शशक'२०२२ - ...

काही दिवसांत होत्याचं नव्हतं झालं. आठवड्यापूर्वी टेरालुना कॉइनची किंमत ११६$ होती- आणि मी करोडपती होतो. आज तीच क्रीप्टोकरन्सी ट्रेड होत होती-

०.००००३८१२$ वर!

पोटात अजस्त्र गोळा, सुन्नपणा.

'गमावण्याऐवढेच घातले असते तर- स्टॉप लॉस पाळला असता तर'.... जर आणि तर.

दुपारीच ऑफिसमधून घरी आलो.

असू दे. नंदिनी आहे- तिचे सेव्हिंग आहे. ती चिडेल- तिला काही न सांगता आपण इतका मोठा निर्णय घेतला, इतके दिवस अंधारात ठेवले म्हणून. पण आपण यातून बाहेर नक्की पडू.

सुन्नपणे सोफ्यावर बसून नजाणे किती तास गेले.
तिच्या गाडीचा आवाज ऐकून खिडकीपाशी गेलो. तिचा पांढराफटक चेहरा बघून माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
छे. अशक्य. ती माझ्यापेक्षा हुशार आहे.