जामगाव वाडा खिडकीची नक्षी

जामगाव वाडा बांधकामातील कुंडी

वाड्यातून बाहेर पडून मुख्य रस्त्याच्या २०० मीटर पुढे पुरातन असे रामेश्वराचे मंदिर आहे. हेमाडपंथी व इतर दगडी बांधकाम असलेली गणपती व इतर देवतांची मंदिरे आहेत. मंदिराच्या कळसावरील मूर्ती विशेष घडवल्या आहेत.
रामेश्वर मंदिर शिखर

मंदिरांच्या दाराखाली विविध कीर्तिमुख आहेत. चाफ्याच्या झाडाखाली निवांत दोन क्षण अद्भुत आनंद वाटला.
रामेश्वर मंदिर कीर्तिमुख (१)

रामेश्वर मंदिर कीर्तिमुख (२)

मंदिर परिसरातील चाफ्याचे झाड

पळशी नगरकोट - पळशी वाडा आणि विठ्ठल राही रखुमाबाई पुरातन मंदिर
पळशी हे गावदेखील दगडी तटबंदी असलेल्या नगरकोटात वसलेले आहे. याला प्रवेशासाठी चार वेशी (दोन छोट्या व दोन मोठ्या) असून सुस्थितीत आहेत.
किल्ल्याच्या आत तीन जुने वाडे आहेत, त्यातील एक वाडा चांगल्या स्थितीत आहे आणि एक वाडा - पळशीकरांचा वाडा काष्ठशिल्पासाठी परिचित आहे. होळकरांचे दिवाण असलेल्या कांबळे-कुलकर्णी यांनी वाड्याची निर्मिती केली, असे समजले. मूळ मालक सध्या इंदूरला वास्तव्यास आहेत. एक कुटुंब सध्या वाड्याची देखभाल करते.
प्रवेश करतानाच लाकडी कोरीव काम असलेल्या दरवाजा दिसतो. वाड्यात आत गेल्यावर डोळ्यांचे पारणे फेडणारे अप्रतिम लाकडी कोरीव काम असणारे खांब आहेत. अंबारीसह हत्ती, मर्कट, ड्रॅगनसम शिल्प, लाकडी कोरीव मनुष्य मूर्ती, फुलांच्या परड्या अशा केवळ असंख्य अप्रतिम कलाकुसरी आनंद देतात. समोरच्या चौकात जुने भुयारी मार्ग बुजवण्यासाठी दगडी परात, जाते बसवलेले आहेत.
कोपर्यातच जुने पारंपरिक मंदिर आहे. मंदिराचे दार आणि पुढील आतील कोरीव छत त्या काळातील लाकडी फॉल्स सीलिंगच म्हणावे लागेल. दुसर्या मजल्यावर राण्यांच्या महाल, रंगमहालसदृश महाल होता. तो आता ढासळला आहे.
पळशी वाड्यातील काष्ठशिल्पे व कोरीव कामे







दगडी परात

अशा प्रकारे अप्रतिम काष्ठशिल्प पाहून पुढे जवळचेच 'प्रतिपंढरपूर' समजले जाणारे राही राखुमाबाईसह असणारे मंदिर पाहायला गेलो.
उंचच उंच प्रवेशद्वारावरच नगारखाना आहे, ज्यावर जाण्यासाठी आतील बाजूने जिन्याची सोय आहे. मंदिराचे शिखर दोन भागांत आहे. समोरील मंडपाचे घुमटाकार आणि गर्भगृहाचे उंच शिखर आहे.
पळशी विठ्ठल मंदिर



मंदिरामध्ये गोपाळ विठ्ठलरूपातील मूर्ती आहे, कारण विठ्ठलाच्या मूर्तीच्या पायाशी धेनू, गोवत्सल आहेत. मूर्तीच्या बाजूला दशावतार रेखलेले आहेत. विठ्ठलाच्या एका बाजूला रुक्मिणीची आणि एका बाजूला राहीची अशा मूर्ती आहेत. चौथाराच्या खालील बाजूस वाद्ये वाजवणारे लोक घडवले आहेत.


मंदिराच्या आतील भिंतीवर राधा-बासरीधारक कृष्ण, राम-सीता-लक्ष्मण, गणेश-ऋद्धिसिद्धी, ६४ योगिनी अशा अनेक सुबक मूर्ती आहेत. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर मोराच्या अनेक छटा, युद्धातील दृश्ये, व्याल, गजयुद्ध कोरीव काम आहे. महिषासुरमर्दिनीची व इतरही २ फूट उंचीच्या मूर्ती आहेत. मंदिराचे शिखर सुंदर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
पळशी मंदिरातील काही दगडी शिल्पे









मंदिरामागे पाण्याचा प्रवाह आहे. त्यापलीकडे शंकराचे आणि गणपतीचे मंदिर आहे. मंदिराला आधुनिक रंगरंगोटी केली आहे तीही उठून दिसत आहे.
पळशी शंकर मंदिर

पळशीचा गणपती

पावसाळ्याचे दिवस, श्रावणाची हिरवाई, पाण्याच्या प्रवाहाचा मनमधुर खळखळाट... हे दृश्य नेत्रांत मनसोक्त सामावून एक सुंदर दिवस भटकंती घडली.
- भक्ती