शशक'२०२२ - वेदना

मरण !
हा शब्द ऐकल्यावर माणसं दचकतात. दुसऱ्याचं मरण पाहिलं तरी आणि स्वतःच्या मरणाचा नुसता विचार जरी मनात आला तरी . हा माणसाच्या आयुष्यातला न टाळता येणारा भाग . दुःखद !
पण जो या जगात आलाय तो जाणारच . हा साधा नियम आहे निसर्गाचा. कोणी जगून जातात तर कोणी अकाली जातात . पण जातात हे नक्की !
टिपूर चांदणं पडलेलं . मी दाट झाडीमधून चाललो होतो. लांब. नदीच्या दिशेने .
मरणात दुःख करण्यासारखं काय ? त्यात घाबरण्यासारखं ते काय ? खरं तर , मरण म्हणजे आनंदाचीच गोष्ट म्हणायची की ! ते सोडवतं तुम्हाला.
पण हे माणसांना काय कळणार ?...
असा विचार करत मी दिशाहीन चालू लागलो . नर्मदेच्या काठाने . कपाळावरच्या भळभळत्या जखमेची वेदना सोबत घेऊन .