श्री गणेश लेखमाला २०२२ : दिवस रेशनिंगचे

h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Baloo 2', cursive;}
p {text-align: justify;font-family: 'Poppins', sans-serif;font-size:16px;}
.img-left {float: left;width:20%;margin-right:20px;}

श्री गणेश लेखमाला २०२२"आई, यंदा गणेश चतुर्थीला उकडीचे मोदक'जोशी वहिनींचे किचन'मधून आणायचे का?
आधी ऑनलाइन ऑर्डर द्यायची आहे."
इति माझा मुलगा.
"हो! आणा बाबांनो!" मी वेळ न दवडता उत्तर दिले.
बदलत्या काळानुसार बदलण्यातच शहाणपण आहे. आपल्याला आता होत नाही. विचारले हे काय कमी?
खरेच, किती काळ बदलला आहे.
माझे मन स्वातंत्र्यपूर्व व नंतर अगदी सत्तरच्या दशकापर्यंत गेले.

रेशनिंगचे दिवस!
आता खिशात पैसे किंवा कार्ड पेमेंट किंवा गूगल पे अशी टेक्नॉलॉजी वापरून काहीही होम डिलिव्हरी मागवू शकता. अगदी उकडीचे मोदकसुद्धा!
पण त्या काळात महिन्याची दोन टोके जुळवताना मध्यमवर्गीयांच्या नाकीनऊ येत. शेवटचा आठवडा 'पेपर विक(वीक)'!
सणावाराची तरतूद करायला लागायची, नाहीतर वाण्याची उधारी!
त्यात रेशनिंगचे दिवस. रेशनिंगच्या दुकानात उधारी नाही. रेशन कार्ड दाखवा पैसे मोजावे आणि ज्या क्वालिटीचे गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी मिळेल ती मुकाट्याने घेऊन चालू पडा. नो चॉइस!

निळसर जांभळ्या रंगाच्या कार्डला दर महिन्याला पांढरी स्लिप लावून आणायची!
रेशनिंगचे दुकान सकाळी नऊ वाजता उघडायचे. एक आठवड्याचेच रेशन मिळायचे. पण सकाळी सात वाजल्यापासून लाइन लागायची. तरच नंबर लागायचा. उशीर झाला तर 'आजचा साठा संपला' हा बोर्ड पाहून हिरमुसले होऊन परत!

माझी मोठी बहीण व मी सकाळी सात वाजता नंबर लावत असू. आई घरकाम करून दहा वाजता यायची. वडिलांची फिरती नोकरी.
गहू लाल किंवा पांढरा नि:सत्त्व! आयात केलेला. कॅनडा, अमेरिका.. जिथे तो गुरांना घालत. ज्वारी लाल. तांदूळ बरेचदा उकडा किंवा जाडाभरडा. धान्यात खडे कुच्चर, काड्या, पोरकिडे ह्यांची रेलचेल!

आमच्या खाली नारू आणि चक्कू हे मद्रासी भाऊ राहत. त्या वेळी 'साउथ इंडियन' शब्द रूढ नव्हता. नारूची पत्नी जानकीवहिनी हिने एक युक्ती सुचवली - "तुमचे उकडे तांदूळ आम्हाला द्या, आमचे गहू तुम्ही घ्या." त्या वेळी आपल्याला इडली-डोसा माहीत नव्हता
काय असेल तो डिफरन्स देऊन टाकायचा.

तेव्हा आम्ही विलेपार्ले इथे गोखले वाडीत राहत होतो. आमचे सगळे खानदान यूपी, एमपी, गुजराथ, राजस्थान इकडे वसलेले. तिकडे ओला नारळ त्या वेळी मिळत नसे. तांदळापेक्षा गव्हाचा आहार जास्त. त्यामुळे कोरड्या खोबऱ्याचे कणकेचे तळलेले मोदक आणि करंज्या. कणकेचे मोदक करा की उकडीचे मोदक, धान्याची क्वालिटी अगदी 'वाखाणण्याजोगी' असायची. पण आपले गणपतीबाप्पा सगळे गोड मानून घ्यायचे.

आता खुल्या बाजारात अगदी स्वच्छ निवडलेले धान्य मिळते.
नंतर हळूहळू बदल होत गेला. रेशन कार्ड जाऊन पुस्तिका आली. आता तर रेशन कार्ड फक्त दारिद्रयरेषेखालील नागरिकांना लागते.
आज जसे आधार कार्ड, पॅन कार्ड लागते, तसेच त्या वेळी रेशन कार्ड लागायचे. मी आमचे रेशन कार्ड त्या काळाची आठवण म्हणून जपून ठेवले आहे. आता त्या रेशन कार्डाला कोणी विचारत नाही. तर असे ते रेशनिंगचे दिवस. प्रत्येक राज्यात नियम वेगळे वेगळे.

घरी बाळ जन्माला आले, मुलाचे लग्न होऊन सून आली की बर्थ सर्टिफिकेट, लग्नपत्रिका नेऊन रेशन कार्डात नाव वाढवून घ्यायचे आणि मुलगी लग्न करून सासरी गेली, कोणी वैकुंठवासी झाले तरी लग्नपत्रिका, मॅरेज सर्टिफिकेट वा मृत्युदाखला दाखवून नाव कमी करायचे. ही कामे एका खेपेत कधीही होत नसत.

