पेडगावची तीन भग्न मंदिरं बघत बघतच आपण येतो ते इथल्या सर्वांगसुंदर मंदिरासमोर. ते म्हणजे इथले प्रसिद्ध असे लक्ष्मीनारायण मंदिर.
हे मंदिर अप्रतिम अशा कोरीव कामामुळे नटलेलं आहे. सभामंडप, अंतराळ, गर्भगृह अशी त्याची रचना. सभामंडपाला तीन बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत. पैकी बाजूंची दोन प्रवेशद्वारे अर्धमंडपातून उघडतात. म्हणजेच हे मंदिर मुखमंडप, सभामंडप आणि अर्धमंडप अशा मंडपाच्या विविध प्रकारांनी युक्त आहे. ह्या मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य असं की इथं अतिशय देखणी जालवातायनं आहेत जी समकालीन मंदिरांत अगदी अभावानंच दिसतात. मंदिराच्या बाह्य भिंतींवर सुरसुंदरी, वादक, अष्टदिक्पाल, विष्णूचे २४ अवतार, गजथर, अश्वथर, नरथर, देवकोष्ठ असे विविध प्रकार दिसतात.
पेडगावचं मंदिर हे भीमेच्या काठावर. इकडच्या पाच मंदिरांच्या संकुलातलं सर्वात मोठं, सर्वाधिक सालंकृत आणि सर्वाधिक देखणंं तसंच पुरातत्व खात्याकडून सर्वाधिक निगा राखलं गेलेलं.
आजमितीस ह्या मंदिराची बरीच पडझड झालेली आहे. मूळच्या कमालीच्या देखण्या असलेल्या मंदिराच्या बाह्यभिंतींवरील मूर्ती आज बर्याचश्या झिजल्या आहेत. अर्धमंडप आणि गर्भगृह यांची शिखरे आज पूर्णतः नष्ट झालेल्या अवस्थेत असल्याने मंदिराचे शिखर पूर्वी कोणत्या पद्धतीचे असावे हे आजमितीस ओळखता येत नाही.
कोरीव दरवाजातूनच मंदिरात प्रवेश होतो. मंदिरात रंगशिळेला चार स्तंभांनी आधार दिलेला आहे, ह्याव्यतिरिक्त अंतर्भागात इतर स्तंभ नाहीत मात्र जालवातायनाला, गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराला कोरीव अर्धसतंभांचा आकार देऊन जास्त स्तंभ आहेत असा आभास निर्माण केलेला आहे.
मंदिराचे प्रवेशद्वार
आतील स्तंभांवर शैव, वैष्णव द्वारपाल, विविध पौराणिक प्रसंग, नर्तिका आदी मूर्ती कोरलेल्या आहेत. स्तंभांना भारवाहक यक्षांनी आधार दिलेला आहे.
स्तंभांवरील कोरीव कामे
-
-
मंदिरातील स्तंभाची रचना खाली तळखडा, त्यावर कुंभ, त्यावर चौकोनी उभट स्तंभ, त्यावर अष्टकोनी स्तंभ, त्याच्यावर आमलकरुपी कलश त्यावर चौरंगासारखी नक्षी, त्यावर उद्गम आणि सर्वात वर भारोत्तलन करणारे यक्ष अशी गुंतागुंतीची रचना आहे.
स्तंभांवर देवतांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.
शिव आणि भैरव
-
विष्णू आणि सूर्य
-
मुंगूस आणि धनाची पिशवी हाती घेतलेला कुबेर
कुस्ती खेळणारे क्रिडापटू
जैन साधू
गर्भगृहाचे प्रवेशद्वार अतिशय सुंदर असून ते पंचशाख पद्धतीचे आहे. कल्पलता, स्तंभ, पद्मलता, गंधर्व आणि व्याल त्यावर कोरलेले आहेत तर त्याच्या खालील बाजूस गंगा, यमुना, चामरधारी द्वारपाल आणि किर्तीमुखे आहेत.
प्रवेशद्वार रचना
इस्लामी आक्रमणात ही मंदिरे भग्न झालेली असल्याने येथील गाभार्यात मूर्ती नाही, त्याऐवजी वीरगळाचा एक अर्धवट तुटलेला वरचा भाग येथे पीठाच्या स्थानी ठेवलेला आहे.
अंतर्भागातील मंदिर रचना
इथली जालवातायने अतिशय देखणी आहेत हे आधी सांगितलेच आहे, मात्र त्यांचे खरे सौंदर्य दिसते ते आतील मंडपातूनच.
जालवातायन
विविध प्रकारचे नक्षीकाम असलेले जालवातायन
चला तर आता मंदिराच्या सभोवताली एक फेरफटका मारुयात
बाहेरील बाजूस मंदिर पंचरथ पद्धतीचे असून गजथर, अश्वथर, नरथर, जंघा आणि त्यावर देवकोष्ठ अशी रचना आहे.
एका वेगळ्या कोनातून मंदिर
बाहेरुन दिसणारे जालवातायन
गजथर व अश्वथर
मंदिराच्या बाह्यांगावर विविध सुरसुंदरी, नर्तक, विष्णूचे अवतार, अष्टदिक्पाल यांच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. ह्यापैकी काही आता आपण बघू.
नृसिंहावताराची ही भग्न मूर्ती
त्रिशूळ आणि नाग हाती धारण केलेली ही भैरवमूर्ती
विष्णूचा वराह अवतार
भैरवाची अजून एक मूर्ती
एडका वाहन असलेली हाती जपमाळ, ध्वज, पाश आणि कमंडलू धारण केलेला हा आग्नेयेचा दिक्पाल अग्नी
ऐरावत वाहन असलेला वज्र धारण करणारा पूर्वेचा दिक्पाल इन्द्र
दोन कमळे हाती घेतलेला सूर्य
येथील सर्वात जास्त आवडलेली दिक्पाल मूर्ती म्हणजे वायव्येचा दिक्पाल असलेल्या वायूची.
दोन फडफडते ध्वज, खांद्यावर घडा, झेपावत असलेले वाहन हरीण ह्या सर्वांशी विलक्षण समतोल साधत असलेली त्रिभंग मुद्रेतील वायू.
आता सुरसुंदरींच्या मूर्ती बघू
एका सुंदरीच्या पायात अडककेला काटा काढण्याच्या प्रयत्नात असलेला बटू
आळस देणारी आलस्यसुंदरी
सुरसुंदरी शुकसारिका- हिच्या डाव्या हातात असलेला पोपट आज पूर्णपणे नष्ट झालाय मात्र हातातील फळांच्या घडामुळे हीची ओळख अगदी सहज पटतेय.
ही बहुधा दर्पणसुंदरी असावी
आता मंदिराच्या बाह्यभिंतींचे अवलोकन करु
मंदिराचे विलक्षण कोनातून होत असणारे दर्शन विलक्षण सुंदर भासते.
भीमेच्या ऐन तटावर हे मंदिर वसलेले आहे.
बाहेरुन दिसणारे जालवातायन
मंदिरासमोर असलेले भीमेचे विस्तीर्ण पात्र
लक्ष्मीनारायण मंदिराच्या अगदी समोरच आहे ते अजून एक नितांतसुंदर पण भग्न झालेले बाळेश्वर मंदिर, त्यासकट पाहूयात बहादूरगडाचे काही अवशेष पुढच्या भागात.