जुलैभर धुव्वाधार पाऊस कोसळून गेला तरी यावेळी कुठेच भटकंती झाली नव्हती. असंच मित्रांशी गप्पा मारता मारता कुठेतरी जाऊन येऊ असे ठरले आणि ठिकाणही लगोलग निश्चित झाले ते म्हणजे जुन्नरच्या परिसरात भटकून यायचे, अर्थात लेण्याद्री आणि नाणेघाटात. रविवार म्हणजे वेळच वेळ होता. ही दोन्ही ठिकाणे अगदी आरामात करता येतील आणि वाटेत ठिकठिकाणी थांबत थांबत इथला बहरलेला निसर्ग भरभरुन पाहात जाऊ असे ठरले आणि त्यानुसार सकाळी निघाली. पुरोहितला नाष्टा करुन जुन्नरला आलो. वाटेत मानमोडी लेण्यांचा गट लक्ष वेधून घेत होता. शिवनेरीला साखळीच्या वाटेला हल्लीच रेलिंग लावल्याचे पायथ्यावरुनच दिसले. शिवनेरी खूपदा केला असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणी जागवत लेण्याद्रीच्या वाटेस लागलो. तिथून लेण्याद्री जेमतेम ७/८ किलोमीटर अंतरावर.
महाराष्ट्रात ठिकठिकाणी लेणी आहेतच, पण बारकाईने नजर टाकल्यास ती कोकणातील प्राचीन बंदरापासून सह्याद्रीच्या कड्यांच्या भिंती पार करुन देशावर पोहोचणार्या प्राचीन घाटमार्गांच्या आसपासच ती कोरल्याचे लक्षात येते. व्यापारी मार्गांवरील श्रेष्ठींसोबत निघणार्या बौद्ध श्रमणांचे वर्षावास म्हणूनच ही लेणी खोदण्यात आली. या घाटमार्गांच्या संरक्षणासाठी असलेले दुर्ग लेण्यांपेक्षाही अधिक प्राचीन हे सहज मानता यावे. उदा. बोरघाटाचे संरक्षक दुर्ग म्हणजे राजमाची,लोहगड, विसापूर, कोरीगड आणि त्यांच्या संरक्षणाखाली असलेली लेणी म्हणजे कार्ले, भाजे, बेडसे, कोंडाणे. चौल, महाड ते पैठण या मार्गावरील लेणी म्हणजे कुडे, मांदाड, पाले आणि त्यांचे संरक्षक दुर्ग म्हणजे तळेगड, घोसाळगड, रायरी, मानगड, कावळ्या. या मार्गांपेक्षाही सर्वात महत्वाचा घाटमार्ग म्हणजे श्रीस्थानक (ठाणे), कलियान (कल्याण) या बंदरांवरुन येणारा आणि जुन्नरवरुन जाऊन प्रतिष्ठान (पैठण) येथे पोहोचणारा नाणेघाट. ह्याच परिसरात कित्येक प्राचीन घाटवाटा आहेत. नाणेघाटाच्या जवळच असलेले भोरांड्याचे दार, माळशेज घाटाची प्राचीन वाट, आंबोली येथून निघणार्या दार्या घाट, आंबोली घाट, तिरंगी घाट, डोणीचे दार, खुट्टे धार, भीमाशंकरजवळील गणपती घाट, रानशीळ घाट, आहुपे घाट इत्यादी अनेक, मात्र घाटांचा राजा हा नाणेघाट. ह्या परिसराला इतके महत्व असण्याचे कारण म्हणजे जीर्णनगर, जुण्णनगर अर्थात जुन्नर नावाचे प्राचीन वैभवशाली नगर. ही क्षत्रपांची महत्वाची नगरी तर होतीच पण ही सातवाहनांची उपराजधानी. किंबहुना पैठणच्या आधी ही सातवाहनांची राजधानीच असावी अशी येथील संपन्न अवशेषांवरुन