जेवायला वाढताना तिने नेहेमीप्रमाणे फ्रिज उघडला.
सगळ्यांना ताजे अन्न वाढल्यावर सवयीप्रमाणे फ्रिझमधली कालची उरलेली खिचडी गरम करुन तिने फक्त स्वतःसाठी घेतली.
तो नेहेमीप्रमाणे तिच्यावर चिडला.
ताजे अन्न असताना मुद्दामुन शिळे अन्न संपवायची काय गरज?
त्याच्याकडे दुर्लक्ष करुन अन्न वाया गेलेले पाहवत नाही असे म्हणत तिने खिचडीचा घास तोंडात टाकला.
ती मीटींग निमित्त दुपारीच परगावी गेली होती.दोन दिवसांसाठी.
रात्रीचा स्वयंपाक त्याने स्वयंपाकीण बाईकडुन बनवुन घेतला.
नेहेमीप्रमाणे त्याचा अंदाज चुकला.बटाट्याची भाजी प्रमाणापेक्षा जरा जास्तच झाली.
तिने बजावुन ठेवल्याप्रमाणे त्याने उरलेले अन्न फ्रिजमध्ये ठेवले.
दुसर्या दिवशी जेवताना वाढताना त्यानेही सवयीने फ्रिज उघडला.
रात्री फ्रिजमध्ये ठेवलेली बटाट्याची भाजी दिसली.
यांत्रिकपणे त्याने ती गरम करुन वाढली.
खरेय अन्न वाया गेलेले पाहवत नाही.
त्याला तिची फार आठवण आली.