एक छोटीशी भटकंती : चिरनेरचा महागणपती आणि हुतात्मा स्मारक

आज रविवार. सावकाश कामे आटोपत व दुपारचा आराम करून जवळपास कुठेतरी बाहेर जायचा विचार करत होतो तेव्हड्यात दोघे मोठे दीर, जाऊ वगैरे भेटायला येत असल्याचा फोन आला. संध्याकाळचे पाच वाजले होते. त्यांना उलव्याच्या (बामन डोंगरी) स्टेशनला थांबायला सांगून बाहेर पडलो. आमची चार चाकी व अजून एका दुचाकीवर सगळे सोबत निघालो.

उलव्याला लागून उरणकडे जाणाऱ्या रस्त्याला गव्हाण फाट्याहून डावीकडे वळले की अगदी दहा-पंधरा मिनिटात आपण चिरनेरला पोहचतो. वाटेत दुतर्फा न्हावा शेवा बंदरावर जाणारे येणारे मालाचे कंटेनर थप्प्या मारून ठेवलेले मोठमोठे आवार दिसतात. चिरनेरला डाव्या बाजूस मंदिराकडे जाण्याच्या वाटेवर कमान लागते. पण हा रस्ता गावातून जाणारा असून चिंचोळा आहे. थोडे पुढे जाऊन अजून एक डावीकडे जाणारी वाट आहे. गावाच्या अलीकडेच एका मोकळ्या मैदानात गाडी लावली व गावातल्या अगदी छोट्या रस्त्याने पायीच मंदिराकडे निघालो. जुन्या वळणाची लहान लहान कौलारू घरे छान वाटत होती. थोड्याच अंतरावर गाव संपते तेथे हे मंदिर आहे. पलीकडे दाट झाडी, डोंगरांचे नयनरम्य दर्शन होते.
चिरनेर मुख्यकरून दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. एक म्हणजे नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला महागणपती व दुसरे म्हणजे १९३० साली झालेला जंगल सत्याग्रह.
१. महागणपती
मंदिर अतिशय प्राचीन असून याचा जीर्णोद्धार पेशव्यांचे सरदार रामजी महादेव फडके यांनी केल्याचे समजते.

गणेशासमोरील मुषक

गणपतीची पाषाणातील भव्य मूर्ती .

मंदिराच्या खिडकीचा जतन केलेला गज (खाली रंग उडालेल्या ठिकाणी गोळी लागल्याची खूण दिसते)

मंदिराला लागूनच हनुमान मंदिर आहे.

२. हुतात्मा स्मारक
या भागात कोळी, आगरी, आदिवासी लोकांचे फार पूर्वीपासून वास्तव्य आहे. शेती व जंगलापासून मिळणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंवर यांचा उदरनिर्वाह चालत असे. मात्र इंग्रज सरकारने लाकूडतोड व जंगलापासून मिळणाऱ्या जीवनावश्यक गोष्टी मिळवण्यास गावकऱ्यांना बंदी घातली. याविरोधात स्थानिकांनी आंदोलन छेडले. २५ सप्टेंबर १९३० रोजी झालेल्या सत्याग्रहाच्या वेळी इंग्रजानी केलेल्या गोळीबारात काही सत्याग्रही मृत्युमुखी पडले तर अनेकांना अपंगत्व आले.

स्मारकाच भाग असलेल्या खोलीत सत्याग्रहाची चित्रे व माहिती दिलेली आहे. खोलीला कुलूप असले तरी बाजूच्या जाळीतून व्यवस्थित पाहता येईल अशी व्यवस्था आहे. पण दुर्दैवाने सध्या ही खोली अडगळीचे सामान ठेवण्यासाठी वापरत असावे असे वाटते. झाडू तर फक्त वर्षातून एकदाच म्हणजे २५ सप्टेंबरला काही कार्क्रम होत असेल तेव्हाच लागत असेल.

३. शिव मंदिर

हुतात्मा स्मारकालाच लागून हे मंदिर आहे. बांधकाम अलीकडचेच असले तरी मंदिर प्राचीन असावे.

सभागृहातील नंदी व समोरच्या भिंतीवरील गणेश व देवी

शिवलिंग.

मुख्य महागणपती मंदिर व या मंदिराचा कळसाचा आतील भाग यांची रचना सारखीच वाटते. त्यामुळे हि दोन्ही मंदिरे एकाच काळातील असावी.

४. देव तळे.
परकीय आक्रमणांपासून मूर्तीचे रक्षण व्हावे या उद्देशाने त्या वेळी मूर्ती लपवून ठेवीत असत. महागणपतीची मूर्तीही अशीच या तळ्यात लपवून ठेवलेली असावी व काही काळाने ती या तळ्यात सापडल्याने याला देव तळे असेही म्हणतात.

तळ्याच्या बाजूने दिसणारी जुनी कौलारू सुंदर घरे

५. गधेगळ
तळ्याच्या बाजूने शिवमंदिराच्या भिंतीलगत हे शिल्प ठेवलेले दिसते. वरच्या भागात चंद्र, सूर्य व मंगलकलश. मधल्या भागात शिलालेख व त्या खालच्या भागात गाढव व स्त्रीचे मैथुन शिल्प. मिसळपाववरच पूर्वी कुठल्याश्या लेखात/प्रतिक्रियेत (बहुतेक प्रचेतस यांच्या) असे शिल्प म्हणजे दुष्कृत्य करणाऱ्या व्यक्तीस आईवरून दिलेली शिवी आहे असे वाचल्याचे स्मरते.
निर्बंधांमुळे फोटो येथे देता येणार नाही असे वाटते.

६. दत्त मंदिर

चिरनेर हे अनेक छोट्या छोट्या पाड्यांचे मिळून बनलेले आहे. कातळपाडा येथील नवीनच दत्त मंदिर

७. बापूजी देव मंदिर /खंडोबा मंदिर.
परततांना उजवीकडे वळून थोडेसे पुढे गेल्यावर अगदी निर्जन स्थळी हे मंदिर आहे. डोंगराच्या पायथ्याशी थोड्याशा खोलगट भागात व गर्द झाडीने वेढलेले.

ही मूर्ती बापूजी देव असावी का? येथे आमच्याव्यतिरिक्त कोणीही नव्हते त्यामुळे विचारणा करता आली नाही.

खंडोबा

आजूबाजूला आगरी वस्ती असल्याने मंदिरातील घोषणा सुद्धा आगरीतच

आजचा दिवस (१५ मे) जागतिक कुटुंब दिवस, जो आम्ही कुटुंबासोबत अनपेक्षितपणे केलेल्या या छोट्याशा भटकंतीने साजरा केला.

परतीच्या वाटेवर कर्नाळा सुळक्याचे दर्शन