म्हणण्यास वाव आहे. नाणेघाटातील सातवाहनांचा प्रतिमालेख येथील सर्वात महत्वाचा आहेच मात्र ह्या जुन्नर परिसरात ज्ञात अशी २०० च्या आसपास कोरीव लेणी, आणि कित्येक महत्वाचे शिलालेख येथे आहेत. नाणेघाट, शिवनेरी किल्ल्याच्या कड्यातील कित्येक कातळकोरीव लेणी, तुळजा लेणी, मानमोडी लेणी समूह, लेण्याद्री, लेण्याद्रीच्या डोंगरातच मागील बाजूस असलेला सुलेमान गट, बल्लाळ लेणी अशी कित्येक लेणी येथे विखुरलेली आहेत. ह्या लेण्यांच्या संरक्षणासाठी किल्ल्यांची एक मजबूत फळीच येथे उभी राहिलेली आहे. खुद्द नाणेघाटाचा पाठीराखा असणारा बेलाग जीवधन, त्याच्या आजूबाजूचे चावंड, हडसर, निमगिरी, सिंदोळा, हटकेश्वर, नारायणगड हे सर्वच अतीप्राचीन, किमान दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीचे कातळकोरीव दुर्ग. नाणेघाटाचा संरक्षक जसा जीवधन तसाच जुन्नरसारख्या वैभवशाली शहराचा आणि त्यालगत असणार्या शिवनेर, तुळजा, मानमोडी आणि गणेश लेणींचा संरक्षक दुर्ग म्हणजेच शिवनेरी. चला तर मग लेण्याद्रीची अल्पशी भटकंती करुयात.
जवळपास तीस लेणी लेण्याद्रीच्या डोंगरात आहे. येथे असलेल्या क्रमांक ७ येथील विहारात असलेल्या अष्टविनायकांपैकी एक असलेल्या गिरिजात्मजाच्या वास्तव्यामुळे ह्या लेणीसमूहाला गणेश लेणी म्हणून ओळखले जाते. किमान ३० लेणी ह्या समूहात आहेत पैकी दोन चैत्यगृहे आणि इतर लहानमोठे विहार. क्र. ७ चे लेणे हा येथील अतिशय विस्तीर्ण विहार. ज्यांनी कुणी नाशिकच्या त्रिरश्मी डोंगरात असलेली पांडवलेणी पाहिली असतील त्यांना तेथील क्र. ३ आणि क्र. १० मधील अनुक्रमे नहपान विहार आणि देवी लेण्याशी असलेले साम्य सहज लक्षात यावे. पर्सिपोलिटन धर्तीचे सालंकृत सातकर्णी स्तंभ, तेथील विहार कक्षांना असलेली चौकटीतले प्रसंग, विहारात असणारे शयनकक्ष आणि समोरील बाजूस असणारा विस्तीर्ण कक्ष आणि त्यात अर्ध उठावात असणारा स्तूप. हा अर्धउठावात असलेला दागोबा म्हणजेच सध्याची शेंदूर लावलेली गणेशमूर्ती यात मलातरी काहीच शंका वाटत नाही. अर्थात ही लेणी बळकावलेली नसून बौद्ध धर्माचा पूर्ण र्हास झाल्यावर ह्या बेवसाऊ झालेल्या मूळच्या बौद्ध लेण्यांत कालांतराने हिंदूंनी त्यांच्या दैवतांची स्थापना करुन ह्या लेणी जागत्या ठेवल्या. ह्याचे अजून एक उदाहरण म्हणजे घोरावडेश्वराची लेणी. असो.
जेमतेम २०/२५ मिनिटे गणेशलेणीत पोहोचायला लागत असलेली तरी ही पायर्यांची चढाई अगदी उभी असल्याने खूप दमछाक करते. गणेश लेणीत जायला एक कातळकोरीव मार्ग असून आपला प्रवेश व्हरांड्याच्या अंतर्भागात होतो.