मंगलकार्यासाठी किंवा श्राद्धविधीसाठी निमंत्रण पत्रिका वा डेथ सर्टिफिकेट दाखवून ५० जणांसाठी आपला नेहमीचा स्वैपाक परवानगी मिळायची.
पण जास्त मंडळी असतील तर मेनू अशा प्रकारे साधारण -
टोमॅटो सार, वऱ्याच्या तांदळाचा भात / मसालेभात, राजगिरा पुऱ्या, आरारूट जिलबी, बटाटेवडे / भजी, कोशिंबीर, दही-ताक.
चहा गुळाचा कितीही करा, पण साखरेचा ५० कप.
रेशनिंगचे तपासणी अधिकारी अचानक येत. मग एक धावपळ नियम मोडले असतील तर!

त्या वेळी पर पात्री रेट्स नव्हते. एकूण किती पाने? कधीकधी कार्यालयाचे आचारी असत, तर कधी आपल्याला सोय करावी लागायची. पण म्हणून मंगलकार्य वा श्राद्धविधी होण्याचे थांबले नव्हते. बऱ्याच प्रकारे 'अ‍ॅडजस्टमेंट' चालायची, तुम्ही आम्हाला समजून घ्या, आम्ही तुम्हाला!
सुज्ञ वाचक समजतीलच.
रिसेप्शनला बटाटेवडा, साबुदाणा खिचडी, आरे दूध डेअरीचे गोड दूध चालायचे.

ह्यातून ब्लॅक मार्केटिंग जन्मले. जिथे निर्बंध नव्हते, तिथून धान्य यायचे. लोक अडीअडचण, समारंभ म्हणून चार पैसे जास्त मोजून घ्यायचे. रेशन दुकानदार धान्य संपले म्हणून बोर्ड लावायचा आणि ते धान्य ब्लॅकने विकायचा. रेशनचे अन्न खाऊन खाऊन कंटाळलेले सामान्य लोक घ्यायचे. श्रीमंतांना कसलीच चिंता नसते.
गुजरातमधून साखर दोन शेर आणता यायची. मग आमचे नातेवाईक येताना आणत असत. तर एका मामांनी चक्क श्रीखंडच आणले. त्या वेळी फ्रीज नव्हते, त्यामुळे एका दिवसात सगळे श्रीखंड फस्त!

महू (मध्य प्रदेश) येथे आमचे काका-काकू राहत. गहू आणायला बंदी होती, पण कणीक आणता येत असे. खांडवा गव्हाची डबाभर कणीक ते दर वर्षी आणत. मग काय? छान पिवळसर पोळ्या!
लाल-पांढऱ्या पोळ्यांना सुट्टी! ठाणे जिल्ह्यातून दोन शेर तांदूळ आणता येत असे.

उल्हासनगर (यूएसए)हून २-२ शेराच्या पोटल्या घेऊन बायका रेल्वेच्या डब्यात किंवा ठरावीक ठिकाणी जाऊन विकत असत. सुरती कोलम किंवा आंबेमोहोर किंवा कमोद! बासमतीचे आगमन झाले नव्हते.

रेशनिंगचा एक किस्सा लिहून लेख पूर्ण करते.
विलेपार्ले इथे एका मोठ्या बंगल्यात रेशनिंग ऑफिस होते. बाहेरच्या दालनात आठ-दहा टेबले, सगळा महिला वर्ग. आतल्या दालनात साहेब बसत. तिथे जायला झुलते दार ढकलून आत जायचे.
मोठी बहीण दहा वर्षे, मी आठ वर्षे. एकदा आईने आम्हाला कार्डावर स्लिप लावायला पाठवले.
लहान मुली पाहून त्या बायका एका टेबलावरून दुसऱ्या असे पाच-सात वेळा केले. आमची टिंगल करू लागल्या. फिदीफिदी हसत होत्या.
बहीण म्हणाली, "आपण परत जाऊ."
मी तिला म्हणाले, "नको, आपण साहेबांना सांगू."
तिच्या हो-नाहीची वाट न बघता हात धरून सरळ झुलते दार ढकलून साहेबांच्या दालनात गेले. एका दमात साहेबांना सांगितले, "साहेब! आमच्या वडिलांची फिरती असते. आईला घरी काम असते. म्हणून आईने आम्हाला स्लिप लावायला पाठवले. पण बाहेर बसलेल्या मावश्या आमची टिंगल करतात. स्लिप लावून देत नाहीत."
साहेब चांगले होते. "चला, बघतो मी!"
बाहेर येऊन साहेबांनी त्या महिलांना चांगला दम भरला. "लहान मुलींना मदत करायची की टिंगल करायची? माझ्यासमोर स्लिप लावून द्या."
एकीने मुकाट्याने स्लिप लावून दिली. त्या आमच्याकडे रागाने बघत होत्या.
त्या वेळी 'थँक्यू' वगैरे म्हणणे माहीत नव्हते. मी फक्त "साहेब! तुम्ही चांगले साहेब आहात" असे म्हटले.
घरी आल्यावर बहिणीने आईला सगळा किस्सा सांगितला. आईने मला जवळ घेतले. "माझी गुणाची पोर ती" असे म्हणाली. मग वाडीमध्ये बरेच दिवस कौतुकाचा विषय झाला. मूठभर मांस चढणे ह्या म्हणीचा प्रत्यय आला.

अनुराधा काळे (वय ८२)
ठाणे (प) 400602)