शशक'२०२२ - सत्य आणि ज्ञान

तो डोंगर चढत होता . एक खूप म्हातारा साधू .
त्याच्या गुरूने त्याला सांगितलं होतं , त्या शिखरावर जगाचा नियंता रहातो. आजच्या तिथीला तो भेटेल आणि त्याला सत्य सांगेल व ज्ञान देईल.
इतके दिवस तो घनदाट जंगलात राहिलेला . एकटाच . फळं अन कंदमुळं खाऊन त्याने दिवस काढले होते . आहारविहाराची सगळी पथ्यही त्याने पाळलेली होती . तो माणसांपासून लांब राहिला होता आणि स्त्रियांपासूनसुद्धा !
फक्त त्या नियंत्याचं नामस्मरण .
तो शिखरावर पोचला. त्याने त्या नियंत्याचं स्मरण केलं आणि हात जोडले .
तो प्रकट झालाच .
एकदा त्याच्याकडे पाहून नियंता म्हणाला . ‘ सत्य हे आहे की तू मूर्ख आहेस आणि ज्ञान हे आहे की ज्या पद्धतीने तू आयुष्य जगलास ते व्यर्थ आहे . ‘