पायथ्यावरुन दिसणारी गणेशलेणी
गणेशलेणी समूहातील इतर लेणी
रविवार असल्याने गणपती दर्शनाला बरीच गर्दी होती.
गणेश लेणीत जायचा कातळकोरीव मार्ग
गणेश लेणीचा विस्तीर्ण विहार व त्यातील कक्ष
गणेशलेणीच्या व्हरांड्यात अतिशय देखणे असे पर्सिपोलिटन धर्तीचे सातकर्णी स्तंभ आहेत. खाली तळखडा, त्यावर स्तंभ, त्यावर उपडा घट, त्यावर लहान आमलक आणि त्याच्यावर हर्मिकेची सात पायर्यांची उलटी रचना आणि त्यावर प्राण्यांच्या जोड्या अशी यांची रचना. गणेश विहारातील स्तंभांवर वाघ, सिंह, हत्ती अशा प्राण्यांच्या जोड्या आढळतात.
गणेश लेणीतील स्तंभरचना
गणेश लेणीतील स्तंभरचना
स्तंभावरील व्याघ्राची रचना
गणेश लेणीतून दिसत असणारा शिवनेरी
गणेश लेणीच्या बाजूलाच आहे येथील ६ व्या क्रमांकाचे लेणे म्हणजे येथील चैत्यगृह
पिंपळपानाकृती नक्षी असणारे प्रवेशद्वार, आतील बाजूस ओळीने असणारे सातकर्णी स्तंभ, वरचे गजपृष्ठाकार छत, त्यावर फासळ्यांची रचना आणि ह्या सर्वांशी विलक्षण समतोल साधून असणारा देखणा स्तूप हेच याचे वैशिष्ट्य आणि हेच याचे सौंदर्य. चैत्यगृहाच्या प्रवेशद्वारावरील चार स्तंभ आज पूर्णपणे झिजले आहेत मात्र आतील अजुनही व्यवस्थित आहेत.
चैत्यगृहाचे प्रवेशद्वार
चैत्यगृहाचा अंतर्भाग
जोते (पाताळ), वेदिकापट्टी, अण्ड (पृथ्वी), हर्मिका (स्वर्ग) यांचे प्रतिक असणारा स्तूप
सालंकृत स्तंभांवरील वाघ, गज यांच्या जोड्या
सालंकृत स्तंभ
याच स्तंभांवर एक आश्चर्य लपलेले आहे ते म्हणजे स्फिंक्स. मानवी चेहरा आणि सिंहाचे शरीर असणारी ही ग्रीक मिथिकल रचना. येथील लेण्या खोदण्यात यवनांचा अर्थात ग्रीकांचाही हातभार लागत असे. व्यापाराबरोबरच कलेचे, संस्कृतीचेही आदानप्रदान होत असे ह्याचे अतिशय स्पष्टपणे दर्शन ह्या शिल्पांद्वारे होत असे. नासिक लेण्यात स्फिंक्स आणि अथेना दिसतात तर भाजे लेण्यात सेंटॉर, पॅगेसस ही यवनी शिल्पे दिसतात. इथला स्फिन्क्स ओळखणे तसे सोपे आहे. स्फिन्क्सची जोडीच येथे असून एकाचा अर्धा भाग पूर्णपणे तुटला आहे तर एक स्फिन्क्स आजही पूर्णपणे शाबूत आहे.
मानवी शिर, कानात कुंडलं आणि शरीर मात्र सिंहाचे अशी याची रचना
स्फिन्क्स जोडी
स्फिन्क्स
स्फिन्क्स बघून चैत्यगृहाच्या बाहेर पडलो.
लेण्याद्रीतील इतर लेणी मात्र तुलनेने अवघड आहेत, पावसामुळे निसरड्या झालेल्याअरुंद पायर्या, पूर्णपणे मोडलेल्या वाटा ह्यामुळे येथे जाणे तसे धोक्याचेच आहे.
