शशक'२०२२ - आभास

"हॅलो केबी५६."

"हाय सीसी९९."

"काय करतोयस?"

"बिंज वॉचिंग! आभास चॅनेलचा रिआलिटी शो...पृथ्वी. तिसरा सीझन. जुरासिक. डायनॉसोरवाला! भन्नाट आहे यार. येतोस?"

"नको, अरे.. "

"वाटलंच. बस तू दिवसभर बातम्या बघत."

"केबी५६, अरे आभास चॅनेल.. "

"सीसी९९, आभास चॅनेल मात्र ग्रेट हां. थेट इथून हे शोज तयार केले इतक्या लांबच्या पृथ्वीवर. अरे, चौथ्या सीझनमधला गुहेतला नवीन प्राणी माणूस, पार अंतराळात पोहोचलाय."

"अंतराळात!! म्हणजे आपल्या आरएन५००एक्सयू ग्रहावर पोहोचेल लवकरच. मग आपल्या रोबोस्तानचं काही खरं नाही!"

"घाबरतोस काय? अरे 'आभासी' कार्यक्रम आहे हा. डायनोसॉरसारखाच हा माणूसप्राणी. काढतील पाचवा सीझन."

"यार केबी५६..अरे, तेच तर सांगायला फोन केला होता. आजची ताजी बातमी... आभास चॅनेलचं दिवाळं वाजलंय."