लेण्याद्रीतील इतर लेणी
लेण्याद्रीतील इतर लेणी
लेण्याद्रीतील इतर लेणी
लेण्याद्री समूह
लेण्याद्री बघून झपझप उतरलो ते निघालो थेट नाणेघाटात. वाटेत शिवनेरीच्या पुढे गेल्यावर उजवीकडे डोंगरात तुळजा लेणी लक्ष वेधून घेत होती. आपटाळ्याच्या पुढे निसर्ग एकदम वेगळेच रूप धारण करतो. आत्तापर्यंत पांढरे काळे असणारे ढग आता गडद रूप धारण करु लागलेले असतात, मधूनच एक जोरदार सर बरसून जात असते, भातखाचरं पाण्याने तुडुंब भरलेली असतात, चहूबाजूंनी हिरवं हिरवं झालेलं असतं. चावंड, हडसर, जीवधन असे तालेवार गड खुणावू लागलेले असतात.
दोन डोंगरांची दिसणारी जोडगोळी म्हणजे हडसर उर्फ पर्वतगड
सर्व बाजूंनी असलेल्या कातळकड्यांचं नैसर्गिक संरक्षण लाभलेला चावंड उर्फ प्रसन्नगड
अगदी चित्रातल्या घरासारखी दिसणारी एक वस्ती
इथल्या परिसरावर निसर्गाने अगदी भरभरुन कृपा केली आहे.
एक सुंदर निसर्गचित्र, पाठीमागे ढगात बुडालेला वर्हाड्या डोंगर
एका पावसाळी तळ्यात अर्धवट बुडालेले एक झाड
अशीच सुरेख निसर्गचित्रे बघत बघतच नाणेघाटात पोहोचलो तर तिथे प्रचंद गर्दी. घाटातल्या नळीत तर अक्षरशः बॉटलनेक झालं होतं. इतकी गर्दी याआधी येथे कधीच पाहिली नव्हती. येथे येणार्या ९९% लोकांना तरी नाणेघाटाचे महत्व, येथील प्रतिमालेख, येथील इतिहास, येथील कला अआणि संस्कृती माहिती आहे का विचाअर मनात तरळून गेला.
नाणेघाटावरुन दिसणारे दृश्य, उजव्या बाजूस दिसत आहेत ते गोरखगड आणि मच्छिंद्र सु़ळका
नाणेघाटातल्या नळीची सुरुवात आणि दगडी रांजण
ढगात लपलेला जीवधन
नाणेघाटावर खूप वेळा लिहिले असल्याने ह्यावर आता अधिक लिहित नाही.
गुहेतील शिलालेख
खूप गर्दी असल्याने बाजूच्याच टेकाडावर गेलो, तिथून नानाच्या अंगठ्याचे एक वेगळेच रूप दिसते.
नानाचा अंगठा
कोकणात कोसळत असणारा पाऊस
नाणेघाट पाहून परतीच्या प्रवासास निघालो, वाटेत डोंगराची, ओहोळांची असंख्य रूपे दिसत होती.
जीवधन किल्ला
वाटेत नळवंडी गावाजवळून वाहणारा खळाळता प्रवाह इथले आकर्षण, गाळ नसलेली दगडगोटे मिश्रित वाळू, आरसपानी खळाळता प्रवाह ह्यामुळे येथे डुंबणे खरोखरच आनंददायी आहे.
खळाळता प्रवाह
इथे अगदी तासनतास बसून राहावेसे वाटते
सुरेख निसर्गचित्र
इथून निघालो ते शिवनेरीच्या पायथ्यालाच एक पेशवेकालीन शिवमंदिर आहे, तेथे गेलो, येथे पाण्याची कुंडे, दोन वृंदावने आणि भग्न झालेले बुरुज आहेत, येथीलच एका बाहेरच्या कुंडापाशी मावळतीपर्यंत बसलो आणि मग घरच्या वाटेला लागलो.